यशश्री शिंदे च्या निमित्ताने..
अपवाद वगळता,सध्याची तरुण पिढी स्वतःच्या विश्वात रमणारी आहे..ती करिअरिस्ट असल्याने ती त्यासंबंधीच विषयावर फोकस करत रहाते.. ती अवांतर वाचन करत नाही..ती पेपर वाचत नाही,न्यूज ऐकत आणि पहात नाही..समाजाशी काही देणे घेणे नाही..घरात सामाजिक विषयावर चर्चा नाही. ही पिढी सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते पण इंस्टा सारख्या माध्यमावर सामाजिक विषय येतच नाही. आणि अशा मुलांचे फ्रेंड सर्कल त्यांच्याच वयाचे असल्याने त्यांचे विश्व वास्तवापासून दूर असते.
पालक आणि मूल यांचा संवाद तुटत जात आहे..जर घरात मुलांशी संवाद नसेल ,दुरावा असेल तर मुलं अन्य ठिकाणी प्रेम वगैरे शोधते. पालक आणि मुले यांच्यात संवाद नाही कारण पालक आपल्या विश्वात रमलेले असतात ते काळाच्या गतीबरोबर चालत नाहीत.त्यामुळे मुलांचे आणि त्याचे विचार मेळ खात नाही. बदलत्या काळाबरोबर मुले अडजेस्ट करतात.पालकांना ते कठीण जाते.
पालक आणि मूल यांच्यात संवाद होत नाही याचे कारण मुलांच्या प्रश्नांची उत्तरे पालकांकडे नसतात .." गप बस्स" हे काही सगळ्या प्रश्नावरचे उत्तर नाही.किंबहुना कोणत्याच प्रश्नावरचे नाही..मुळात पालकच स्वतःला अपडेट ठेवत नाहीत.वयात येणाऱ्या मुलांचे समुपदेशन पालक या नात्याने केलं पाहिजे. हल्ली शाळेतून केले जाते पण ते बहुधा मुलींचे असते.मुलांचे समुपदेशन जास्तच गरजेचे आहे.ते होत नाही मुलांना गृहीत धरले जाते.हा शालेय पातळीवरचा एक सूक्ष्म लिंगभेद म्हणावा का?
मुलगा आणि मुलगी हा भेद कुटुंबाच्या पातळीवर केला जातो ,पण हल्ली बहुधा सिंगल चाईल्ड जास्त असल्याने.मूल ओव्हर प्रोटेक्टेड असण्याची शक्यता जास्त असते.मूल ज्याची मागणी करते ते तात्काळ दिल्यामुळे नकार स्वीकारायची सवय लागतच नाही. मग तेच मूल मोठ्या वयात नकार पचवू शकत नाही.
लैंगिक समुपदेशन ही काळाची गरज आहे, " " मोबाईल वर एका क्लिक वर पोर्नसाईट्स उपलब्ध आहेत.त्या पालकांना मोहात पाडू शकतात तर मुलांचे काय..."आपोआप कळेल" भ्रमातून पालकांनी बाहेर येणे गरजेचे आहे. चुकीच्या गोष्टीच आपोआप कळत जातात. या बाबतीत आई जर मुलीची मैत्रीण बनली तर समुपदेशन घरच्या घरी होऊन जाईल.त्यामुळेच मुलं आणि पालक यात संवाद असणे आवश्यक आहे.सोशल मीडिया हा अल्लाउद्दीन चा दिवा आहे ,कधी आणि कुठे घासायचा हे कळायला हवं..
- प्रशांत शेलटकर
8600583846