Ad

Thursday, 26 September 2024

इथे पुन्हा जन्म नको..

इथे पुन्हा जन्म नको.. 

सत्कार सोहळा चालू असतो..स्टेजवर दांभिक माणसं बसलेली असतात..आपल्याला माहीत असतं की हे सगळे चोर आहेत..तरी देखील आपण हाताची घडी घालून ते पहात असतो..सत्कार करणारा ह्या ...ह्या हसत शाल पांघरतो ..सत्कार घेणारा ह्या ...ह्या हसत सत्कार स्वीकारतो..आणि आपणही ह्या ....ह्या हसत टाळ्या वाजवतो..स्टेज वरचे नैतिकता,देशप्रेम यावर भाषणे झोडतात...पंच घेतात..आपण पंचवर टाळ्या वाजवतो.. खरं तर टाळ्यांची साथ येते..कोणीतरी लोंबता टाळ्या वाजवतो..म्हणून दुसरा वाजवतो..मग तिसरा असे करत साथ येते..वक्ता खुश...स्टेज खुश..एक वांझ आनंद सगळीकडे पसरतो..
... रस्त्यात खड्डे पडलेले असतात..त्या खड्यातून आपण गाडी चालवत असतो..खड्डे का पडलेले असतात हे आपल्याला कळत असते..त्या मागचं लॉजिक कळलेलं असतं..कुठे किती परसेंटेज ते कळलेले असते..आणि हे ही कळलेलं असत की आपण किड्या मुंग्या आहोत..शासन आणि प्रशासन आपलं नाही..राव उतरले आणि पंत चढले तरी काही फरक पडत नाही..निराशेचा गडद झाकोळ आपले मन व्यापून टाकतो..
.... मतदानाची रांग..आपला नंबर येतो..समोर इव्हीएम..भावी मालकांची लिस्ट वाचतो..चांगल्यातला उत्तम निवडायच्या ऐवजी..वाईटा तला बरा निवडायची वेळ येते..आपण आपले मालक निवडतो..पुढे पाच वर्षे आहेच मग ते मॅनेज केलेले दांभिक सत्कार,ती खोटी भाषणे..भाषण करताना त्या सांडलेल्या लाळी..ते रस्ते.. ते खड्डे.. आणि आपली नपुसंक अगतिकता..
    घरी येतो..जपान बद्दल वाचतो,भूतान बद्दल वाचतो..साले कुठल्या जगात आहेत कोण जाणे...आपण पुटपुटतो...हे पुटपुटणे म्हणजेच स्वतःपुरती केलेली सिंहगर्जना असते हल्ली...पुस्तक बंद करून कपाटात ठेवतो..कपाटात कुठेतरी कोपऱ्यात शाळेतले नागरिक शास्त्राचे पुस्तक पडलेले असते..अस वाटतं की त्याची सूरनळी करावी आणि......जाऊदे...कुठे कुठे आणि कोणाच्या?...

-प्रशांत शेलटकर..

Tuesday, 24 September 2024

लूप

लूप...

गाडीला किक मारली..निघालो..
एवढा कशेडी पार झाला की आलंच पोलादपूर..दुपारचे साडे अकरा वाजलेत..उन मी म्हणतंय.. स्पीडो मीटर..40 ते 50 च्या आत बाहेर आहे..वर्दळ फार नाही..त्यामुळे थोडं रोड हिप्नॉसिस..सूर्य डोक्यावर.. समोरच वळण..वळणावरचा ट्रक..थेट अंगावर..गाडी स्लिप..डोळ्यासमोर अंधार..
.....
का कोण जाणे..कसा वाचलो ते कळत नाही..बाईक चालूच आहे..सूर्य अजून डोक्यावर..घड्याळात अजून साडेअकराच वाजत आहेत..पोलादपूरला कधी पोहचणार..? देव जाणे..अजून वळण संपत नाही..की घड्याळातला काटा पुढे सरकत नाही..सूर्य अजून डोक्यावर..गाडीचे फायरिंग तेच ..गिअर तोच..
    ....अजून प्रवास संपलेला नाही..तो चालूच आहे..फक्त हे वळण काही संपत नाही..कदाचित ते संपणारही नाही..अनंतकाळ पर्यन्त..आता कुठे जाणीव होतेय..शेवटचा स्मृतिकण लूप मध्ये अडकलाय..त्याच वळणावर...

-© प्रशांत शेलटकर
      8600583846

Thursday, 19 September 2024

जिंदा दिलं

जिंदादिल....

स्कल कॅप घाल
टक्कल लपव
तरुण दिसण्याची
शक्कल लढव..

मिशी रंगव
केस काळे कर
लोक म्हणोत काहीही
तू आपले चाळे कर

जॉगिंग नाही जमणार
तू नुसता चाल
धावशील तर मात्र
होतील बुरे हाल

ती जर दिसली
तर पोट आत घे
सिक्स पॅक मरो
स्लिम तरी दिसू दे

चालताना जरा
डोळे शेकून घे
मनातल्या मनात
शिट्टी वाजवून घे

काका म्हणेल कोणी
खंत करू नकोस
आजोबा म्हणत नाहीत
तोवर धीर सोडू नकोस

अरे काकवा पण हल्ली
लय भन्नाट दिसतात
वय झाल्यावर हल्ली
बायका म्हणे वयात येतात..

त्या तशा येतात म्हणून
आपलं तारुण्य सरत नाही
वर्षे किती सरली तरी
चाळीशी काय उलटत नाही

असेच जगावे आयुष्य
जिंदादिल आणि बेफिकीर
कपाळावर गोंदवून घ्यावी
आनंदाची कायम लकीर

लोकांना हसायचं तर
बिनधास्त त्याना हसू दे..
हसण्याचे कारण आपण
यातच आनंद असू दे

अर्धी लाकडे मसणात
गेली तर जाऊदे..
अर्धी तर आहेत ना
यात खुशी असूदे..

काळ कधी कोणासाठी
अजिबात नाही थांबत
मग का जगावे सुतकी
अन चेहरा करून आंबट

-☺️ © प्रशांत

Tuesday, 17 September 2024

सुवर्णमध्य

सुवर्णमध्य....

भावना घालते पसारा
बुद्धी घालते आवर
क्षणोक्षणी डोळे ओले
बुद्धी म्हणते सावर..

जस आहे जिथे आहे
तेच दिसते बुद्धीला
आकाश जणू ठेंगणे
भावनेच्या कल्पनेला

भावनेला फक्त हृदय
मेंदू फक्त बुद्धीला
दोन टोकावर दोघीजणी
आपल्या जागी अडलेल्या

आस्वाद घेऊन छान जगावे
भावना म्हणते बुद्धीला
लॉजिक लावून सावध जगावे
बुद्धी म्हणते भावनेला..

दोघाचे असे वाद होताना
विवेक मात्र शांत असतो
एकेक पाऊल मागे घ्या
दोघींनाही तो विनवतो

भावना बुद्धी दोन्ही हव्यात
आयुष्य हे जगताना..
कुठे थांबायचं कळलं पाहिजे
मार्ग आपले चालताना

का? कसे? केव्हा ? कधी
बुद्धी मांडते याचेच लॉजिक
भावना म्हणते बुद्धीला
आनंदाची अनुभव मॅजिक

थकून जेव्हा दोघी जाती
तेव्हा विवेक येतो कामी
तारतम्य असावे जगताना
नकोच नुसते मी मी..

डावं उजवं दोन्ही टाळू
एक असावा सुवर्णमध्य
मेंदूत जरी असले लॉजिक
हृदयाने गावे पद्य....

-© प्रशांत..

Friday, 13 September 2024

कफल्लक

कफल्लक...

किती बेरजा
किती वजाबक्या
थोडे गुणाकार
खूपसे भागाकार..
हिय्या करून  थोडासा
पाहिली जेव्हा शिल्लक
मग कुठे कळले
अरे मी कफल्लक
अरे मी कफल्लक...

थोडेच भेटले
खूपसे घटले..
जे आपले वाटले
तेच तर आधीच फुटले
बेरीज कमी
वजावट जास्त
गणपतीचा पत्ता नाही
सजावटच जास्त..
थोडेच जण भोळे
बाकी सगळे तल्लख
मग कुठे कळले
अरे मी कफल्लक
अरे मी कफल्लक...

आयुष्याचा ताळेबंद
जुळलेला दिसतोय
नफा की तोटा?
अजून कुठे कळतोय
येण्यापेक्षा झाले
देणेच फार.
तरतुदी करून करून
जीव बेजार..
वर्षे संपत आल्यावर
समजून आली गल्लत
मग कुठे कळले
अरे मी कफल्लक
अरे मी कफल्लक...

उधळ माधळ 
खूप झाली
आता काटकसर 
झाली पाहिजे
गेले ते जाऊदे
उरलेल्याना 
जपलं पाहिजे....
मोजकीच माणसं
आता जवळ असू दे
रोषणाई हवी कोणाला?
देव्हाऱ्यात एक पणती लागू दे...
आयुष्याच्या अखेरीस तरी
असावी काही श्री शिल्लक
असू नये देवा मी
पुढच्या जन्मीही कफल्लक
पुढच्या जन्मीही कफल्लक

© प्रशांत..

Wednesday, 11 September 2024

मॅनर्स

मॅनर्स...

मॅनर्स पाळायच्या नादात आपण कृत्रिम आणि दांभिक होतोय का? ऑफिसमधले कॉर्पोरेट मॅनर्स आपण कुटुंबात सुद्धा आणतोय का? आपल्या सॉरी मध्ये खरंच अपराधीपणा आहे की ते केवळ शब्द? आपल्या थँक्स मध्ये खरंच ती कृतज्ञता उतरते की चेहरा कोरडा ठेवून आपण थँक्स बोलून जातो..आपण केलेले दुसऱ्याचे कौतुक हे शंभर नंबरी कौतुकच असते की ते आतल्या मत्सराचे वरवरचे अस्तर?
     कधी कधी शांत बसून हे प्रश्न आपण स्वतःलाच विचारले पाहिजेत. जगण्यातला , साद-प्रतिसाद देण्यातला नैसर्गिकपणा हरवून गेलाय हल्ली..हल्ली प्रतिसाद सुद्धा तर्क -कसोट्याची चाळण लावून येतो..आपले हसणे पण चूळ भरल्या सारखे येते..पु लं चे जुने एकपात्री कार्यक्रम पहा..लोक किती निरागस आनंदाने खळखळून हसत होते..त्याचे कारण ते कार्यक्रमाशी एकरूप होत होते..आता मनोरंजनाचे अनेक प्लॅटफॉर्म असल्याने,आणि सतत तो आदळत असल्याने त्यातले नावीन्य संपले.. मग लोकांना हसवायला त्याच्या आदिम भावनेला साद घालणे चालू झाले. विनोद नागडा झालाय हल्ली..एकूणच आपण सर्वच बाबतीत आदिम भावनेच्या पातळीवर उतरत चाललोय..आणि ते उतरणे पण प्रोफेशनल होत जातं आहे. मॅनर्स चे अवास्तव स्तोम म्हणजे स्वतःचा भेसूर चेहरा लपवण्याचा जणू मुखवटाच..
    जिथे राग आहे तिथे प्रेमही आहे.. पण जिथे केवळ प्रेमच प्रेम असते.. तिथे स्वार्थ लपलेला असतो..हल्ली बुद्धिबळ केवळ खेळ राहिलेला नाही, ती एक जीवन जगण्याची स्ट्रॅटेजी होऊन बसली आहे..माणूस हेरा, माणूस वापरा आणि माणूस फेकून द्या..आणि हे सगळे विथ मॅनर्स करा..मग झालातच तुम्ही यशस्वी...

© प्रशांत शेलटकर

Tuesday, 10 September 2024

मास्तर

मास्तर....

मास्तर तुम्ही म्हणालात,
तू फक्त लढ..
तेव्हापासून फक्त लढतोय मास्तर
लढतोय परिस्थितीशी
इथल्या व्यवस्थेशी..
आणि स्वतःशी सुद्धा..

मास्तर स्वतःशीच लढता लढता
कणा मोडून पडलाय आता
मास्तर तुमच्या विचारांचा
मास्तर तुमच्या तत्वांचा
जागो जागी होतोय पराभव
मास्तर बाहेर लढता येत हो
पण आतलं काय..?
सगळा मेंदूच ताब्यात घेतलाय
कार्पोरेटी बांडगुळानी..
चरसी झाकोळ आलाय
प्रत्येक पेशीवर..
मग सांगा मास्तर..
लढायचं कसं ?आणि कोणाशी?

मास्तर एक गुर्जी सांगायचे
खरा तो एकची धर्म..
जगाला प्रेम अर्पावे..
पण त्या गुर्जीना पण
आत्महत्या करावी लागलीच ना
गेले बिचारे..
त्याना कुठे माहीत होतं
प्रेम म्हणजे ओन्ली गिव्ह अँड टेक
मग सांगा मास्तर
कसं लढायचं आम्ही?

मास्तर, 
आजवर फक्त लढत आलो
तुमच्या शब्दांची तलवार केली
आणि तुमचा पाठीवरचा हात
हीच एक ढाल झाली..
पण मास्तर आता थकत चाललो
जिंकलो जिंकलो वाटलं
आणि परत परत हरत चाललो

मास्तर, आता तलवार तुटली
मास्तर, आता ढाल फुटली..
कदाचित तुमचा हात..
परत खिशाकडे जाईल..
मदत म्हणून थोडे पैसे
खिशातून बाहेर येतील..
पण मास्तर आता काहीच नको
चिखल असू दे तसाच
सवयच झाली हो त्याची..
आणि कारभारीण?
तिची काळजी नाय मास्तर
लाडक्या बहिणीची काळजी
हाय सरकारला..
पण मास्तर..
ती तेवढी कविता परत घ्या
फारच सलत रहाते आजकाल..
ती एकदा परत घेतलात की
कोडगेपण मिरवीन म्हणतो
आणि हो मास्तर...
 एक सांगायचं राहीलं
जमेल तशी काळजी घ्या..
प्रदूषण वाढलंय आजकाल..

-- तुमचाच एक कर्दमलेला विद्यार्थी....

© प्रशांत शेलटकर

चष्मा..

चष्मा.... मित्रा तुझा चष्मा मला दे पाहीन ना जग मी तुझ्या नजरेतून..पण क्षणभरच पण तू ही हे जग बघ ना स्वच्छ नितळ नजरेने चष्म्याशिवाय...... हे च...