"ती"
पहाटेच मला अवचित जाग येते....
मी अलगद उठून किचन मध्ये जातो....
ती ओट्याला बिलगून उभी असते...
काहीतरी शिजत असते...अन
तिची तंद्री लागलेली असते..
जणू स्वप्नांच्या धाग्यांनी ती,
भविष्यकाळ विणत असते...
माझ्या चाहुलीने ती भानावर येते...
पळीभर आमटी चाखत ती म्हणते...
"उठलास, आवरून घे...
मी चहा टाकते"
मी आवरून परत किचनमध्ये येतो...
आता ती कणिक मळत असते
केसांची एक चुकार बट...
गालावर रुळत असते...
तीची परत तंद्री लागलेली असते...
जणू स्वप्नांच्या धाग्यांनी ती,
भविष्यकाळ विणत असते...
एव्हाना सूर्य उगवलेला असतो
मी चहा घेत "आजतक" पहात असतो...
ती पिलूला आंघोळ घालत असते...
त्याला पुसता पुसता परत तिची तंद्री लागलेली असते..
जणू स्वप्नांच्या धाग्यांनी ती,
भविष्यकाळ विणत असते...
मी बाईकला किक मारतो,
ती दरवाजात उभी असते..
'सांभाळून जा' तिची नजर बोलते....
मी गेटमधून बाहेर येतो
ती अजूनही तिथेच उभी..
तीची तंद्री लागलेली असते
जणू स्वप्नांच्या धाग्यांनी ती,
भविष्यकाळ विणत असते...
संध्याकाळी मी थकून येतो
ती मात्र थकलेली नसते..
तांदूळ निवडता निवडता
पिलूचा अभ्यास घेत असते..
मी तारक मेहता पाहत असतो
ती परत किचनमध्येच जाते ...
जणू स्वप्नांच्या धाग्यांनी ती,
भविष्यकाळ विणत असते...
स्वप्नांची दुलई ओढून
रात्र झोपलेली असते...
मला अवचित जाग येते..
पिलूला कुशीत घेऊन...
ती शांत निजलेली असते...
आणि हो....
आता ती खरच ..
स्वप्नांच्या धाग्यांनी
भविष्यकाळ विणत असते...
आणि एक चुकार थेंब ...
पापणी सोडून माझ्या गालावर
ओघळलेला असतो..
-प्रशांत शेलटकर
8600583846