Ad

Thursday, 26 March 2026

तीची डायरी

...

तो गेल्यावर...
तिची काळजी घेणारे खूपच..
घरातल्यापेक्षा बाहेरचेच जास्त..
घरात ती ओझे झालेली...

तरी एक बरं आहे..
ती आहे स्वतःच्या पायावर उभी..
अन्न वस्त्र निवारा..
बस फक्त मूलभूत गरजा..
इतर गरजा? त्या ना...
नैतिकतेच्या खुंटीला टांगून ठेवल्या आहेत 
अनंत काळपर्यंत..

हल्ली रात्री अंगावर येतात..
अंधाराची चादर घेऊन गुडूप झोपल तरी
त्याच्या आठवणी डोळ्यातून वाहतात..
मग केव्हातरी पहाटे..
गालावरचे ओघळ सुकतात
एक ग्लानी अंगभर लपेटून जाते..
अलार्म वाजतो..
तिला वाटत आता तो उठेल 
बंद करेल तो अलार्म..
तिच्या कुशीत शिरेल 
अगदी लहान मुलासारखा...
पण आता ती अलार्म स्वतःच बंद करते..
ती उठून बसते ..
टेबलावरचा तिचा आणि त्याचा फोटो
डोळ्यात श्रावण दाटून येतो..

एक कोरडा दिवस 
चालू होतो तिच्या लेखी..
आता दिवसभर 
त्याच त्याच भोचक नजरा..
ते चुकून झालेले ओंगळवाणे स्पर्श
बायकांच्या नजरेतल्या गरीब बिचाऱ्या आपण
त्यांच्या गळ्यातले ते काळे मणी..
हल्ली आपण तेच शोधत असतो..
कुणाच्या अंगभर दागिन्यातले ते काळे मणी
तिला जाणवलं..
जे गमावलं आहे ते जास्त त्रास देतय आजकाल
रट्टा मारलेला दिवस निघून जातो
जसा काल गेला तसाच आज गेला
काना मात्रा वेलांटी सकट तसाच 
तशीही हल्ली फक्त तारीख बदलते...

असो...आता रात्र झालीय..
तिच्या आयुष्यातला एक निरर्थक दिवस संपलाय 
अशी निरर्थक आवर्तनं किती होतील?
हा लांबलेला ग्रीष्म कधी संपेल?
हे  अनेक निरर्थक प्रश्न...
ड्रॉवर मधली डायरी काढून ती उघडते
नुसतच काळोख करून राहिलेले आभाळ
तिच्या गालावरून ओघळू लागतं...
आणि ती...
डायरीच्या पानावर ती झरझर उतरत जाते..

आज दिनांक........

@ प्रशांत

No comments:

Post a Comment

कुंपणावरच्यास

कुंपणावरच्यास.... भलताच बिझी मित्रा पण स्टेटस मात्र बघतो कळते मला अरे वेड्या तू अंदाज मात्र बांधतो.. बंद करतोस दरवाजा  अन् खिडकी उघडी जराशी ...