Ad

Sunday, 28 February 2021

सावरकर स्वातंत्र्यवीरच...

सध्या सावरकरांविषयी ते माफीवीर होते म्हणून टीका केली जाते.ज्याने कोणी हा शब्द शोधून काढला त्याच्या अकलेची कीव करावी अशी वाटते. पण यात नवीन असे काही नाही.सध्या प्रखर राष्ट्रवादी नेत्यांचे चारित्र्यहनन चालू आहे. आणि हे एक अजेंडा ठरवून केले जात आहे.

वरवर पाहता ते इतिहास संशोधन वाटेल, पण हे सगळे पूर्वनियोजित असते .जनमानसात स्थान मिळालेल्या ऐतिहासिक व्यक्तींचे चारित्र्यहनन करायचे ठरले की प्रथम त्या व्यक्तीच्या आयुष्यात घडलेल्या घटनांचा अभ्यास करायचा त्यातून चुकीचे अर्थ काढून त्याचा प्रसार वेगाने करायचा 
     

Saturday, 27 February 2021

नाश्ता

रविवासरे प्रातः समये
वदली मम जाया..
बहुत केली व्यंजने मी
उठा ना हो खाया..

ऐकोनी ते शब्द प्रेमळ
मी अचंबित झालो
फेकून देऊन पांघरुणाते
मी ताडकन उठलो

करून वेगे दंतधावन
मी वेगे तयार झालो
पटकन जाऊन पाटावर
मी खाया बसलो..




अन वेगे मुख

दोस्ती

काय करू मित्रा
आपली दोस्ती राहिली असती
पण इतिहासात तुझ्या पूर्वजांनी
माझ्या पूर्वजांवर अन्याय केलाय ना?

वाचलं ना मी परवा एका पुस्तकात
भलतेच विद्वान होते ते लेखक
कबरी खणू खणू लय अभ्यास
केला राव त्यांनी..
अनेक बलात्कारी सांगाडे,
बाहेर काढुन त्याचा डी एन ए 
तपासलाय राव त्यांनी...
काय करू मित्रा
आपली दोस्ती राहिली असती
पण तुझा आणि त्या सांगाड्याचा दि एन ए
एकच आहे, आताच वाचलं मी 
त्यांच्या भलत्याच जाड पुस्तकात

काय करू मित्रा
आपली दोस्ती राहिली असती
तरी पुस्तकं वाचू वाचू ,
मी विद्वान झालो ना आता
जरी आपण एकत्र खेळतो
शाळेत गेलो, भांडलो असतो
तरी आपल्या पूर्वजांनी
केलेल्या पापाचे हिसाब 'किताब
तुला आणि मला केलेच पाहिजेत ना

काय करू मित्रा,
आपली दोस्ती राहिली असती
पण पुस्तक वाचता वाचता 
तुला वाचायचे विसरून गेलोय..
आता सगळाच हलकटपणा
आपल्याला पुढे न्यायचा आहे..

काय करू मित्रा,
आपली दोस्ती राहिली असती
पण आता झोंबी झालाय
तुझा आणि माझाही..

-प्रशांत शशिकांत शेलटकर
 8600583846

Thursday, 25 February 2021

वेटींग रूम

मी कधीचा या वेटींग रूम मध्ये बसलोय.कित्येक तास..दिवस ...महिने..वर्ष..कधी कधी वाटतं मी वेटींग रूम मध्येच जन्मलो की काय?...
   माझ्या आजूबाजूला काही माणसं आहेत.खूप वर्षांपासून जवळ असल्याने ती आता आपली वाटत आहेत.इतकी की त्यांना गमावण्याची मला आता भीती वाटतेय..माझ्यासमोर एक विचित्र माणूस बसलाय..विचित्र अशासाठी की, डोक्यावरच्या भरपूर केसात एक  मोरपीस खोवलेले आहे.त्यामुळे तो अगदीच ऑड मॅन आऊट वाटतोय..पण त्याच्या गालावरचे मंद स्मित मात्र भलतेच मोहक आहे..ते मात्र कायम आहे..मध्येच गलका होतो आजूबाजूची काही माणसे बाहेर निघून जात आहेत.काही आत येत आहेत.येणारी माणसे उत्साही वाटत आहेत..आणि जाणारी माणसे थकलेली...
     मला पण हल्ली थकल्यासारखे वाटत असत.. बाजूची माणसं निघून गेली की मन थोडं कातर होतं.. पायाशी असलेली बॅग उचलावी आणि वेटींग रूमच्या बाहेर जाऊस वाटतं.. पण तेही क्षणभरच ..वेटींग रूमचा मोह काही सुटत नाही..माझ्या पायापाशी पडलेल्या बॅगेत फार काही नाही..जुन्या आठवणींचा जुनाट अल्बम..त्यात आता नवीन आठवणी ठेवायला जागाच नाही..  थोडी चिल्लर बस्स....मध्येच त्या मोरपीस खोवलेल्या माणसाकडे लक्ष जातं.. त्याचे हास्य मात्र अजूनही मोहक आहे..
     सूर्य आता कललाय..त्याची उदास उन्ह वेटींग रूमच्या भिंतीशी उगाचच रेंगाळत आहेत..मी पण असाच रेंगाळत आहे का??? दूरवरून गाडीची शिट्टी ऐकू येतेय..का कोण जाणे मला वाटतय की याच गाडीने आपल्याला निघायचं आहे..गाडी जवळ येतेय..आता सूर्य पूर्ण अस्ताला गेलाय..त्याची ती रेंगाळणारी उन्हही गायब झालीयत..काळोखाची भयकारी पाऊले आता वेटींगरूम मध्ये पडत आहेत..गाडीची शिट्टी जवळ ऐकू येतेय.. तो मोरपीसवाला  विचित्र माणूस अजूनही मंद स्मित करतोय..मावळलेला सूर्य, पसरणारा काळोख याचा त्याच्यावर कसलाही परिणाम झालेला नाही..माझ्या बाजूच्या माणसांवरही त्याचा परिणाम झालेला दिसत नाही.जणू त्यांच्यासाठी सूर्य मावळलेलाच नाही..
    गाडी आता प्लँटफॉर्मला लागलीय.आता गेलं पाहिजे ही जाणीव प्रबळ होतेय..पण मी शक्तिपात झाल्यासारखा बसून आहे..शरीराची जाणीव कमी कमी होतेय..इतक्यात तो समोरचा मोरपीस खोवलेला माणूस उठतोय..त्याच्या चेहऱ्यावरच ते मोहक हास्य अजून तसच आहे..आता तर  मला त्याच हास्य आणि ते केसात खोवलेल मोरपीस इतकच दिसतंय.. तो मला हात देतोय..माझ्या पायाशी पडलेली आठवणींच्या अल्बमची बॅग तशीच ठेऊन मी वेटींग रूमच्या बाहेर आलोय..वेटींगरूम मध्ये कोणीतरी म्हणतंय.. गेला बिचारा..,
     मी मागे वळून पाहतो..माझ्या आजूबाजूची माणसं माझी बॅग उघडत आहेत..काही जण आठवणींचा अल्बम नुसता चाळत आहेत,काही जण हळहळत आहेत.पण त्या गर्दीत "तो" दिसत नाहीये..
     तो तर गाडीच्या दरवाजात उभं राहून माझं स्वागत करतोय..गाडी हलली.. फलाटावरच वेटींगरुम अदृश्य होतंय.. गाडीत आता फक्त बासरीचे अनाहत सूर ऐकू येत आहेत. तो अजूनही स्मित करतो आहे..
    क्षणभरापूर्वी मी निधन पावलों आता माझा प्रवास चालू झालाय..गंतव्य स्थान माहीत नाही...पण चालु झालाय नक्की...सोबत ते मोरपीस आणि मोहक स्मित आहेच..
     -प्रशांत शशिकांत शेलटकर
      8600583846

Tuesday, 23 February 2021

करुण आहे रात्र

तरुण आहे रात्र अजुनी ...या गझलनवाझ सुरेश भटांच्या  गाण्याचे विडंबन...


करुण आहे रात्र अजुनी
बायको निजलीस का ग
एवढ्यातच "बस्स" म्हणुनी
तू कुशीवर वळलीस  का ग

अजुनी न सुकल्या कुठे ग
तव चुंबनांच्या ओल्या खुणा
अजुनी मी तृप्त झालो कुठे ग
हाय तू शांत झालीस का ग?

सांग ,कसे माझ्या मित्रांना
उत्साहे असे काय सांगू..
पहिल्या रात्रीतच अशी तू
विझून गेलीस का ग?

बघ तुला पुसतो आहे
पौरुषाचा जोश नवा..
मिठीत अलगद घेऊन जरा
बेहोष मला करशील का ग?

उसळती तन मनात माझ्या
मदनाच्या बघ बेधुंद लाटा
पण पलंगाच्या त्या किनारी
अजून तू सरकली का ग?

-प्रशांत श शेलटकर
8600583846










Saturday, 20 February 2021

सखाराम गटणे जिवंत आहे....

सखाराम गटणे जिवंत आहे....

रिच डॅड पुअर डॅड वाचतोय...
नगर वाचनालयाचे पुस्तक आहे...प्रत्येक पानावर काही वाक्याखाली पेन्सिलने रेष आहे...मला अशा रेघोट्या मारणाऱ्या लोकांबद्दल नितांत कुतूहल आहे..रेषा मारून ही माणसे काय करत असतील ?..सखाराम गटणे सारखी वहीत लिहून ठेवत असतील की, पाठ करून परत म्हणून बघत असतील..की कुठल्या वक्तृत्व स्पर्धेत पल्लेदार पेशकश करून बक्षिसे मिळवत असतील??
   काय करायचं ते करा लेकहो पण वाचनालयाची पुस्तके खराब का करायची..आम्ही आमच्या लहानपणी आमच्या स्वतःच्या पुस्तकावर काही लिहू शकत नव्हतो कारण वडिलांचे "भ्या" होते. आजही आमच्या नावाचे शिलालेख ना वाचनालयाच्या पुस्तकावर लिहिले, ना एसटीच्या सीटच्या मागे...
    पण हे अदृश्य सखाराम गटणे... पुस्तकाच्या पानापानावर आपली छाप सोडत असतात.. गंमत अशी होते की मग आपण ते पुस्तक सखाराम गटणेच्या चष्म्यातून वाचत जातो...कधी कधी अस वाटत की सखाराम गटणे हे तात्या विंचूचे सौम्य रूप आहे..दोघेही आपल्या नकळत आपल्या मानगुटीवर बसतात..
    आवरा हो कोणीतरी यांना...

☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️

-प्रशांत शेलटकर
 8600583846

Saturday, 13 February 2021

सदगुण विकृती

सद्गुण विकृती...

एका गालावर बसत थप्पड
दुसरा गाल पुढे करा..
असले कसला हो भोंगळपणा
अरेला तुम्ही कारे करा..

गालावर बसता थप्पड
दुसरी असली ठेऊन द्या
समोरच्याची बत्तीशी मोजून
त्याच्याच हाती काढून द्या

दया क्षमा शांती सारे
सद्गुण असती मान्य जरी
नाठाळाच्या माथा काठीच
हीच शिकवण आहेच खरी

काम क्रोध लोभ मत्सर
लोभ,मोह हे रिपू कसे?
नसता "काम" तर आपण सारे
निर्माण झालो असते कसे?

क्रोध जर का नसता रामाला
रावण कसा वधीला असता?
कुरुक्षेत्रावर मग पांडवांचा
विजय कसा झाला असता?

मोहच पडला नसता सीतेला
मायावी त्या सुवर्णमृगाचा 
रामायणच मग घडले नसते..
परिणाम एका "मोहाचा"...

षडरिपू हे अश्वच जणू
चालत्या जीवन रथाचे
लगाम हातीच हवा आपल्या
काम आपले सारथ्याचे...

दुनिया सारी सलाम करते
वाघाच्या डरकाळीला
पूजा होते फक्त नागाची
गांडूळे फक्त कंपोस्ट खताला

शांतीची भाषा शोभते
रणधुरंदर शूरवीराला
बळाचीच भाषा कळते
आजकालच्या दुनियेला

-प्रशांत शेलटकर
 8600583846

Thursday, 11 February 2021

बोलण्यातले स्टेटस

बोलण्यातली स्टेटस..☺️

बस स्टॉप ला उभे असताना काहीजण म्हणतात, गाडी आली.तर काही जण म्हणतात बस आली 

काहीजण मेडिकल मधून औषधं आणतात,काही जण केमिस्ट कडून

गावातले लोक रिक्षातून प्रवास करतात ,मुंबई-पुण्यातले ऑटो ने

गावातले लोक पिच्चर बघतात ,शहरातले लोक मुव्ही बघतात

आमच्यावेळी आम्ही कॉलेजला तास बुडवतो होतो आताची मुलं लेक्चर बंक करतात.

आमच्या वेळी आम्ही मैत्रीणीला पिरियड चुकवू नकोस परीक्षा जवळ आली आहे असं सांगू शकत होतो. त्याही निरागसपणे हो सांगायच्या ,,तेव्हा पिरियड चा एकच  अर्थ माहित होता...
   वर्गातल्या शिक्षिकांचा प्रवास बाई-मॅडम-मॅम असा झालाय.. मराठी शाळेत असतात ते गुरुजी,हायस्कूलला त्यांचे सर होतात..
    आमच्या नजरेत आम्ही बसला,मोटारीला, बाईकला  गाडीच म्हणतो.. पैसे ठेवायला आजपर्यंत आम्ही पाकीट म्हणायचो पाकीट ह पॉकेट नव्हे...आता वाँलेट म्हणतात..
    गुच्छ म्हटलं की उगाचच डोक्यावर टोपी असल्यासारखं  वाटत आणि बुके म्हणताना गळ्यात टाय असल्यासारखं तेही उगाचच...
  आम्ही दुपारी आणि रात्री जेवत होतो,आणि सकाळी "चा-चपाती"आता सकाळी ब्रेकफास्ट,दुपारी लंच घेतातआणि रात्री डिनर... आमच्या डोळ्या देखत हॉटेलचा प्रवास रेस्टॉरंट ते रेस्तराँ ते इकोटेल असा झालाय..
    पूर्वी तीच आणि त्याच "फाटायच" ,आता "ब्रेकप" होतो.
पूर्वी नोकरीतून कमी करायचे आता डिसमिस करतात.
   एरवी चणे-शेंगदाणे  चौपाटीवर खाल्ले तर ते एक निरुपद्रवी कनिष्ठ मध्यमवर्गीय खाद्यमनोरंजन असायचे.. तेच चणे- शेंगदाणे बारच्या मंद प्रकाशात, मंद संगीतात डिशमध्ये गेले की त्याचे स्टेटस बदलून तो "चाकणा" होतो
    
काळाचा महिमा दुसरं काय..☺️

-प्रशांत शेलटकर
8600583846

अंधभक्ती?-लेख

।अंधभक्ती? चुकीचा शब्दप्रयोग

      सगळ्या चिकित्सा बाजूला ठेऊन जी केली जाते ती भक्ती..इथे श्रद्धास्थान योग्य असणे गृहितच आहे.ते चुकीचे असेल तर त्याचे नाव मूर्खपणा असे असते.अंधभक्ती अस नसतं असते ती केवळ भक्ती. 
    देवावरच्या सगळ्या श्रद्धा या फक्त श्रद्धाच आहेत त्या अंध वगैरे कधीच नसतात. श्रद्धाळू माणसाच्या भावना दुखावू नयेत म्हणून अंधश्रद्धा हा शब्द निर्माण केला गेला..
श्रध्येय जर उत्तम असेल तर जो श्रद्धा ठेवतो त्याच्यात प्रचंड सकारात्मक बदल होतो.जर चुकीचे असेल तर तो खोल गर्तेत जातो...
   रायगडावर जायचे दोन मार्ग आहेत एक पायऱ्यांचा दुसरा रोप वे चा.पायऱ्यांनी जाणे म्हणजे ज्ञानमार्ग,चिकीत्सा करत करत  प्रत्येक पायरी तपासत पुढे जाणे हा ज्ञानमार्ग झाला.हळूहळू का होईना माणूस गडावर..अंतिम लक्ष्यावर जातो.. रोपवेचे तसे नसते, त्या लिफ्ट वर पूर्ण विश्वास ठेवायचा. सगळं स्वाधीन करायचं आणि पटकन लक्ष्यापर्यंत पोहोचायचं..हा झाला भक्तिमार्ग
 चुकीच्या रोपवेची निवड म्हणजे कपाळ मोक्ष..गंमत म्हणजे योग्य रोपवे निवडायला चिकित्सा करावीच लागते पण एकदा केली की एकदम समर्पण..
    दुसरी एक गंमत म्हणजे आपण आपल्या आयुष्यात ना धड चिकित्सक असतो ना धड श्रद्धाळू..आपण फक्त शब्दांचे खेळ करत बसतो..
-प्रशांत शेलटकर
 8600583846

Monday, 8 February 2021

काय सांगू मान्यवर

एका नवकवीचा सत्कार होतो.सत्काराला उत्तर देताना तो म्हणतो,

काय सांगू मान्यवर

पेन झटकला कागदावर
तर हल्ली शब्दच सांडतात...
आणि टिचकी मारली तर
रांगेत जाऊन बसतात...

काय सांगू मान्यवर

हल्ली ती दिसली तरी,
मला कविता होते..
डोळ्यादेखत माझ्या
ती तिची होऊन जाते

काय सांगू मान्यवर

ती हसली तर मात्र
खेळच खल्लास होतो
वृत्तमात्रा झुगारून
मीच मुक्तछंद होतो

काय सांगू मान्यवर

मी इर्शाद बोलतो
ती गझल होते...
मी शेर होतो
ती शायरी होते

काय सांगू मान्यवर

बंद टोपणात सुद्धा
हल्ली शब्दपात होतो
चारोळीचे रूप घेऊन
डायरीमध्ये बसतो..

काय सांगू मान्यवर

किराण्याची यादी सुद्धा
हल्ली कवितेत येते..
त्या कवितेचीच मग मला
केविलवाणी कीव येते

दोन किलो द्या साखर
पाच किलो द्या गहू
तांदूळ द्या दहा किलो
डाळ कशी सांगा पाहू

चहा पावडर अर्धा किलो
दिले कसे किलो कांदे
बटाटयाचा भाव सांगा
करू नका आमचे वांदे

लिहून ठेवा वहीत तुमच्या
उद्या रोख आज उधार
मानधन किती मिळते पाहू
उद्या आहे माझा सत्कार

काय सांगू मान्यवर
आजकाल असे हे होते
कालपर्यंत  बरे होते
बायको माझी म्हणते

काय सांगू मान्यचर
कवितेचा आला नळ
एवढी कविता ऐका माझी
सोसाना हो थोडी कळ

-प्रशांत शेलटकर
8600583846

Saturday, 6 February 2021

अर्जुन

अर्जुन..

आता प्रत्येक नात्याचा
मी अर्थ शोधतो आहे
जसा खोल खोल जातो
तसा स्वार्थ दिसतो आहे

येता जवळ कोणी
मनी संशय दाटतो आहे
वाटते कोणी धूर्त शकुनी
 फासेच फेकतो आहे

कुणी मारतो मज मिठी
ती मगरमिठी वाटते आहे
पाठीवर फिरता हात
मज खंजीर वाटतो आहे

कुणाचे गहिरे डोळे
मज डोह वाटतो आहे
लपला असेल  कालिया
मज संशय वाटतो आहे

बसेल विश्वास उजेडावर
एक कवडसा शोधतो आहे
पण वाटते काळोख्या रात्री
मी सूर्य शोधतो आहे

कुरुक्षेत्रात आयुष्याच्या
माझा अर्जुन होतो आहे
कुठे गेलास रे कृष्णा?
तुला कधीचा शोधतो आहे

-प्रशांत शशिकांत शेलटकर
 8600583846

Friday, 5 February 2021

पेशकश...

शब्दांची पेशकश......

अर्धा भरलेला, अर्धा सांडलेला असा चहाचा कप कोणी तुमच्यासमोर आदळला तर कस वाटेल? आणि तेच कुणी एक सूंदर नक्षी असलेला चहाचा कप अत्यन्त अदबीने तुमच्या समोर ठेवला तर कसं वाटेल??
     कोणतीही , सेवा,गाणं कस सादर होतं त्यावर तुमचा आनंद ठरतो..गाण्याचंही तसंच आहे. बरेच जण गाणं नुसतं म्हणतात ..फार थोडे असे असतात की ते गाणं पेश करतात..ही पेशकश श्रोत्याला स्वर्गसुख नव्हे कर्णसुख देते....
     गाण्यातल्या शब्दांना न्याय देणं हे मोजक्या गायक-गायिकांना अजून पर्यंत जमलंय,त्यात आशाताईंचा नंबर खूप वरचा आहे..
     त्यानी मुंबईचा फोजदार चित्रपटातल ...का रे दुरावा ऐका...त्यात एक अंतरा आहे..
रात जागवावी असे आज वाटे
तृप्त झोप यावी पहाटे पहाटे
यात आशाताईंनी तृप्त हा शब्द असा काही पेश केलाय की ...खरोखरच सगळ्या तनामनात तृप्तता भरून रहाते...
त्यांचं दुसर् एक गाणं आहे,बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटातील... माझ्या मनी प्रियाची... त्यात एक अंतरा आहे,

नाथा तुझी करावी सेवा मौनभावे
हळुवार स्पर्श होता वेलीस फुल यावे...
आई होण्याचे स्वप्न खूप मार्मिक शब्दात मांडले आहे...यातील स्पर्श या शब्दाचा उच्चार आशाताईंनी असा केलाय ,...ती हळुवार स्पर्श अगदी जाणवतो आपल्याला...पुन्हा पुन्हा ऐकाव अस वाटत राहतं.. तुम्ही कधी हे गाणं ऐकल तर पुन्हा ऐका..
    मराठी नसूनही शब्दांना समर्थ न्याय देणारा अमराठी गायक  म्हणजे महेंद्र कपूर.त्यानी बहुतेक गाणी दादा कोंडके यांच्यासाठी गायली आहेत. दादांची गाणी म्हणजे अस्सल गावरान ठसका..पश्चिम महाराष्ट्रातील बोली भाषेत बहुतेक  शब्दांना "ह"  चा तडका असतो..उदाहरण म्हणजे गाव अस म्हणायचं असेल तर गाहाव अस बोललं जातं. त्यांच्या प्रत्येक गावरानगाण्यात हा ग्रामीण तडका पुरेपूर उतरलाय.. त्यांनी गायलेले एक गाणं म्हणजे 
सजणी ग भुललो मी काय जादू झाली ,...बघून तुला जीव माझा होई वर खाली यामध्ये शेवटचा अंतरा असा आहे की
येशील का घरी तू लक्ष्मीच्या चाली
असा आहे ..खरं तर ओळीत नायिकेला नायकाने  प्रपोज केलंय.. प्रपोज करतानाचा सगळा हळवेपणा महेंद्रजीनी गाण्यात पूर्णपणे उतरवला आहे.यातील लक्ष्मीच्या चाली हा उच्चार तर चाबूकच आहे. हेच गाणं मी अनेक गायकांच्या तोंडून ऐकल पण हा शब्द त्या नजाकतीने कोणीच म्हटलेला नाही..गाणं ऐकताना मी या शब्दाकडे नेहमीच किंचित थबकलो आहे...
    प्रत्येक शब्द किती महत्वाचा असतो ना..प्रल्हाद शिंदे यांनी गायलेले जगी जीवनाचे सार ...ऐका त्यातील शुद्ध होई अंतः करणं ऐका, त्यातील अंतः करणं हा शब्द ऐका. अनुराधा ताईनी हेच गाणं गायलं आहे.त्यातील तोच शब्द ऐका... प्रल्हाद शिंदे यांचा अंतःकरण हा शब्द जास्त अचूक वाटतो..
    खर तर शब्द म्हणजे केवळ अक्षरांचा अर्थपूर्ण क्रम नव्हे त्या अर्थपूर्ण क्रमालाही अर्थ असतो ,भावना असतात,त्या ओळखुन निगुतीने पेश करणे हे संगीतकार आणि गायकाचे कौशल्य असतं... बाबूजी अर्थात सुधीर फडके त्यातला बाप माणूस,पण त्याविषयी नंतर कधीतरी....

-प्रशांत शेलटकर
 8600583846

Tuesday, 2 February 2021

म्हस

"म्हस"

वयात आली म्हस
म्हणे शेजारी माझ्या बस
रेड्या तुला बघून माझ्या
काळजात होत धस्स

राजावानी चाल तुझी
वाघावानी डुरकी
तुझ्यावरून मैत्रिणी माझ्या
घेतात माझी फिरकी
राजा तुलाच माझी कशी
गावली बघ नस
रेड्या तुला बघून माझ्या
काळजात होत धस्स

गावकाराची चांदी बघ
लाईन तुझ्यावर टाकते
पाण्यावर जाता जाता
तुझ्याकडेच बघते
गोचीड तिच्या नाकावर
म्हणे ती हाय मस
रेड्या तुला बघून माझ्या
काळजात होत धस्स

सगळ्या मेल्या फेंद्र्या
माझी सर कोणाला?
तुला मला बघून जळतात
म्हशी सगळ्या गावातल्या
गावात सगळ्या गोठयात
मीच हाय मिस युनिव्हर्स
रेड्या तुला बघून माझ्या
काळजात होत धस्स..

म्हस चक्क लाजली तसा
रेडा खुळा झाला..
शिंग रोखून डोळ्यात तिच्या
विल यू म्यारी मी ?म्हणाला
जरा लाजत जरा मुरडत 
म्हैस म्हणाली यस...
रेड्या तुला बघून माझ्या
काळजात होत धस्स...


-प्रशांत शेलटकर
 8600583846

☺️☺️☺️☺️☺️

चष्मा..

चष्मा.... मित्रा तुझा चष्मा मला दे पाहीन ना जग मी तुझ्या नजरेतून..पण क्षणभरच पण तू ही हे जग बघ ना स्वच्छ नितळ नजरेने चष्म्याशिवाय...... हे च...