Ad

Tuesday, 10 September 2024

मास्तर

मास्तर....

मास्तर तुम्ही म्हणालात,
तू फक्त लढ..
तेव्हापासून फक्त लढतोय मास्तर
लढतोय परिस्थितीशी
इथल्या व्यवस्थेशी..
आणि स्वतःशी सुद्धा..

मास्तर स्वतःशीच लढता लढता
कणा मोडून पडलाय आता
मास्तर तुमच्या विचारांचा
मास्तर तुमच्या तत्वांचा
जागो जागी होतोय पराभव
मास्तर बाहेर लढता येत हो
पण आतलं काय..?
सगळा मेंदूच ताब्यात घेतलाय
कार्पोरेटी बांडगुळानी..
चरसी झाकोळ आलाय
प्रत्येक पेशीवर..
मग सांगा मास्तर..
लढायचं कसं ?आणि कोणाशी?

मास्तर एक गुर्जी सांगायचे
खरा तो एकची धर्म..
जगाला प्रेम अर्पावे..
पण त्या गुर्जीना पण
आत्महत्या करावी लागलीच ना
गेले बिचारे..
त्याना कुठे माहीत होतं
प्रेम म्हणजे ओन्ली गिव्ह अँड टेक
मग सांगा मास्तर
कसं लढायचं आम्ही?

मास्तर, 
आजवर फक्त लढत आलो
तुमच्या शब्दांची तलवार केली
आणि तुमचा पाठीवरचा हात
हीच एक ढाल झाली..
पण मास्तर आता थकत चाललो
जिंकलो जिंकलो वाटलं
आणि परत परत हरत चाललो

मास्तर, आता तलवार तुटली
मास्तर, आता ढाल फुटली..
कदाचित तुमचा हात..
परत खिशाकडे जाईल..
मदत म्हणून थोडे पैसे
खिशातून बाहेर येतील..
पण मास्तर आता काहीच नको
चिखल असू दे तसाच
सवयच झाली हो त्याची..
आणि कारभारीण?
तिची काळजी नाय मास्तर
लाडक्या बहिणीची काळजी
हाय सरकारला..
पण मास्तर..
ती तेवढी कविता परत घ्या
फारच सलत रहाते आजकाल..
ती एकदा परत घेतलात की
कोडगेपण मिरवीन म्हणतो
आणि हो मास्तर...
 एक सांगायचं राहीलं
जमेल तशी काळजी घ्या..
प्रदूषण वाढलंय आजकाल..

-- तुमचाच एक कर्दमलेला विद्यार्थी....

© प्रशांत शेलटकर

No comments:

Post a Comment

चष्मा..

चष्मा.... मित्रा तुझा चष्मा मला दे पाहीन ना जग मी तुझ्या नजरेतून..पण क्षणभरच पण तू ही हे जग बघ ना स्वच्छ नितळ नजरेने चष्म्याशिवाय...... हे च...