सद्गुण विकृती...
एका गालावर बसत थप्पड
दुसरा गाल पुढे करा..
असले कसला हो भोंगळपणा
अरेला तुम्ही कारे करा..
गालावर बसता थप्पड
दुसरी असली ठेऊन द्या
समोरच्याची बत्तीशी मोजून
त्याच्याच हाती काढून द्या
दया क्षमा शांती सारे
सद्गुण असती मान्य जरी
नाठाळाच्या माथा काठीच
हीच शिकवण आहेच खरी
काम क्रोध लोभ मत्सर
लोभ,मोह हे रिपू कसे?
नसता "काम" तर आपण सारे
निर्माण झालो असते कसे?
क्रोध जर का नसता रामाला
रावण कसा वधीला असता?
कुरुक्षेत्रावर मग पांडवांचा
विजय कसा झाला असता?
मोहच पडला नसता सीतेला
मायावी त्या सुवर्णमृगाचा
रामायणच मग घडले नसते..
परिणाम एका "मोहाचा"...
षडरिपू हे अश्वच जणू
चालत्या जीवन रथाचे
लगाम हातीच हवा आपल्या
काम आपले सारथ्याचे...
दुनिया सारी सलाम करते
वाघाच्या डरकाळीला
पूजा होते फक्त नागाची
गांडूळे फक्त कंपोस्ट खताला
शांतीची भाषा शोभते
रणधुरंदर शूरवीराला
बळाचीच भाषा कळते
आजकालच्या दुनियेला
-प्रशांत शेलटकर
8600583846
No comments:
Post a Comment