कफल्लक...
किती बेरजा
किती वजाबक्या
थोडे गुणाकार
खूपसे भागाकार..
हिय्या करून थोडासा
पाहिली जेव्हा शिल्लक
मग कुठे कळले
अरे मी कफल्लक
अरे मी कफल्लक...
थोडेच भेटले
खूपसे घटले..
जे आपले वाटले
तेच तर आधीच फुटले
बेरीज कमी
वजावट जास्त
गणपतीचा पत्ता नाही
सजावटच जास्त..
थोडेच जण भोळे
बाकी सगळे तल्लख
मग कुठे कळले
अरे मी कफल्लक
अरे मी कफल्लक...
आयुष्याचा ताळेबंद
जुळलेला दिसतोय
नफा की तोटा?
अजून कुठे कळतोय
येण्यापेक्षा झाले
देणेच फार.
तरतुदी करून करून
जीव बेजार..
वर्षे संपत आल्यावर
समजून आली गल्लत
मग कुठे कळले
अरे मी कफल्लक
अरे मी कफल्लक...
उधळ माधळ
खूप झाली
आता काटकसर
झाली पाहिजे
गेले ते जाऊदे
उरलेल्याना
जपलं पाहिजे....
मोजकीच माणसं
आता जवळ असू दे
रोषणाई हवी कोणाला?
देव्हाऱ्यात एक पणती लागू दे...
आयुष्याच्या अखेरीस तरी
असावी काही श्री शिल्लक
असू नये देवा मी
पुढच्या जन्मीही कफल्लक
पुढच्या जन्मीही कफल्लक
© प्रशांत..
No comments:
Post a Comment