Ad

Monday, 8 February 2021

काय सांगू मान्यवर

एका नवकवीचा सत्कार होतो.सत्काराला उत्तर देताना तो म्हणतो,

काय सांगू मान्यवर

पेन झटकला कागदावर
तर हल्ली शब्दच सांडतात...
आणि टिचकी मारली तर
रांगेत जाऊन बसतात...

काय सांगू मान्यवर

हल्ली ती दिसली तरी,
मला कविता होते..
डोळ्यादेखत माझ्या
ती तिची होऊन जाते

काय सांगू मान्यवर

ती हसली तर मात्र
खेळच खल्लास होतो
वृत्तमात्रा झुगारून
मीच मुक्तछंद होतो

काय सांगू मान्यवर

मी इर्शाद बोलतो
ती गझल होते...
मी शेर होतो
ती शायरी होते

काय सांगू मान्यवर

बंद टोपणात सुद्धा
हल्ली शब्दपात होतो
चारोळीचे रूप घेऊन
डायरीमध्ये बसतो..

काय सांगू मान्यवर

किराण्याची यादी सुद्धा
हल्ली कवितेत येते..
त्या कवितेचीच मग मला
केविलवाणी कीव येते

दोन किलो द्या साखर
पाच किलो द्या गहू
तांदूळ द्या दहा किलो
डाळ कशी सांगा पाहू

चहा पावडर अर्धा किलो
दिले कसे किलो कांदे
बटाटयाचा भाव सांगा
करू नका आमचे वांदे

लिहून ठेवा वहीत तुमच्या
उद्या रोख आज उधार
मानधन किती मिळते पाहू
उद्या आहे माझा सत्कार

काय सांगू मान्यवर
आजकाल असे हे होते
कालपर्यंत  बरे होते
बायको माझी म्हणते

काय सांगू मान्यचर
कवितेचा आला नळ
एवढी कविता ऐका माझी
सोसाना हो थोडी कळ

-प्रशांत शेलटकर
8600583846

No comments:

Post a Comment

चष्मा..

चष्मा.... मित्रा तुझा चष्मा मला दे पाहीन ना जग मी तुझ्या नजरेतून..पण क्षणभरच पण तू ही हे जग बघ ना स्वच्छ नितळ नजरेने चष्म्याशिवाय...... हे च...