Ad

Wednesday, 20 December 2023

बोधिसत्व कथा/#३

बोधिसत्व कथा/#३

एकदा दोन मित्र रस्त्यात उभे राहून बाजूच्या मंदिरावरच्या झेंड्याकडे पहात वाद घालत होते

पहिला- झेंडा हलतोय
दुसरा- नाही ,वारा हलतोय(मृगजळ)

बाजूने बोधिसत्व जात होते, ते दोघांना म्हणाले वाराही हलत नाही आणि झेंडाही हलत नाहीये हलतंय ते तुमचे मन..

💡- प्रत्येक माणसाचा दृष्टिकोन भिन्न असू शकतो त्याच बरोबर त्याचे आकलन (परसेप्शन) वेगळे असू शकते . सत्य एकच असले तरी त्याची मांडणी प्रत्येक जण वेगळी करू शकतो .ती सुद्धा त्याच्या परसेप्शनच्या मर्यादेत. आणि विशेष म्हणजे परसेप्शनला मर्यादा असते ती सुद्धा ज्याची त्याची वेगळी. प्रत्येकाला जाणवलेले सत्य हे सत्यच असते परंतु त्याला जाणवलेले सत्य हे तेवढेच सत्य नसते त्याहून आणखी वेगळे ,आणखी विस्तृत असण्याची शक्यता असू शकते. उदा. स्टेज वरील वक्त्याला समोरचे श्रोते, खुर्च्या, वर फिरत असलेले फॅन, सभागृहाच्या खिडक्या हे सगळे दिसत असते , ते त्याच्या दृष्टीत येणारे जग असते .आणि त्याच्या दृष्टीक्षेपात येणाऱ्या प्रत्येक व्यक्ती आणि वस्तू या सत्यच असतात. पण तेवढ्याच सत्य नसतात..तो स्वतःच एक सत्य असतोच जरी तो स्वतःचा स्वतःला दिसत नसला तरी, त्याच्या मागे असलेल बॅक स्टेज ,मागचा बोर्ड ,वर फिरणारा फॅन हे सारे त्याला दिसत नसते कारण तो श्रोत्यांसमोर बोलत असतो बॅक स्टेजकडे त्याची पाठ असते. त्याच्या दृष्टीने ते अज्ञात असते म्हणजे ते सत्य नसते का? त्याच्या दृष्टीने जे अज्ञात असते ते श्रोत्यांच्या दृष्टीने ज्ञात असते 
     सत्याची ज्ञात आणि अज्ञात अशी विभागणी माणसाने आपल्या सोयीनुसार केली आहे .सत्य हे सत्यच असते . ते स्वयंसिद्ध असते .सूर्य हे सत्य आहे .दिवसा तो दिसतो म्हणून तो असतो, रात्री तो दिसत नाही म्हणून तो असत नाही ..असे थोडेच आहे. त्याचे असणे आणि नसणे आपल्या स्थितीवर ,आपल्या आकलनावर अवलंबून नसते ..तो असतोच .. आपली स्थिती बदलली म्हणजे रात्र झाली की तो आपल्याला म्हणजे फक्त आपल्यालाच दिसत नाही.म्हणून तो नाहीच असे नसते.पृथ्वीवर पलीकडे दिवस चालू असतो त्याना तो दिसतो.आकलनाला स्थिती आणि काळाच्या मर्यादा असते तशीच ते व्यक्तीसापेक्ष असू शकते
       परसेप्शन ही आपली मर्यादा आहे आणि आपली ताकदही...सत्य हे त्या पलीकडचे आहे..थोडे माझ्या आवाक्यातले ...खूपसे  माझ्या आवाक्याच्या पलीकडले...
     बोधिसत्वाच्या या छोट्या पण गहन अर्थपूर्ण कथेचे माझ्या बुद्धीच्या मर्यादेत झालेले हे अंशतः आकलन..इतरांची आकलने भिन्न असू शकतात.

अत्त दीप भव..

☺️-प्रशांत

Tuesday, 19 December 2023

बोधिसत्व कथा-#२

बोधीसत्व कथा-#२

एकदा एक प्राध्यापक बोधिसत्वाकडे  सल्ला मागायला जातो, बोधिसत्व चहा करत असताना हा प्राध्यापक त्याच्याशी तावातावाने चर्चा करत असतो. चहा तयार झाल्यावर बोधिसत्व एक कप त्या प्राध्यापकाच्या हातात देऊन त्यात चहा ओतायला सुरुवात करतो : चहाचा कप  काठोकाठ भरला तरी चहा ओततच रहातो. शेवटी न राहून तो प्राध्यापक म्हणतो अहो महाशय कप भरला आहे आता त्यात अधिकचा चहा कसा मावेल ? त्यावर बोधिसत्व उत्तर देतो की ,तू या कपासारखाच आहेस विचारांनी भरलेला मग मी सांगितलेले विचार तू कसा स्वीकारशील? आधी रिकामा हो मग त्यात काही नवीन भरता येईल..☺️

💡--नवीन विचार समजून  घेण्यासाठी मनाची पाटी कोरी करावी लागते. मनात पूर्वग्रह ठेऊन ऐकताही नीट येत नाही आणि नवीन स्वीकारले जात नाही.

☺️-प्रशांत

बोधिसत्व कथा-#१

बोधिसत्व कथा-#१

  अस्सं ? 

  एकदा एका गावातील एक अविवाहित तरुणी प्रेग्नन्ट रहाते. या पापाचा धनी कोण? आईवडील आणि गावकरी विचारतात..ती तरुणी बोधिसत्वाकडे बोट दाखवते.
     सगळ्या गावात बोधिसत्व एक सदाचारी आणि ज्ञानी माणूस म्हणून ओळखला जात असे. त्या तरुणीच्या आईवडिलांना प्रचंड संताप येतो.. एका सज्जन समजलेल्या माणसाने अस कृत्य करावे??  ते त्याला जाब विचारतात..बोधीसत्व त्याना म्हणतो ....अस्सं?
     यथावकाश ती तरुणी बाळंत झाल्यावर ते बाळ बोधीसत्वाकडे सुपूर्द केलं जातं..तुमचं पाप तुम्हीच सांभाळा.. बोधिसत्व परत एकदा अस्सं म्हणतो आणि ते बाळ स्वीकारतो त्याचे लालन पालन करतो.
     यथावकाश त्या तरुणीला केलेल्या कृत्याचा पश्चाताप होतो.गावातील एका तरुणाला वाचवण्यासाठी तिने बोधिसत्वावर खोटा आळ घेतलेला असतो.
     ती तरुणी परत बोधिसत्वाकडे जाऊन त्याची क्षमा मागून ते बाळ परत मागते
     बोधिसत्व अस्सं म्हणून तीच बाळ तिच्याकडे  परत सुपूर्द करतो..

√ निष्कर्ष- मान आणि अपमान एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आपण प्रामाणिक असू तर जग तुमच्या विषयी काय म्हणते काय बोलते याची काळजी करू नका. संयम दाखवला तर सत्य प्रकाशात येते. सत्य झाकोळले जाते नष्ट होत नाही. कर्तव्य करा मोह नको पुण्याचा आणि पापाचाही...☺️

 अत्त दीप भव....
-प्रशांत  😌

Friday, 15 December 2023

स्क्रिप्ट

" आपण आपल्या चॉईस प्रमाणे मुलाला जन्म देत नसून मुल आईवडील म्हणून आपल्याला निवडते..जन्म कुठे आणि कोणत्या कुटुंबात घ्यायचा हा पुनर्जन्मास इच्छुक असलेल्या आत्म्याचा चॉईस असतो. ( अधिक माहितीसाठी मनशक्ती प्रयोग केंद्र लोणावळा यांचे लिटरेचर अभ्यासून पहा) कदाचित काही जण याच्याशी सहमत होणार नाहीत. त्याना तो असहमतीचा अधिकार आहेच..ज्याने त्याने स्वतःचा अभ्यास चालू ठेवायचा आहे.
     मुलं आणि आपण एकच नाही हे ध्यानात घ्यायला हवं विशेष करून आयांनी..प्रत्येकाची स्क्रिप्ट वेगळी असते आणि भूमिकाही..त्यामुळे कोणाच्याही बाबतीत फार पझेसिव्ह राहू नये. 
      माणसाचा जन्म झाल्याबरोबर नात्यांचे जुगाड चालू होते.एकेक नाते निर्माण होते तसे त्या नात्याचे मोह निर्माण होतात.कारण त्या नात्यापासून लाभ होत असतात. प्रेमात पडल्यावर मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही असे म्हणणारी कपल्स काय त्या पूर्वी जगत नव्हती? ज्या दिवशी पहिला श्वास  घेतला तेव्हा पासून माणूस जगतच आलाय. 
    त्यामुळे मी यांच्याशिवाय किंवा हिच्याशिवाय जगू शकत नाही हे सत्य नाही. लोभ माणसांचा नसतो त्या माणसापासून मिळणाऱ्या लाभांचा असतो. तो लाभ थांबेल म्हणून माणसांच्या वियोगाचे दुःख जास्त असते.
    लैंगिक सुख ते वात्सल्य व्हाया मानसिक आणि शारीरिक सुरक्षा या सर्व सुखाच्या भावना आहेत. त्या माणसामुळे पूर्ण होतात म्हणून माणसाला माणसांचा मोह असतो.

आमेन
आजचा ज्ञान डोस संपला
😃😃😃😃😃😃

- प्रशांत

Thursday, 14 December 2023

नाती तुटायची झटका आणि हलाल पद्धत....

नाती तुटायची झटका आणि हलाल पद्धत....

नाती अचानकपणे तुटत नाहीत, अगोदर कारणे शोधली जातात,ती   मेंदूत स्टोअर केली जातात, त्याचवेळी ज्याच्या सोबत नातं तोडायच त्याच्या चांगल्या आठवणी विस्मृतीच्या कप्प्यात ढकल्या जातात...कारण त्या आठवणी नातं तोडायचा निर्धार दुबळा करतात..
     अशा तऱ्हेने पुरेशी कारणे गोळा झाली की , एक दिवस निमित्त शोधले जाते आणि मग स्फोट होतो..मेंदूत साठवलेली कारणे धडाधड पेट घेतात..नाते बेचिराख होते...ही झाली नाते संपवायची झटका पद्धत...एकदाच कडाक्याचे भांडण करायचे आणि नाते तोडून टाकायचे..
      नाते संपवायची दुसरी पद्धत म्हणजे हलाल पद्धत..यात नाते एकदम तोडले जात नाही..हळूहळू तोडले जाते..संवाद कमी कमी होत जातो..हाय हॅलो पासून सुरू झालेले नाते..हळूहळू फारच तपशीलात जात जात गहिरे आणि सेंटी होत जाते आणि मग परत यु टर्न घेऊन हाय हॅलो पर्यन्त येते...अर्थात हा यु टर्न कोणीतरी एक घेतो ..आणि परत येतो ..पण जो दुसरा असतो तो त्या यु टर्न च्या पॉइंटलाच थाम्बलेला असतो. त्याला बहुधा कळतच नाही की सोबत्याने यु टर्न का घेतलाय? तो वाट पहात बसतो परत सगळं ओके होईल..सोबती परत येईल..
.....हे जे वाट पहाणे असते ना तेच हलाल होणे असते.. ती एक तडफड असते..प्यास असते..वाट पाहण्याची शिक्षा देहांताच्या शिक्षेइतकीच वेदनादायी असते.. घट्ट धरलेला हात जेव्हा अलविदा करतो तेव्हा नातं विरून जातं आणि तेच जास्त क्लेशदायक असत

© प्रशांत शेलटकर

Wednesday, 6 December 2023

सल्ल्याचे सलाईन..

सल्ल्याचे सलाईन...

रोग परवडला रे
पण आवर तुझा सल्ला
एलोपॅथी की आयुर्वेद
मनात नुसता कल्ला

कुणी म्हणतो दूध हवे
पण देशी गाईचेच
आणि पीठ तर हवे
ज्वारी आणि बाजरीचेच

जशी काही गोठ्यामध्ये
देशी गाय बांधली आहे
आणि परसात माझ्या
ज्वारी मी पेरली आहे

फळे खा कोणी म्हणतो
कुणी म्हणतो घ्या स्मूदी
कुणी म्हणतो झोपून घ्या
विकत घ्या मसाजगादी

तासभर करा वर्कआऊट
मी देतो डिझाइन
फिटनेसची देतो गॅरंटी
जॉईन व्हा ऑनलाईन

घामेजलेले सेल्फी बघून
कॉम्प्लेक्स मात्र येतो
लोक किती तंदुरुस्त
आणि मी बेडवर लोळतो

म चार दिवस उत्साह
धावणे आणि पळणे
गच्चीत जाऊन सकाळी
जोर बैठका काढणे

शूज ,ट्रॅक पॅन्ट, टोपी
खरेदी मस्त होते
सेल्फी काढून छानसा
सुरवात मस्त होते

रंग तेरड्याचे म्हणे
असतात चार दिवस
चार दिवसातच फिटून जाते
मग व्यायामाची हौस

मग पुन्हा तेच मेसेज
तेच सल्ले फुकटचे
बरं कसं वाटलं मला
बोल घ्या अनुभवाचे

कोणी एक बाई म्हणे
होते मी किती त्रस्त
औषध घ्या अमक्याचे
आता मी आहे मस्त

विश्वास ठेवू नकाच हो
हे असते मार्केटिंग
तुमचं आमचं सर्वांच
असत घाऊक चिटिंग

जिथे पिकते जे जे
तेच खावे नियमाने
करू नयेत उपचार
कोणाच्याही सल्ल्याने

जितक आहे आयुष्य
तितकंच आपण जगणार
वेळ नसेल तुमची तर
यम सुद्धा नाही येणार


- प्रशांत शेलटकर 😃

Saturday, 2 December 2023

उमाळी..

उमाळी...

कवी कुठे मी ?
मी तो उमाळी
सूर्य उगवताच
जशी फुलते कळी

जसा येतो उमाळा
तसे लिहीत जातो
विषय देताच कोणी
लेखणी बंद करतो

दगड देता कोणी
मूर्तिकार मूर्ती निर्मितो
तसेच विषय देताच
कवी कविता देतो

जोवर न येई उमाळा
तोवर जो थंड राही
कवितेच्या प्रांतात
त्याला कवी म्हणत नाही

विनोद केला कोणी
तर हास्य सहजच असते
त्या हसण्यास कोणी
कला म्हणत नसते

तसे विशेष प्रसंगी
मनात दाटले काही
केवळ मीटरमध्ये बसले
त्या काव्य म्हणत नाही

जुळवून कशीतरी अक्षरे
मी लिहितो काहीतरी
कविता म्हणून उगाचच
लोक घेतात डोईवरी

किती तेजस्वी तारे-तारका
किती तेवत्या स्निग्ध पणत्या
त्यात मी कुठे लावू सांगा
माझ्या कवितेच्या उदबत्त्या

जसा येतो उमाळा
तसे मी लिहीत जातो
म्हणून मी स्वतःला
उमाळी म्हणवून घेतो

-प्रशांत शेलटकर
 8600583846

आम्ही अज्ञेयवादी

आम्ही अज्ञेयवादी... आस्तिक नास्तिक वादात आम्ही अज्ञेयवादी लोकांनी काय करायचे???? आमची क्षमताच नाहीये देव आहे की नाही हे ठरवण्याची...आम्ही दो...