मनातल्या सुखद आणि दुःखद भावनांना एखादे पुस्तक वाट करून देते मग ते पुस्तक आणि तो लेखक आवडायला लागतो. आपल्या भावनेशी जुळणारे लेखन प्रत्येकालाच आवडते..
पण यात एक वेगळीच गंमत असते, मी केवळ मला आवडणाऱ्या,माझ्या मताशी आणि मनाशी जुळणारी पुस्तकं वाचत गेलो तर माझेच जग खरे वाटायला लागते. पण इतपत ठीक आहे पण माझेच जग खरे हे वाटायला लागणे धोकादायक.. त्यातून वैचारिक गुलाम (झोंबी) निर्माण होतात. स्वतःचे लॉजिक हरवते लेखकाचे लॉजिक खरे वाटायला लागते.तिथून पुढे व्यक्ती पूजा निर्माण होते.
वाचकाला आपल्याच पद्धतीने विचार करायला लावणे हे लेखकाचे मोठे यश असते.यालाच ब्रेनवॉश म्हणतात. "स्वतःला" शाबूत ठेवून वाचणे अवघड असते. पण परस्पर विरोधी वाचायची सवय असेल तर मजकूराला आपोआपच फिल्टर लागतात. प्रश्न निर्माण होत जातात. धार्मिक पुस्तक वाचताना अस होतच पण वैज्ञानिक पुस्तके वाचताना सुद्धा हे फिल्टर लागतात.नव्हे ते लागलेच पाहिजे.
परस्पर विरोधी वाचन केले की विचार करण्यात सुद्धा समतोल येतो ..कुठलंही एक टोक गाठलं जात नाही. दुर्दैव असे आहे की एकतर्फी मांडणी करणारे लोकप्रिय होत आहेत कारण ते लोकांच्या मनातलं बोलत आहेत. सत्य सांगणे या पेक्षा लोकानूनय करणे सोपे असते.ब्लॅक अँड व्हाईट मांडणी कळायला सोपी असते. आणि जे सोपं आहे ते लिहिलं की ते लोकप्रिय होत.आणि असे लिहिणारे सुद्धा लोकप्रिय होतात..
इतिहास अभ्यासताना तर वेगळीच गंमत असते,एक तर तो शंभर हजार वर्षा पूर्वी घडून गेलेला असतो ..जसे जसे संशोधन होत जाते तसा तसा तो उलगडत जातो.पण आम्हाला नायक आणि खलनायक ठरवायची इतकी घाई असते की सगळे संशोधन पूर्ण झाल्यासारखे अंतिम निष्कर्ष काढून आपण मोकळे होतो. कारण इतिहासात ल्या चुकांचे खापर कोणावर तरी फोडायची घाई झालेली असते.
आज प्राचीन संस्कृत व पाली भाषा थेट व्यवहारात नाहीत त्यामुळे आपण त्या भाषांशी तितके संलग्न नाही, जे कोणी लोक भाषांतर करतात त्यांच्यावर आपण पूर्ण अवलंबून असतो. त्या भाषांतरावर भाषांतरकाराचा अभ्यास ,व्यासंग, त्याचे पूर्वग्रह त्याचा प्रदेश ,त्याचे आकलन ,मूळ संस्कृत किंवा पाली शब्दाचे त्याने लावलेले अर्थ या सर्वांचा परिणाम होतो, आणि तोच परिणाम भाषांतर वाचणाऱ्यावर होतो , आपण जेव्हा इतरांना पुस्तकांचे संदर्भ देतो तेव्हा एक गोष्ट लक्षात घेतले पाहीजे की संदर्भ दिले म्हणजे ते सत्यच असले पाहिजे असे नाही.
स्वतंत्र बुद्धीने आपणही कधीं तरी विचार केला पाहिजे.फुलबाजासारखी आतषबाजी करण्यापेक्षा पणती सारखे मंद तेवत राहिले पाहिजे.
-प्रशांत शशिकलाकांत
8600583846
No comments:
Post a Comment