Ad

Friday, 22 November 2024

फक्त एवढंच..

फक्त एवढंच...


सुखी हो म्हणायला
मी काय नाही देव
एवढंच म्हणेन तुला
तुझं तुलाच जपून ठेव

आयुष्यात कधी फक्त 
सुखच येत नसतं.
सुखाच्या मागोमाग
दुःख दस्तक देतं
दोन्ही येणार नक्की
फक्त ही जाणीव ठेव
एवढंच म्हणेन तुला
तुझं तुलाच जपून ठेव

समतोल राहील नेहमी
अस कधी जीवन नसत
एका जागीच राहील अस
कधी कोणाच मन नसत
किती कोणात रमायच
हे तुझं तूच लक्षात ठेव
एवढंच म्हणेन तुला
तुझं तुलाच जपून ठेव

सगळे सूर आपलेच रे
वर्ज्य कुठला समजू नये
आरोह अवरोह यायचेच
पुन्हा समेवर उमजून ये
मैफिल तुझ्या आयुष्याची
हसत खेळत चालू ठेव
एवढंच म्हणेन तुला
तुझं तुलाच जपून ठेव

क्षणा-क्षणाचे प्राक्तन
देव सुद्धा सांगत नाही
नियतीची अगम्य पत्रिका
कधी कोणाला कळत नाही
ग्रीष्म येवो अथवा शिशिर
वसंत आतला जागा ठेव
एवढंच म्हणेन तुला
तुझं तुलाच जपून ठेव

सुखी हो म्हणायला
मी काय नाही देव
एवढंच म्हणेन तुला
तुझं तुलाच जपून ठेव

....एवढंच म्हणेन तुला
तुझं तुलाच जपून ठेव

- प्रशांत शेलटकर
  8600583846

No comments:

Post a Comment

चष्मा..

चष्मा.... मित्रा तुझा चष्मा मला दे पाहीन ना जग मी तुझ्या नजरेतून..पण क्षणभरच पण तू ही हे जग बघ ना स्वच्छ नितळ नजरेने चष्म्याशिवाय...... हे च...