हल्ली मी फारसा,
माणसांत रमत नाही
का कोण जाणे पण
गर्दीत मला गमत नाही...
गर्दीला मुड्स असतात
अन मुखवटे पण....
गच्च भरलेल्या गर्दीलाही
असतं एक रितेपण...
हे रितेपण मला पेलत नाही
म्हणूनच मी हल्ली फारसा
माणसात रमत नाही....
त्यापेक्षा पुस्तकं बरी
ती मनसोक्त बोलतात ..
शब्दांच्या पारंब्यांवर
अक्षरे छान झुलतात...
माणसांसारखी अक्षरे येथे
रंग कधी बदलत नाहीत..
म्हणूनच मी हल्ली फारसा
माणसात रमत नाही....
इथे कविता प्रेयसीसारखीच
कधी कधी लाजते...
कधी कधी मर्दानीसारखी
तू फक्त लढ म्हणते....
तिच्यासारखं निर्व्याज प्रेम
हल्ली कुणी करत नाही
म्हणूनच मी हल्ली फारसा
माणसात रमत नाही......
माणसांची नसली तरी
सुरांची गर्दी आवडते
हरवलेली लय मला त्यात
अलगदपणे सापडते...
आपल्याच माणसांशी लय
काही केल्या जुळत नाही
म्हणूनच मी हल्ली फारसा
माणसात रमत नाही.....
सुरांचं एक बरं असतं...
"सा"असतो "सा"च्याच जागी
अन "रे"असतो "रे" च्या जागी
दुसऱ्याला इतकं जपायचं
माणसांना कधी जमत नाही
म्हणूनच मी हल्ली फारसा
माणसात रमत नाही....
का कोण जाणे पण,
गर्दीत मला गमत नाहीं....
-प्रशांत शेलटकर
8600583846