मुंगेरीलाल....🥴
इतकी गोड दिसू नकोस ना
मुंग्या येतील डोळ्यांना
अशी ठुमकत चालू नकोस ना
काय करू तुझ्या पावलांना
ही बट कशाला गालावर
उगाचच ना इथे खालीवर
हसलीस जरी किंचितशी
पाय कुठे हे धरणी वर
इतकंss का ग कुणी
दिसत असे सुंदर
कसली ही जादू म्हणू
की कसला भारी मंतर
कधीपासून नाक्यावर
तुलाच होतो शोधत
उगाचच इकडे तिकडे
माणसे बसलो मोजत
अवचित तू दिसल्यावर
पंख आले मनाला
पण साला कर्कश कुठून
आवाज कसला हा आला
आलीस जवळ तू अलगद
चिमटा मला काढलास
अहो उठा आता लवकर
पण तू आवाज का बदलास?
जानू चे अहो झाले कधी
करू नको ना अशी गंमत
लग्न झाल्यावर अहो म्हण
मी तेव्हाच करीन संमत
नीट पाहिलं तुझ्याकडे
मी असा हादरून गेलो..
बायको उभी समोर
मी भेदरून गेलो
खसकन ओढून पांघरूण
ती सूर्य दाखवत म्हणाली
जळली मेली लक्षण ती
स्वप्नात कोण अवदसा आली
चमकून पाहिले मी बाजूला
सगळे भलतेच होते..
कुठला नाका कुठली सुंदरी
ते स्वप्न भाकड होते..
पहाट सरून केव्हाच
तो सूर्य उगवला होता..
स्वप्नावर त्या चोच मारून
साला कोंबडा आरवला होता..
© प्रशांत शेलटकर
8600583846
No comments:
Post a Comment