Ad

Monday, 15 July 2024

चिकित्सा..

ऐतिहासिक व्यक्ती या माणूसच असतात, द्वेष ,मत्सर,लोभ, राग त्यांच्यातही होते..पण त्यांची काही कार्य इतकी असामान्य असतात की ती कार्येच त्याना इतिहासात स्थान देतात. इतिहासाचा अभ्यास म्हणजे ऐतिहासिक व्यक्तींच्या प्रेमात पडून त्यांचे उदात्तीकरणं करणे नव्हे तसेच ऐतिहासिक व्यक्तींच्या चुका दाखवून त्याना पूर्णपणे खलनायक दाखवणे नव्हे.
    कोणत्याही ऐतिहासिक व्यक्तीवर जसे आंधळे प्रेम करू नये तसे आंधळा द्वेषसुद्धा करू नये. हे नायक - खलनायक चे खेळ थांबवून ऐतिहासिक घटना आणि व्यक्तींची वस्तूनिष्ठ पद्धतीने चिकित्सा केली पाहिजे. डोक्यावर घेणे आणि पायदळी तुडवणे या दोन्ही गोष्टी टाळल्या तरच अभ्यासात तटस्थपणा येतो .अन्यथा लोकप्रिय होण्याचा मोह असेल तर लोकांना आवडेल तेच मांडायचा प्रयत्न चालू रहातो. लोकप्रिय असण्याचा आणि वस्तूनिष्ठ असण्याचा नेहमीच संबंध असेल असे नाही.
    शंभर वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या व्यक्ती तत्कालीन उपलब्ध असलेल्या ऐतिहासिक दस्त ऐवजा वरून व्यक्त झालेल्या असतात, शिवाय त्या ज्या कुटुंबात जन्मलेल्या असतात तिथले संस्कार आणि पूर्वग्रह  यांचा पगडा त्यांच्यावर असतोच त्यानुसार त्या व्यक्त झालेल्या असतात. शंभर वर्षांपूर्वी लाखो माणसे जन्माला आली आणि गेली त्यातले काही शेकडा लोकांची आज शंभर वर्षांनंतर दखल घेतली जाते याचा अर्थ काहीतरी ठोस कार्य त्याच्याकडून झालेले आहे हे तर नक्की..आता हे जे कार्य झालय त्याची चिकित्सा आज उपलब्ध असलेल्या पुराव्यानुसार आणि लॉजिक नुसार झालीच पाहिजे. त्यानी केलेली चांगली कामे आणि चुकीची कामे एकाच वेळी मांडण्यात येणे म्हणजे वस्तूनिष्ठ इतिहास अभ्यासणे. दोष झाकून केवळ गुण सांगणे ,आणि गुण झाकून केवळ दोष सांगणे ,त्यांची जात वार विगतवारी करणे चूकच..एकाच वेळी गुणदोष मांडणे आणि बाकी सगळे समाजावर सोपवले  की समाजापर्यंत केवळ चांगल्या किंवा केवळ वाईट गोष्टी जात नाहीत.समाज व्यक्तीनिष्ठते कडून वस्तूनिष्ठते कडे जातो.

-प्रशांत शेलटकर..

No comments:

Post a Comment

कविता..

कविता.. शिट्ट्या आणि टाळ्यांसाठी...  ती  नसते उभी कधीच स्टेज वर... मला आत्मभान देत , जागं करणारी  असते माझी कविता.. नेणिवेत ती असतेच सतत तरं...