विश्वातला माणूस की माणसाचे विश्व?
भाग-3
माणूस हा विश्वापासून वेगळा आहे? की तो विश्वाचाच भाग आहे? तो विश्वाचाचा भाग असेल तर तो विश्वाचेच आकलन कसे करू शकतो? स्वतःचे डोळे स्वतःलाच कसे पहातील?
हे विश्वनिर्माण झाले त्यातून माणूस निर्माण झाला. बरं झाला तो झाला त्या प्रक्रियेत त्याचा मेंदू इतका विकसित झाला की की तो आपल्याच निर्माण प्रक्रियेचे आकलन करू लागला, का आणि कसे हे प्रश्न विचारू लागला? मुळात ही प्रेरणा आली कुठून?
आणि हाच प्रश्न बिगबँग ला विचारू शकतो की, बाबा तू झालास म्हणून हे विश्व निर्माण झाले कबूल पण तू झालासच का? आणि कशासाठी? तुला कोणीतरी जाणून घ्यावे म्हणून तू अब्जावधी वर्षांनी माणूस जन्माला घातला का?
हे प्रश्न जसे विज्ञानाला पडले तसे अध्यात्मालाही पडले, द्वैत विचारते,कोsहम ..मी कोण आहे? अद्वैत उत्तर देते सोs हम
"तो मीच आहे" किंवा तो तूच आहेस? देह म्हणजे एक आकार आहे तो टेम्पररी आहे.पण त्यात जे चेतन आहे ते वैश्विक चेतनेशी जोडले गेले आहे. त्या वैश्विक चेतनेला स्वतःलाच स्वतः जाणून घेण्याची इच्छा झाली म्हणून तिने देह निर्माण केले का? फारच गुंतागुंतीचा प्रश्न.. स्वतःच स्वतःकडे पहायच कारण स्वतःलाच स्वतःला जाणून घेण्याची प्रेरणा स्वतःच निर्माण होते. फार तर स्वयंप्रेरणा म्हणूया पण यात "स्वयं" कोण? माणूस की माणसाचा मेंदू? की देहात असलेले चेतन?? डोक्यात एकदम केमिकल लोचा होतो..
बरं हे प्रश्न फक्त अध्यात्मालाच पडतात का? विज्ञानाचा प्रवास पण असाच इंटरेस्टिंग आहे. विज्ञानाच्या प्रथम टप्प्यात अस मान्य होत की सर्व जडच (मॅटर) आहे, पण नंतर लक्षात आलं की सगळंच काही जड नाही ,त्यात चेतन (एनर्जी) पण आहे. पुढच्या टप्प्यावर लक्षात आलं की सर्वच विश्व कण आणि लहरींनी बनले आहे. पार्टीकल अँड वेव्हज थियरी..अगदी जो जड ( मॅटर) समजला गेलेला दगड ही कणांनी बनलेला आहे..जसे सूक्ष्मात जाऊ तसे लक्षांत येत की दगडाच्या अणूमध्ये इलेक्ट्रॉन गतिमान असतो.
अध्यात्म म्हणजे कर्मकांड नाही अस समजलं तर कधी कधी वाटत की विज्ञान आणि अध्यात्म या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आकलनाचे निकष आणि मार्ग वेगळे आहेत इतकच.
बरं त्यातही एक गंमत आहे,विश्वाचे आकलन फक्त माणूसच करू शकतो? प्राणी करत नसतील? त्यांच्या पद्धती वेगळ्या असू शकतील. बर विश्वाच्या महाप्रचंड विस्तारात आपण एकटेच असू? आपल्या एलियन बंधूचे वेगळे विज्ञान आणि अध्यात्म असू शकते. जगण्यासाठी ऑक्सिजनची गरज माणूस नावाच्या प्राण्याला असते, पृथ्वी शिवाय अन्य ग्रहावर ऑक्सिजन नाही म्हणून तिथे जीवसृष्टी नाही अस आपण ठामपणे म्हणू शकत नाही.मिथेन वर जगणारी प्राणिसृष्टी असू शकते ना भाऊ...?
भाग-3
प्रशांत शेलटकर
8600583846
30/06/2021