Ad

Tuesday 8 June 2021

व्यंजन जोड्या

अस म्हणतात की लग्नाच्या गाठी स्वर्गातूनच जुळून आलेल्या असतात..आणि हे माणसाच्याच बाबतीत असतं अस ही नाही पदार्थांच्या बाबतीतही शक्य आहे.
बघा ना मिसळीची जोडी पावाशिवाय जमुच शकत नाही.तिखट मिसळीचा पावा सारखा सौम्य जोडीदार शोधूनही सापडणार नाही..पावाची जोडी उसळीशीही जमते पण ती खुलत नाही...ती घरच्यांनी जमवून दिलेल्या लग्नासारखी वाटते..अगदी तडजोड म्हणून मिसळ-पावाची  लग्नगाठ मात्र जणू स्वर्गातूनच जुळून आलेली..
        बासुंदी-पुरी या खरतर जिवलग मैत्रिणी..दोघींना एकमेकींशिवाय करमतच नाही.. पण जोडीदार म्हणून पुरीला कूर्माच शोभून दिसतो.. कुर्मा-पुरी ही जोडी तशीच स्वर्गातूनच गाठ बांधून आलेली..बिचारी बासुंदीला जोडीदारच नाही...ती अविवाहितच राहते तिला तडजोड करायलाच आवडत नाही..जिलेबीच एक बर असत ती स्वतः सुंदर असली तरी तिला गर्व नाही ..मठ्ठ असला तरी मठ्ठयाशी ती सूत जुळवते आणि मठ्ठा-जिलेबीचा संसार सुखाचा होतो..
       व्यंजनाच्या दुनियेत वडा-पाव म्हणजे ही दोस्ती तुटायची न्हाय या कॅटेगरीतले..दोघांची जोडी लय फेमस..पण या वड्याला पण जोडीदारच नाही..कधीतरी लिव्ह अँड रिलेशनशीप मध्ये राहतो तो चटणीबरोबर..पण ते नातंच कोणाला फार पसंद नाही..मग कधीतरी सांबाऱ्यात उडी मारून जीव देतो बिचारा..
      पाव बिचारा अगदी साधा त्याचे नखरे नसतात..त्याच्याकडे चवींची मिजास नसते..तो फक्त वयोमानानुसार शिळा होतो..त्याच्या या सालस स्वभावामुळे त्याला मित्र -मैत्रिणी खूप, वडा-पाव,मिसळ-पाव, उसळ-पाव, भुर्जी-पाव, अंडा-पाव, पाव-भाजी कोणाशीही पटत त्याचे...
      व्यंजनाच्या गोतावळ्यात एक समाजसेवी जोडपे राहूनच गेले...झुणका-भाकर...झणझणीत झुणक्याला गरिबाघरची लेक भाकरीच सांभाळून घेऊ शकते..झुणका स्वभावाने तिखट असला तरी भाकरी त्याला सांभाळून घेते...हे जोडपं गरीब आहे..आणि त्याना एक मूल देखील आहे बरं का कांदा नावाचं....
     सगळयांच्या गाठी स्वर्गातच बांधलेल्या..त्या तशाच शोभून दिसतात नाही का....

प्रशांत शेलटकर
8600583846

No comments:

Post a Comment

कौशल्यम सर्वत्र पुज्यते

कौशल्यम सर्वत्र पुज्यते... ज्याचा मेंदू शाबूत तो प्रत्येक माणूस बुद्धिमान- मा.अविनाश धर्माधिकारी..     बुध्दीमत्तेविषयीच्या रूढ आणि पारंपरिक...