Ad

Thursday 25 February 2021

वेटींग रूम

मी कधीचा या वेटींग रूम मध्ये बसलोय.कित्येक तास..दिवस ...महिने..वर्ष..कधी कधी वाटतं मी वेटींग रूम मध्येच जन्मलो की काय?...
   माझ्या आजूबाजूला काही माणसं आहेत.खूप वर्षांपासून जवळ असल्याने ती आता आपली वाटत आहेत.इतकी की त्यांना गमावण्याची मला आता भीती वाटतेय..माझ्यासमोर एक विचित्र माणूस बसलाय..विचित्र अशासाठी की, डोक्यावरच्या भरपूर केसात एक  मोरपीस खोवलेले आहे.त्यामुळे तो अगदीच ऑड मॅन आऊट वाटतोय..पण त्याच्या गालावरचे मंद स्मित मात्र भलतेच मोहक आहे..ते मात्र कायम आहे..मध्येच गलका होतो आजूबाजूची काही माणसे बाहेर निघून जात आहेत.काही आत येत आहेत.येणारी माणसे उत्साही वाटत आहेत..आणि जाणारी माणसे थकलेली...
     मला पण हल्ली थकल्यासारखे वाटत असत.. बाजूची माणसं निघून गेली की मन थोडं कातर होतं.. पायाशी असलेली बॅग उचलावी आणि वेटींग रूमच्या बाहेर जाऊस वाटतं.. पण तेही क्षणभरच ..वेटींग रूमचा मोह काही सुटत नाही..माझ्या पायापाशी पडलेल्या बॅगेत फार काही नाही..जुन्या आठवणींचा जुनाट अल्बम..त्यात आता नवीन आठवणी ठेवायला जागाच नाही..  थोडी चिल्लर बस्स....मध्येच त्या मोरपीस खोवलेल्या माणसाकडे लक्ष जातं.. त्याचे हास्य मात्र अजूनही मोहक आहे..
     सूर्य आता कललाय..त्याची उदास उन्ह वेटींग रूमच्या भिंतीशी उगाचच रेंगाळत आहेत..मी पण असाच रेंगाळत आहे का??? दूरवरून गाडीची शिट्टी ऐकू येतेय..का कोण जाणे मला वाटतय की याच गाडीने आपल्याला निघायचं आहे..गाडी जवळ येतेय..आता सूर्य पूर्ण अस्ताला गेलाय..त्याची ती रेंगाळणारी उन्हही गायब झालीयत..काळोखाची भयकारी पाऊले आता वेटींगरूम मध्ये पडत आहेत..गाडीची शिट्टी जवळ ऐकू येतेय.. तो मोरपीसवाला  विचित्र माणूस अजूनही मंद स्मित करतोय..मावळलेला सूर्य, पसरणारा काळोख याचा त्याच्यावर कसलाही परिणाम झालेला नाही..माझ्या बाजूच्या माणसांवरही त्याचा परिणाम झालेला दिसत नाही.जणू त्यांच्यासाठी सूर्य मावळलेलाच नाही..
    गाडी आता प्लँटफॉर्मला लागलीय.आता गेलं पाहिजे ही जाणीव प्रबळ होतेय..पण मी शक्तिपात झाल्यासारखा बसून आहे..शरीराची जाणीव कमी कमी होतेय..इतक्यात तो समोरचा मोरपीस खोवलेला माणूस उठतोय..त्याच्या चेहऱ्यावरच ते मोहक हास्य अजून तसच आहे..आता तर  मला त्याच हास्य आणि ते केसात खोवलेल मोरपीस इतकच दिसतंय.. तो मला हात देतोय..माझ्या पायाशी पडलेली आठवणींच्या अल्बमची बॅग तशीच ठेऊन मी वेटींग रूमच्या बाहेर आलोय..वेटींगरूम मध्ये कोणीतरी म्हणतंय.. गेला बिचारा..,
     मी मागे वळून पाहतो..माझ्या आजूबाजूची माणसं माझी बॅग उघडत आहेत..काही जण आठवणींचा अल्बम नुसता चाळत आहेत,काही जण हळहळत आहेत.पण त्या गर्दीत "तो" दिसत नाहीये..
     तो तर गाडीच्या दरवाजात उभं राहून माझं स्वागत करतोय..गाडी हलली.. फलाटावरच वेटींगरुम अदृश्य होतंय.. गाडीत आता फक्त बासरीचे अनाहत सूर ऐकू येत आहेत. तो अजूनही स्मित करतो आहे..
    क्षणभरापूर्वी मी निधन पावलों आता माझा प्रवास चालू झालाय..गंतव्य स्थान माहीत नाही...पण चालु झालाय नक्की...सोबत ते मोरपीस आणि मोहक स्मित आहेच..
     -प्रशांत शशिकांत शेलटकर
      8600583846

No comments:

Post a Comment

कौशल्यम सर्वत्र पुज्यते

कौशल्यम सर्वत्र पुज्यते... ज्याचा मेंदू शाबूत तो प्रत्येक माणूस बुद्धिमान- मा.अविनाश धर्माधिकारी..     बुध्दीमत्तेविषयीच्या रूढ आणि पारंपरिक...