मॅनर्स...
मॅनर्स पाळायच्या नादात आपण कृत्रिम आणि दांभिक होतोय का? ऑफिसमधले कॉर्पोरेट मॅनर्स आपण कुटुंबात सुद्धा आणतोय का? आपल्या सॉरी मध्ये खरंच अपराधीपणा आहे की ते केवळ शब्द? आपल्या थँक्स मध्ये खरंच ती कृतज्ञता उतरते की चेहरा कोरडा ठेवून आपण थँक्स बोलून जातो..आपण केलेले दुसऱ्याचे कौतुक हे शंभर नंबरी कौतुकच असते की ते आतल्या मत्सराचे वरवरचे अस्तर?
कधी कधी शांत बसून हे प्रश्न आपण स्वतःलाच विचारले पाहिजेत. जगण्यातला , साद-प्रतिसाद देण्यातला नैसर्गिकपणा हरवून गेलाय हल्ली..हल्ली प्रतिसाद सुद्धा तर्क -कसोट्याची चाळण लावून येतो..आपले हसणे पण चूळ भरल्या सारखे येते..पु लं चे जुने एकपात्री कार्यक्रम पहा..लोक किती निरागस आनंदाने खळखळून हसत होते..त्याचे कारण ते कार्यक्रमाशी एकरूप होत होते..आता मनोरंजनाचे अनेक प्लॅटफॉर्म असल्याने,आणि सतत तो आदळत असल्याने त्यातले नावीन्य संपले.. मग लोकांना हसवायला त्याच्या आदिम भावनेला साद घालणे चालू झाले. विनोद नागडा झालाय हल्ली..एकूणच आपण सर्वच बाबतीत आदिम भावनेच्या पातळीवर उतरत चाललोय..आणि ते उतरणे पण प्रोफेशनल होत जातं आहे. मॅनर्स चे अवास्तव स्तोम म्हणजे स्वतःचा भेसूर चेहरा लपवण्याचा जणू मुखवटाच..
जिथे राग आहे तिथे प्रेमही आहे.. पण जिथे केवळ प्रेमच प्रेम असते.. तिथे स्वार्थ लपलेला असतो..हल्ली बुद्धिबळ केवळ खेळ राहिलेला नाही, ती एक जीवन जगण्याची स्ट्रॅटेजी होऊन बसली आहे..माणूस हेरा, माणूस वापरा आणि माणूस फेकून द्या..आणि हे सगळे विथ मॅनर्स करा..मग झालातच तुम्ही यशस्वी...
© प्रशांत शेलटकर
No comments:
Post a Comment