Ad

Thursday, 18 July 2024

रेजातला पाऊस..

रेजातला पाऊस...

खिडकीच्या रेजापलीकडचा
अखंड..अविरत पाऊस
तो एकटक पहात बसतो...
त्याच्याही डोळ्यात..
आषाढ दाटून आलाय…
तरीही तो पहातोय
रेजापलीकडला एकटक पाऊस

पलीकडच्या वळणावर
एक ठिपका येताना दिसेल
तीच असेल का?
त्याच्या डोळ्यात भरलेलं आभाळ
त्याचे रेजावरचे हात घट्ट होतात
रेजातला पाऊस अजून बेफाम

होय तीच ती..
फाटक्या छत्रीने आभाळ पेलणारी
दुसरी कोण असेल? आईशिवाय.
ठिपका जवळ येतो..
नव्हे वात्सल्य जवळ येते..
रेजातला तो धावत सुटतो..

रडवेलं अधीर बाल्य 
तिच्या वत्सल कुशीकडे झेपावत.
तिचा ओला चिम्ब हात
त्याच्या कुरळ्या केसात फिरत रहातो..

इतक्यात आभाळात लख्ख होतं
भिंतीवर लावलेला आईचा फोटो
क्षणभर उजळतो..
रेजाजवळ उभा राहू नकोस रे
काळजीचे आभासी स्वर

रेजा पलीकडचा पाऊस ..
आता अधिकच झालाय..
त्याच्या डोळ्यातून सुद्धा
आता आभाळ वहातेय..

रेजापलीकडचा पाऊस
आता उद्दाम झालाय.
आता छप्परही गळतय
आई नसल्यावर 
दुसरं काय होणार?
आता छप्पर गळणार
रेजापलीकडचा पाऊस
आता आत येणार..
आई नसल्यावर 
दुसरं काय होणार?

-© शशिकलाकांत

No comments:

Post a Comment

अनय

अनय.. लोक करतात राधे राधे  पण त्या अनयच काय  दुःख त्याचे मूक अनावर  कोण लक्षात घेत काय? सात फेरे आणि आहुती  त्यानेही दिली असेलना सुखी संसारा...