काय करू मित्रा
आपली दोस्ती राहिली असती
पण इतिहासात तुझ्या पूर्वजांनी
माझ्या पूर्वजांवर अन्याय केलाय ना?
वाचलं ना मी परवा एका पुस्तकात
भलतेच विद्वान होते ते लेखक
कबरी खणू खणू लय अभ्यास
केला राव त्यांनी..
अनेक बलात्कारी सांगाडे,
बाहेर काढुन त्याचा डी एन ए
तपासलाय राव त्यांनी...
काय करू मित्रा
आपली दोस्ती राहिली असती
पण तुझा आणि त्या सांगाड्याचा दि एन ए
एकच आहे, आताच वाचलं मी
त्यांच्या भलत्याच जाड पुस्तकात
काय करू मित्रा
आपली दोस्ती राहिली असती
तरी पुस्तकं वाचू वाचू ,
मी विद्वान झालो ना आता
जरी आपण एकत्र खेळतो
शाळेत गेलो, भांडलो असतो
तरी आपल्या पूर्वजांनी
केलेल्या पापाचे हिसाब 'किताब
तुला आणि मला केलेच पाहिजेत ना
काय करू मित्रा,
आपली दोस्ती राहिली असती
पण पुस्तक वाचता वाचता
तुला वाचायचे विसरून गेलोय..
आता सगळाच हलकटपणा
आपल्याला पुढे न्यायचा आहे..
काय करू मित्रा,
आपली दोस्ती राहिली असती
पण आता झोंबी झालाय
तुझा आणि माझाही..
-प्रशांत शशिकांत शेलटकर
8600583846
No comments:
Post a Comment