Ad

Friday, 29 November 2024

ब्रेन हॅकर्स

ब्रेन हॅकर्स...

 इव्हीएम हॅक होत का माहीत नाही पण माणसाचे मेंदू जरूर हॅक झाले आहेत.राजकारणात 2014 पासून सोशल मीडियाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढला.
    जेव्हा माणसाची संख्या एक असते तेव्हा तो चिकित्सक पद्धतीने विचार करण्याची शक्यता सर्वात जास्त असते,जशी जशी ती वाढत जाते तशी चिकित्सक वृत्ती कमी होते आणि भावनिकता वाढते. गर्दी भावनाशील असते.
    व्हाट्सएपवर जेव्हा संवाद पर्सन टू पर्सन असतो तेव्हा तो जरी भावनेच्या पातळीवर असला तरी त्याची प्रभाव क्षमता त्या दोन व्यक्तींपर्यंतच असते.पण जेव्हा त्याचे ग्रुप बनतात तेव्हा त्याची प्रभावक्षमता मल्टीपल पद्धतीने वाढते अर्थात ती पॉझिटिव्ह अथवा निगेटिव्ह असू शकते.
    गर्दी चांगले आणि वाईट अफाट प्रमाणावर करते.कारण त्या कृतीला चिकित्सेचा अडथळा नसतो. 
    जेव्हा एखादा ग्रुप विशिष्ट हेतू ठेवून बनतो तेव्हा ती एक प्रकारची व्हर्च्युअल गर्दी असते आणि तगर्दीचे सगळे मानसशास्त्रीय नियम त्या  व्हाट्सएपग्रुपला लागतात. 
     माणूस आपल्या अनुभवातून मते बनवतो आपल्या मताशी पुष्टी करणारे, समर्थन करणारे समूह जवळ करतो,आपल्याला जे आवडेल ते " विना अट" वाचतो,पाहतो,ऐकतो .विना अट किंवा विना चिकित्सा वाचतो ऐकतो पाहतो वेगळं काही ऐकलं, पाहिलं,वाचलं तर कारण मतपुष्टीतला आनंद हिरावून घेतला जाईल याची त्याला भीती वाटते.
     आपलं विश्व हे आपलंच असत कारण तो आपला " सेफझोन" असतो.तो डिस्टरब झाला की आपण अस्वस्थ होतो..तो डिस्टरब ज्या कारणाने होतो ती कारणे खरी किंवा खोटी हे न पाहता ती आधी नाकारली जातात आणि मग मन स्वतःच्या सोयीने त्याचा कार्यकारण भाव तयार करते. माझं काम झालं नाही कारण सकाळी बाहेर पडताना मांजर आडव गेलं होतं हे एक त्याच उदाहरण..
    माझा माईंडसेट जसा असेल तसेच जग असेल हा एक मोठा भ्रम असतो. माझं जग केवळ सोशल मीडियापुरत मर्यादित असेल आपला झोंबी होण्याची शक्यता जास्त असते. आणि आपण झोंबी आहोत हे झोंब्याना कळत नसते म्हणून ते झोंबी असतात हे पण सत्यच असतं..☺️

-© प्रशांत शेलटकर

Monday, 25 November 2024

लेख- @1- बोलण्याचे विषय....



माणूस कितीही देखणा,रुबाबदार ,श्रीमंत असला तरी जो पर्यंत तो तोंड उघडत नाही तो पर्यंत त्याचा दर्जा कळत नाही.
    माणूस कोणत्या विषयात रमतो यावरून तो किती प्रगल्भ आहे तो कळतो. माणूस हा बोलणारा प्राणी आहे. त्याला अनेक विषयांवर बोलता येते आणि त्याच बरोबर विषय निवडीचे स्वातंत्र्य त्याला असते. माणूस आवडणारे विषय निवडतो.समान विषय आवडणाऱ्यांचा एक समूह बनतो.
    निवडीचे स्वातंत्र्य असले तरी माणसाला कोणत्या विषयावर बोलायला आवडत त्यावर त्याचा दर्जा ठरतो आणि त्या बोलण्याचे बरे वाईट परिणाम त्याला भोगायला लागतात
     इतरांच्या चांगल्या गोष्टीं ,चांगल्या सवयी यांच्या बद्दल सतत बोलत राहिले तर त्या चांगल्या सवयी आणि गोष्टी आपल्यात देखील उतरतात. या उलट इतरांचे वाईट गुण,त्यांचे वैयक्तिक आयुष्य चघळत राहिले तर ती नकारत्मकता आपल्यात उतरते.
     दोन माणस एकत्र आली की तिकडे उपस्थित नसलेल्या तिसऱ्या व्यक्तीबद्दल चर्चा चालू होते खूप वेळा ती निगेटिव्ह असते.वास्तविक त्या व्यक्तीचा आणि आपल्या आयुष्याचा तसा काही थेट संबंध नसतो .पण इतरांचे दोष दाखवत राहिले तर त्यातून मी किती चांगला किंवा चांगली हे ठसवण्याचा निष्फळ प्रयत्न असतो तो. निगेटिव्ह चर्चा करणारे हे विसरून जातात की आता माझ्या हो ला हो करणारी व्यक्ती माझ्या मागे माझी निंदाच करणार आहे. 
     माणस आपली ऊर्जा आणि वेळ इतरांच्या नसत्या उठठेवी करण्यात वाया घालवतात आणि त्याचे परिणाम स्वतःच भोगतात आणि दोष नशीब किंवा देवाला देतात.
    बोलण्यासारखे अनेक विषय असतात, टीका करा पण समोरासमोर टीका करावी व्यक्तीच्या मागून केलेली टीका आणि स्वप्नात केलेले लग्न याचा उपयोग शून्य असतो...

-© प्रशांत शेलटकर 😌

Friday, 22 November 2024

फक्त एवढंच..

फक्त एवढंच...


सुखी हो म्हणायला
मी काय नाही देव
एवढंच म्हणेन तुला
तुझं तुलाच जपून ठेव

आयुष्यात कधी फक्त 
सुखच येत नसतं.
सुखाच्या मागोमाग
दुःख दस्तक देतं
दोन्ही येणार नक्की
फक्त ही जाणीव ठेव
एवढंच म्हणेन तुला
तुझं तुलाच जपून ठेव

समतोल राहील नेहमी
अस कधी जीवन नसत
एका जागीच राहील अस
कधी कोणाच मन नसत
किती कोणात रमायच
हे तुझं तूच लक्षात ठेव
एवढंच म्हणेन तुला
तुझं तुलाच जपून ठेव

सगळे सूर आपलेच रे
वर्ज्य कुठला समजू नये
आरोह अवरोह यायचेच
पुन्हा समेवर उमजून ये
मैफिल तुझ्या आयुष्याची
हसत खेळत चालू ठेव
एवढंच म्हणेन तुला
तुझं तुलाच जपून ठेव

क्षणा-क्षणाचे प्राक्तन
देव सुद्धा सांगत नाही
नियतीची अगम्य पत्रिका
कधी कोणाला कळत नाही
ग्रीष्म येवो अथवा शिशिर
वसंत आतला जागा ठेव
एवढंच म्हणेन तुला
तुझं तुलाच जपून ठेव

सुखी हो म्हणायला
मी काय नाही देव
एवढंच म्हणेन तुला
तुझं तुलाच जपून ठेव

....एवढंच म्हणेन तुला
तुझं तुलाच जपून ठेव

- प्रशांत शेलटकर
  8600583846

Thursday, 21 November 2024

श्रद्धा आणि लॉजिक

" 'एक अधिक एक बरोबर दोन " हे लॉजिकली करेक्ट विधान आहे.कारण गणितीय दृष्टीने एक अधिक एक बरोबर तीनच, चार नाही की पाच नाही..यात केवळ आणि केवळ एकच शक्यता आहे.
       " मी त्याला उधार दिलेले पैसे तो मला परत देणार आहे" हे विधान लॉजिकली करेक्ट नाही कारण यात दोन शक्यता आहेत.एक तर तो पैसे देईल अथवा नाही देणार.
       पाहिल्या विधानात लॉजिक आहे दुसऱ्या विधानात विश्वास किंवा श्रद्धा आहे. श्रद्धा केवळ देवावरच असत नाही ती मानवी मूल्यांवर देखील असते. सामाजिक नियम पाळणे ही एकमेकांच्या विश्वासावर आधारलेली एक प्रकारची श्रद्धाच आहे. कारण इथेही दोन शक्यता आहेत ,एक म्हणजे नियम पाळण्याची आणि दुसरी शक्यता म्हणजे नियम न पाळण्याची . 
       दोन शक्यतांपैकी एक शक्यता गृहीत धरणे म्हणजेच श्रद्धा. देव आहे,देव भले करील ही एक प्रकारची श्रद्धाच आणि देव नाही हे विज्ञानाने सिद्ध होत नाही आणि ते सिद्ध होण्यासाठी विज्ञानाची सद्य स्थितीतील साधने पुरेशी आहेत असे गृहीत धरणे ही पण एक प्रकारची श्रद्धाच.काळाच्या मर्यादित परिघात विज्ञानाने ईश्वराचे अस्तित्व मान्य होत नाही हे सत्यच ..काळाची मर्यादा गृहीत धरूनच देव नाही हे विज्ञान सिद्ध करू शकेल. म्हणून देव नाही हे टेम्पररी स्टेटमेंट आहे. कालच्या वैज्ञानिक पायावर आजचे विज्ञान आणि आजच्या विज्ञानावर  उद्याचे विज्ञान असा अखंड प्रवास चालू असताना देवाच्या अस्तित्वाचा प्रश्न कोणी श्रद्धेने सोडवेल कोणी लॉजीकने..
     देव आहे हे मात्र टेम्पररी स्टेटमेंट नाही कारण जे हे स्टेटमेंट करतात ते लॉजिकली विचार करत नाहीत ते श्रद्धा हा बेस ठेवून तसे विधान करतात. त्यांच्या दृष्टीने श्रद्धा हेच लॉजिक असते. त्यामुळे देवाचे अस्तित्व व्यक्ती सापेक्ष असते हे खरेच..
     देवासोबत आणि देवशिवाय जगणारी दोन्ही प्रकारची माणसे जगात नांदत असतात, दोन्ही ठिकाणी नैतिकता आणि अनैतिकता असते. निरुपद्रवी अस्तिकता आणि नास्तिकता तसेच उपद्रवी अस्तिकता आणि नास्तिकता यांचा कोलाज म्हणजेच हे जग..
    बाकी श्रद्धा ही डोळस कधीच नसते म्हणून श्रद्धा आणि अंधश्रद्धा असे काही वेगळे नसते.कुप्रथांना अंधश्रद्धा नाव देताना मात्र लॉजिक गंडले आहे हे नक्की. जसे बर्फ गार असतो हे विधान हास्यास्पद कारण बर्फ़ाचा अंगभूत गुण थंड असणे हाच आहे..तो नसेल तर बर्फ या संज्ञेला काही अर्थ रहात नाही तसेच श्रद्धा आणि अंधश्रद्धा अशी विभागणी हास्यास्पदच....प्रत्येक श्रद्धा अंधच असते

- प्रशांत शेलटकर
  8600583846

Tuesday, 19 November 2024

स्वातंत्र्यातले स्वेच्छा परतंत्र...

स्वातंत्र्यातले स्वेच्छा परतंत्र...

   मोठ्या माणसांच्या नजरेपेक्षा लहान मुलांची नजर अधिक वास्तववादी असते.राजा नागडा आहे असे लहान मूल पटकन म्हणेल पण मोठी माणसं गप्प बसतील..
        आजकाल माणसं वाचनाने विशाल आणि प्रगल्भ होण्यापेक्षा वाचनाने एकांगी आणि क्षुद्र होत जातं आहेत.कारण ती फक्त आवडणारे वाचत जातात..न आवडणारे पण वाचलं पाहिजे. मुळात आवड -निवड असणे म्हणजेच आपण तटस्थ नसणे. 
        आलेल्या व्यक्तीगत अनुभवामुळे माझा वैचारिक कल ठरत जातो त्यानुसार मी वाचन करत जातो. मग विचार करण्याचा एक साचा बनत जातो. असे समान साचे एकत्र आले की त्याचा संप्रदाय बनत जातो.त्याचे प्रेषित बनतात. संप्रदाय हा केवळ धार्मिक असण्याची गरज नसते.ते सामाजिक असतात तसे राजकीय पण असू शकतात.
        एकदा साच्यात अडकल की विचार एकसाची होतात. गट निर्माण होतात.एका गटातून दुसऱ्या गटात जाणे निषिद्ध होते. ही एक प्रकारची जाती व्यवस्थाच नाही काय? माणूस जन्माला येतो तेव्हा तो फक्त माणूस असतो . तो डावा किंवा उजवा किंवा अन्य काही नंतर होत जातो..एकदा का वर्ग पत्करला की मरेपर्यंत त्याच वर्गात राहतात माणसं. याला वैचारिक कट्टरता म्हणायची? एकनिष्ठता म्हणायची ? की नवी जातीयव्यवस्था.? की स्वतंत्र विचार करता करता नकळत स्वीकारलेले परतंत्र...?

- प्रशांत शेलटकर
   8600583846

Sunday, 17 November 2024

हस जरा...

हस जरा...☺️

आवडेल विनोद मला जो
तुला तो रुचेलच असे नाही
पटेल मला मनापासून जो
तुला तो पटेलच असे नाही

हसेन मी ज्या विनोदाला
तिथे तू मक्ख बसशील कदाचित
उडत डोक्यावरून तुझ्या तो
चक्क जाईल रे  कदाचित
तरी मी हसलो तू ही हसावे
अस  मुळीच हट्ट नाही..
आवडेल विनोद मला जो
तुला तो रुचेलच असे नाही

हसतात कोणी मोकळे
कोणी हसतात गाली
हसता हसता कोणी 
देतात बघा टाळी
मी दिली टाळी जर तुला
तुही द्यावी असे नाही
आवडेल विनोद मला जो
तुला तो रुचेलच असे नाही

कोणास आवडेल शब्दकोटी
कोणास भावतो प्रसंगनिष्ठ
हसून घ्यावे मनसोक्त
रहावे निजछंदास एकनिष्ठ
मी भिजलो नखशिखांत
तू भिजावेच असे नाही
आवडेल विनोद मला जो
तुला तो रुचेलच असे नाही

दुःख ,दारिद्र्य, वंचना, संकटे
असतातच रे सोबतीला
म्हणूनच देवाने माणसाच्या
दिला विनोद दिमतीला
मिटतील सर्व विवंचना
असा मुळीच भ्रम  नाही
क्षणभर जरी त्या विसरल्या
तरी नवऊर्जा मिळून जाई

सोड रे सोड चिकित्सा
प्रतिमेतून ये बाहेर जरा
बघ रे बघ आजूबाजूला
हसतोय माहोल सारा
हसतो फक्त माणूस
काय तू माणूस नाही?
नसशील तर हसण्याचा
माझा उगाचच हट्ट नाही

आवडेल विनोद मला
तुला तो रुचेलच असे नाही
पण   हसण्यासारखे मित्रा
दुसरे औषध बघ नाही...

😄😄😄😄😄

© प्रशांत शेलटकर 
    8600583846

Saturday, 9 November 2024

जातिकडून जातिकडे

जातिकडून जातिकडे ....

जाती असण्यातच काहींचा "मेंदू निर्वाह" असल्याने जाती जात नाहीत. भूतकाळाच्या ठसठसत्या जखमा तशाच उघड्या ठेवणे ही काहींच्या मेंदूची खाज असल्याने आणि मुळातच काहींचा उदरनिर्वाहच त्यावर अवलंबून असल्याने  जाती-पातीची दुकाने उघडून बसणे त्यांची मूलभूत गरज आहे.कोणत्यातरी एका जातीला नायक किंवा खलनायक करून लोकांचे अहंगंड आणि न्यूनगंड प्रज्वलित ठेवणे हा कोणाच्या तरी अस्तित्वाचाच भाग झालाय..
     माणसातले पशुत्व आदिम काळा पासून अनंत काळा पर्यन्त कुठे ना कुठे डोके काढतच असणार आहे.पण फक्त तेव्हढेच हायलाईट करून त्याला जातीयतेचा रंग फासून कुठल्यातरी एका जातीला सतत आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत रहाणे हेच पुरोगामीत्वाचे लक्षण मानले जात आहे. 
     पुढे जाणे,पुढचे पहाणे म्हणजे पुरोगामी असणे. पण प्रत्यक्षात आपण शेकडो -हजारो वर्षापूर्वी घडलेल्या घटनात रमणार की पुढच्या शंभर वर्षाचा विचार करणार? जातीअंत होणार आहे की नव्या काळाला अनुरूप नव्या जाती निर्माण होणार? जातींना विरोध करताना प्रत्येक अनुचित घटनांमध्ये जात शोधून संबंधित जात समूहालाच खलनायक ठरवणार? की तिथेही त्या त्या समाजाचे उपद्रव मूल्य पाहून आपल्या विरोधाची तीव्रता कमी जास्त करणार? हे प्रश्न महत्वाचे आहेत.
        शेकडो वर्षांपूर्वी तत्कालीन सामाजिक परिस्थिती पाहून जी ग्रंथनिर्मिती झाली ती वादातीत रित्या नक्कीच सत्य होती. पण शेकडो वर्षांपूर्वीची सामाजिक परिस्थिती आज जशीच्या तशी आहे का? ते संदर्भ आज आहेत का? जे असतील ते ग्राह्य धरून आणि जे नसतील ते वगळून नव्याने विचार करायची दृष्टी आज आहे का?
        तंत्रसत्ता  आणि धनसत्ता यामुळे नव्याने निर्माण होऊ घातलेल्या आणि झालेल्या "जातीं" कोणा बुद्धीजीवी सामाजिक कार्यकर्त्यांचे लक्ष आहे का? ए आय मुळे निर्माण होणारी नवी व्यवस्था जुन्या व्यवस्थेला आव्हान देत असताना त्यातून होणारी विषमता धर्म आणि जातींच्या पलीकडे असेल. 
        तेव्हा जुन्या त्याच त्याच पठडीतल्या विचारवंतांना सन्मानाने मनातून उतरवून भविष्यातल्या नव्या जातीव्यवस्थेकडे गंभीर पणे विचार करणारा पुरोगामी मनात सन्मानाने बसवला पाहिजे.

-प्रशांत शेलटकर

टीप- वरचा लेख हा माझ्या सामाजिक आकलनाच्या मर्यादेच्या अधीन आहे.याचा प्रतिवाद होऊ शकतो.तो झाला तर मला आनंदच आहे , त्यातून मला नवीन काही शिकता येईल. फक्त प्रतिवाद विधायक असावा)

Thursday, 7 November 2024

ती..

ती....

सर्वस्व गेल्यावर
देव नाही हे कळतं
कसं कोणाला कळेल
आत किती जळतं...?

लोक ना आजकाल
किती हुकमी रडतात..
रडता रडता उगाच
गळ्यातही पडतात

चार दिवसाचे रंग
चार दिवसातच उडतात
एकांतात फक्त
दोन डोळेच रडतात..

न सांगताच गेला तो
अस कस विसरला?
सप्तपदीच्या पाऊल खुणा
असा कसा पुसून गेला..?

दिवस जातो उदास
रात्र भिजून जाते..
अन प्रत्येक क्षणाला 
त्याची आठवण येते..

लग्न म्हणू की 
झाली फक्त भातुकली
इवलुशा संसारात
कुठून शिरला ग कली

देवापुढे आता
डोइ  झुकतच नाही
देवच आता नजरेला 
नजर काही देत नाही

बरे झालेच की आता
पाश आता तुटले..
सात जन्माचे भोग
एका जन्मात भोगले

देवा पेक्षा नियती
नेहमी सरस ठरते
वेळ आली बिकट
तेथे देवाचे ना चालते

आता अंधार भेदून
लावीन म्हणते पणती
कोण काय म्हणतो
त्याची कशास गणती

भोगले जे दुःख त्याचे
मानीन मी उपकार
घावाशिवाय मूर्ती
काय घेईल आकार?

© प्रशांत

Monday, 4 November 2024

अ. ल.क. # -१

अलार्म झाला तसं,तसं त्याने डोळे चोळत मोबाईल उचलला.. डोळे किलकिले करत ..gm चे दहा पंधरा मेसेज.. कबुतरांना दाणे  भिरकावतात तसे भिरकावले आणि त्यांच्या त्यांच्या मॉर्निंग गुड केल्या ..आणि एक जांभई देत..झोपी गेलेला जागा झाला..

-- प्रशांत शेलटकर
  8600583846

अ. ल.क. #-१

अ. ल.क. # -१

अलार्म झाला तसं,तसं त्याने डोळे चोळत मोबाईल उचलला.. डोळे किलकिले करत ..gm चे दहा पंधरा मेसेज.. कबुतरांना दाणे  भिरकावतात तसे भिरकावले आणि त्यांच्या त्यांच्या मॉर्निंग गुड केल्या ..आणि एक जांभई देत..झोपी गेलेला जागा झाला..

-- प्रशांत शेलटकर
  8600583846

चष्मा..

चष्मा.... मित्रा तुझा चष्मा मला दे पाहीन ना जग मी तुझ्या नजरेतून..पण क्षणभरच पण तू ही हे जग बघ ना स्वच्छ नितळ नजरेने चष्म्याशिवाय...... हे च...