Ad

Friday, 30 October 2020

मरणाचे क्रियापद

मरणाचे क्रियापद...

 *मरणाराचे स्टेटस ठरवते , मृत्यूच्या बातमीचे क्रियापद..* 

आलेला जीव जातोच पण कोण मरतो यावर त्याची न्यूजव्हॅल्यू ठरते आणि त्याचे क्रियापदही.
 गाडी अंगावर जाऊन एक बाबू नावाचा भिकारी *मेला* 
बाबुराव  जमदाडे यांचे *निधन* झाले.
माजी खासदार बाबूजी जमदाडे आज *पंचत्वात* विलीन झाले.कालच त्यांना *देवाज्ञा* झाली होती
प.पु बाबूजी हे  *निजधामास* गेले.
काल रात्री पोलिसांनी काल्या बाबूचा *एनकाउंटर* केला
त्याने अंडरवर्ल्ड मधील अनेकांचे *गेम वाजवले* होते.
      व्यक्तीचे समाजातले स्थान बघून त्याच्या मृत्यूची बातमी तयार होते.एखादा राजकीय नेता गेला की पोकळी निर्माण होते.हे पोकळी प्रकरण मला अजून समजले नाही. पोकळी कसली डोंबलाची... मेलेला सरणावर असतानाच वारसदार तयार होतात. बरं ही पोकळी फक्त राजकीय नेता गेला की तयार होते. तुम्ही आम्ही गेलो की साधा बुडबुडा पण निर्माण होणार नाही.
   तुम्हीच बघा...हे मीडियावाले पण काय एकेक शब्द वापरतात.. कोण वजनदार माणूस गेला की त्याचे *पार्थिव* अंत्यदर्शनासाठी ठेवतात..आणि आपल्यातल कोण गेलं की आपलेच लोक विचारतात *बॉडी* कधी उचलणार.
     बरं जळताना पण एकेकाचे भाग्य बघा, काहींना *मंत्राग्नी* तर काहींना *भडाग्नी* ...हल्ली कोरोनामुळे काहींच्या नशिबात बेवारस जळण आलं...

प्रत्येकाचा मरणसोहळा वेगळा असतो हेच खरे...

-प्रशांत शशिकांत शेलटकर
 8600583846

माझे इतर लेख आणि कविता यांचा आस्वाद घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

http://aksharpooja.blogspot.com/?m=1

Tuesday, 27 October 2020

हिंदु

 मी मुळातच धर्मनिरपेक्ष आहे.

कारण मी हिंदू आहे.माझ्या धर्माइतके आचार आणि विचार स्वातंत्र्य कुठेच नाही.ज्यांना हिंदू म्हटल्यावर अंगावर पाल पडल्यासारखे वाटते.त्यांना तसे वाटण्याचे स्वातंत्र्य आहे.....


ज्यांना धर्म म्हणजे काहीतरी बुरसटलेले ,मागास वाटते त्यांना तसे वाटून घेण्याचे स्वातंत्र्यही  हिंदू धर्म बहाल करतो म्हणून मला माझ्या हिंदू असण्याचा अभिमान आहे......


ज्यांना हिंदू धर्म म्हणजे केवळ जातीव्यवस्था वाटते.

त्यांना तसे वाटून घेण्याचेही स्वातंत्र्य आहे.जे चूक आहे ते चूक म्हणण्याचे स्वातंत्र्य हिंदू म्हणून मला आहे म्हणूनच हिंदू असल्याचा मला अभिमान आहे.


माझे हिंदुत्व कोणत्या राजकीय पक्षाशी बांधलेले नाही.कोणा नेत्याच्या पायाशी वाहलेले नाही.ना कोणाच्या सामूहिक द्वेषावर पोसलेले नाही.म्हणूनच माझ्या हिंदू असण्याचा मला सार्थ अभिमान आहे..


पराकोटीची अहिंसा ते पराकोटीची हिंसा दोन्ही मला मान्य नाहीत. अस्तित्व टिकवण्यासाठीची हिंसा मला मान्य आहे.चराचरात देव असेल तर तो मूर्तीत देखील असायला हवा हे मला मान्य आहे.पण देव फक्त मूर्तीतच असतो हे मला मान्य नाही.देव नाही म्हणालात तरी मान्य,देव आहे म्हणालात तरी मान्य .माणसातला देव बनवण्याचे आणि देवाला मानव रुपात पाहण्याचे सामर्थ्य मला माझी हिंदुसंस्कृती देते म्हणून मला माझ्या हिंदुत्वाचा सार्थ अभिमान आहे.


प्रशांत शेलटकर

  

    


--प्रशांत शेलटकर

Monday, 26 October 2020

प्रेम म्हणजे....

प्रेम म्हणजे 
काळजातील माया
प्रेम म्हणजे
उन्हातील छाया

प्रेम म्हणजे
डोळ्यातील पाणी
प्रेम म्हणजे
मनातली अत्तरदाणी

प्रेम म्हणजे
त्याच त्याच जग
प्रेम म्हणजे
माया भरलेला ढग

प्रेम म्हणजे
आई बापाची छाया
प्रेम म्हणजे 
भावा बहिणीची माया

प्रेम म्हणजे
बायकोची मिठी
प्रेम म्हणजे
प्रेयसीची झप्पी

प्रेम म्हणजे
प्रेमाला व्याख्या नाही
प्रेम म्हणजे 
ज्याची त्याची अनुभूती

Wednesday, 21 October 2020

शब्दांची गंमत १-अपरोक्ष

शब्दांची पण गंमत असते...काही वेळा बोलताना आपल्याला सांगायचे असते एक आणि आपण शब्द मात्र बरोबर उलटअर्थी वापरतो.. उदा. "ही गोष्ट माझ्या "अपरोक्ष" झाली त्यामुळे मला माहित नाही" आता यात सांगणाऱ्याला अस सांगायच आहे की ही गोष्ट मी तिथे उपस्थित नसताना झाली. आता अपरोक्ष चा अर्थ बघूयात, अपरोक्ष हे परोक्षचे विरुद्धार्थी रूप आहे. पर+अक्ष = परोक्ष , पर म्हणजे परका आणि अक्ष म्हणजे डोळा , परक्याच्या डोळ्यासमोर घडलेली घटना म्हणजे परोक्ष.अपरोक्ष म्हणजे परक्याच्या नव्हे तर स्वतःच्या डोळ्यासमोर घडलेली घटना.. पण काळाच्या ओघात आपण चुकीचे शब्द वापरतो...सहज म्हणून जातो माझ्या या गोष्टी माझ्या अपरोक्ष झाल्या...  ☺️☺️☺️☺️

-प्रशांत शेलटकर
 8600583846

Monday, 19 October 2020

 खिडकी


बसलो कधीचा खिडकीशी

अंदाज त्याचा नाही

उद्या असेल का हे बसणे

अदमास त्याचा नाही


ही खिडकी जुनीपुराणी

तावदानेही फुटलेली

तुटलेल्या रंगीत काचा

जवानी सांडून गेलेली


तरी हिचा भरवसा

अद्याप सोडला नाही

तुटक्या  माझ्या घराला

खिडकीच दुसरी नाही


फुटल्या सर्व काचा

बिजागरेही गंजलेली

 झेलून कित्येक उन्हाळे

ती ही गांजलेली...


तरी तिच्यावाचून मी

किती अस्वस्थ होतो

फुटक्या तिच्या काचांतून

मी चंद्र बघत बसतो..


-

-प्रशांत शशिकांत शेलटकर

 8600583846

19/10/2020


माझ्या इतर कविता , कथा आणि लेखांना वाचण्यासाठी माझ्या अक्षर पूजा या ब्लॉगला अवश्य भेट द्या


Sunday, 18 October 2020

क्षण

 क्षण...


प्रत्येक क्षणावर

नाव तुझेच आहे

सूर जरी माझे

गाणे तुझेच आहे


मज कशी सुचते

अलगद ही कविता

अक्षरे माझी जरी

भाव तुझाच आहे


मी तो वाहतो फक्त

पालखी शब्दांची

मौन आत गहिरे

कारण तुझेच आहे


आरशात मी जरी

पाहीले स्वतःला

प्रतिबिंब मात्र वेडे

सखे तुझेच आहे..


-प्रशांत शशिकांत शेलटकर

 8600583846

17/10/2020



Saturday, 17 October 2020

मंदिरे शोषणाची नव्हे,पोषणाची केंद्रे

मंदिरे शोषणाची नव्हे,पोषणाची केंद्रे

सध्या मंदिरे उघडण्यावरून उलटसुलट चर्चा चालू आहेत.त्यातल्या राजकीय चर्चेत मला पडायचे नाही.कोरोना पुर्ण जाई पर्यंत ती बंद असावीत अस माझं व्यक्तीगत मत आहे. अन्य कोणाची मते वेगळी असू शकतात.माझ्या मताशी सहमत व्हावेंच असा माझा आग्रह नाही किंबहुना असे आग्रह कोणाचेच असू नयेत.
      पण मंदिराचा मुद्दा आला की ,मंदिरात देव असतो का?घरातल्या देवाची पूजा करा.मंदिरे बहुजनांचे शोषण करतात , अशा चर्चा चालू होतात.त्यासाठी गाडगेबाबा,प्रबोधनकार ठाकरे यांच्या लेखनाचे संदर्भ दिले जातात. त्या विषयीचे काही मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करतो.
१. देवाने माणूस निर्माण केला की माणसाने देव निर्माण केले? या वादात मी पडत नाही परंतु आदिम काळात जेव्हा विज्ञान बाल्यावस्थेत होते,माणूस सर्व बाजूनी असुरक्षित होता तेव्हा त्याला मानसिक आधार देण्याचे काम देव नावाच्या वास्तवाने म्हणा किंवा संकल्पनेने म्हणा नक्कीच केले आहे.
२. काळ जसा पुढे सरकत गेला तसे निराकार देवाला समजून घेण्यासाठी मूर्ती आणि विविध प्रतीके निर्माण झाली.माणूस हा मुळातच सामाजिक प्राणी असल्याने समूहाने राहतो.त्याचे सर्व सामाजिक ,आर्थिक आणि भावनिक व्यवहार एकमेकांशी निगडित असल्याने देवाच्या उपासनेला जी पूर्वी पासून सामुहिक स्तरावर होती तिला मंदिर,मस्जिद, चर्च, गुरुद्वारा,,पॅगोडा,अवेस्ता यांचेअधिष्ठान मिळाले. 
३. सामूहिक उपासने पासून व्यक्तिगत उपासनेचा प्रवास भारतीय धर्मामध्ये जास्त वेगाने झाला कारण व्यक्ती स्वातंत्र्य हा उपजत जीन्स भारतीयांच्या रक्तात उपजत आहे.
४. व्यक्तीगत उपासना जरी अस्तित्वात आली तरी सामूहिक उपासना बंद नाही झाल्या, उलट समूहाचे म्हणून जे काही लाभ असतात ते लक्षात येऊन सामूहिक उपासना अधिकच बळकट झाली.
५. कोणतेही कार्य ज्यावेळी समूहाने होते तेव्हा त्याला नेतृत्व लागते, मग अशा सामूहिक उपासनेला पण नेतृत्व मिळाले,असे नेतृत्व करणाऱ्याचे वर्ग निर्माण झाले.त्यांचे काम म्हणजे समूहाला उपासनेचे मार्गदर्शन करणे.सर्वच धर्मात असे वर्ग झाले. पुजारी, पुरोहित,मुल्ला, फादर, इत्यादि. 
६. काळाच्या ओघात अशा वर्गाला महत्व प्राप्त झाले कारण त्यांचे कार्य माणसाच्या दैनंदिन व्यवहारापेक्षा वेगळे होते. देवकार्य असल्याने आपोआपच गुढतेचे वलय  निर्माण झाले , त्याचा फायदा सर्वच धर्मातील या विशेष वर्गाने घेतला यात शंका नाही पण सर्वच तसे होते असे मुळीच नाही.
७. जर सर्वच वर्ग पुरोहित शोषण करणारा असता तर मंदिर व्यवस्था टिकलीच नसती.मंदिरे का टिकून राहिली याची कारणे आता पाहूया.अर्थात मी हिंदू असल्याने फक्त मंदिराविषयी लिहितोय.पण इतर धर्मियांना पण हे काही अंशी लागू आहे.
    अ. माणूस समाजप्रिय माणूस आहे.मंदिरांमुळे त्याला एकत्र येण्याचे कारण मिळाले.

    ब. मंदिरात जाण्यामुळे मानसिक समाधान मिळते.सर्वच लोक नवस करायला आणि फेडायला जातात हा गैरसमज आहे.

   क. मंदिरात धूप,कापूर, उद जाळला जातो . त्यामुळे वातावरण शुद्ध होते,फुलांची सजावट केली जाते त्यामुळे दृष्टी सौख्य मिळते.सर्वात महत्वाचे म्हणजे प्रार्थना, कोणत्याही धर्मातील प्रार्थना घ्या ती सकारात्मकच असते. हिंदूंच्या सर्व प्रार्थना नीट अभ्यासा , एकही प्रार्थना  एकवचनी नाही, सर्वांचे कल्याण होवो अशाच आहेत .जे जे म्हणून भारतीय धर्म आहेत त्यांच्या प्रार्थना विश्वाचे कल्याण व्हावे अशाच आहेत. एकत्र प्रार्थना केल्याने रेझोनन्स इफेक्ट चे फायदे मिळतात. एकच विचार एकाच वेळी अनेकांनी केला तर त्याचे फायदे गुणोत्तर पद्धतीने सर्वाना मिळतात. शेवटी विचार म्हणजे काय तर मेंदूतून निघणाऱ्या लहरी.त्या सकारात्मक करण्याची ताकद प्रार्थने मध्ये असते आणि त्या शतगुणीत  करण्याची ताकद सामूहिक प्रार्थनेत असते मग ती मंदिरातील प्रार्थना असो,नमाज असो वा चर्च मधील रविवारची प्रार्थना असो.

 ड. काही मोठी मंदिरे सोडली तर तुम्ही ग्रामीण भागातील मंदिरे पहा त्यांच्या कडे वर्षातून एकदा देवाची जत्रा असते.सर्व जत्रा पावसाळा संपल्यावर साधारणपणे सुगीचा हंगाम संपल्यावर असतात.त्यांचे कारण त्यावेळी शेतकरी कामातून मोकळा झालेला असायचा. गावच्या जत्रेत बारा बलुतेदार आपआपली उत्पादने विक्रीसाठी आणत त्यातुन त्यांच्या परस्परांच्या गरजा भागवल्या जात  होत्या.आज बलुतेदारी गेली तरी जत्रेत फिरून बघा किती मोठे आर्थिक व्यवहार होतात.

इ. मंदिरे ही ग्रामीण अर्थव्यवस्था सुरळीत चालावी म्हणून बूस्टर म्हणून काम करतात. आज रिझर्व्ह बॅंक रेपो दरात वाढ किंवा घट करून अर्थव्यवस्थेला बूस्टर देते तसाच बूस्टर एक मंदिर आणि त्या अनुषंगाने होणाऱ्या जत्रा ग्रामीण अर्थव्यवस्थेचे बूस्टर म्हणून काम करतात.जिज्ञासूंनी आता दसऱ्यानंतर येणाऱ्या गावोगावच्या जत्रा अनुभवाव्यात.

८. मी असे म्हणत नाही सर्वच  all is well आहे.काही ठिकाणी मंदिरातूनही भ्रष्टाचार चालू आहे.त्याचे समर्थन नाहीच पण सरसकट मंदिरे शोषणाची केंद्रे म्हणणे वास्तवाला धरून नाही. गाडगेबाबा आणि प्रबोधनकार ठाकरे यांनी त्यांच्या काळात जे काही दिसत होते त्याला अनुसरून टीका केल्या आहेत त्यात वावग काहिच नाही.किंबहुना त्या टिकेमुळेच हिंदूमनाला आत्म परीक्षण करून सुधारणा करायची संधी मिळाली. पण गाडगे बाबा आणि प्रबोधनकार जाऊन शंभर वर्षे झाली . आज मोठया मंदिरांचे ट्रस्ट झाले, लोक जागरूक झाले .बहुसंख्य मंदिरात देणगीची रक्कम पावती करून घेतली जाते, किंवा देणगी पेटीत रक्कम जमा केली जाते. हे जेव्हा मंदिरात जाल तेव्हा कळेल ना उगाचच जुनेपूराणे लेखन आज आधारभूत ठेऊन टीका करणे ही नवी अंधश्रद्धा नाही काय? बरं तुम्ही अशी टीका इतर धर्मातील गैर प्रकारांवर केलीत तर तुमच्या हेतूं बद्दल शंका येणार नाही .पण तिकडे टीका करताना तुमच्या बुच बसते त्याचे काय?

टीप-अभ्यासपूर्ण टीका विचारत घेतली जाईल,पूर्वग्रह ठेऊन केलेल्या टिकेला एकाच शब्दात उत्तर दिले जाईल तो शब्द म्हणजे..."हड"

-प्रशांत शेलटकर
 8600583846

Thursday, 15 October 2020

नावात काय आहे

*नावात आहे बरंच काही* 

नावात काय आहे असं म्हटलं जातं..पण नावातच खूप काही असतं.. प्रत्येक नावाला अर्थ असतो. तो अर्थ लक्षात घेतला आणि त्या नावाच्या माणसाकडे पाहिलं तर वेगळीच गंमत येते..
    आपल्याकडे काही नावं अत्यंत कॉमन आहेत.विजय,संतोष ही त्यातलीच नावं... रस्त्याने जाताना विजय म्हणून हाक मारली तर चार पाच 'विजय ' आपल्याकडे हटकून बघणार इतकं ते कॉमन नाव आहे..
    पती पत्नी च्या प्रेमाचा *विजय* झाल्यावर त्यांना जे मूल होत त्याचे नाव ते विजय म्हणून ठेवत असावेत😀😀
   प्रसिद्ध मराठी अभिनेता विजय कदम आणि अभिनेत्री पदमश्री यांचा विवाह झाला तेव्हा अस म्हटलं गेलं की *पदमश्रीचा विजय झाला,विजयला पदमश्री मिळाली..* किती छान शाब्दिक कोटी ना..☺️
    *संतोष* ...तोष म्हणजे आनंद..स म्हणजे चांगला..ज्या सामान्य नावाच्या अलीकडे स लावला जातो तेव्हा ते चांगुलपणा धारण करते . उदा.जन म्हणजे लोक सज्जन म्हणजे चांगले लोक,दीप म्हणजे नुसता दिवा..किंवा प्रकाश *संदीप* म्हणजे चांगला दिवा, किंवा चांगला प्रकाश..
   मला भेटलेले बहुतेक *संतोष* हे गंभीर आहेत..आनंद पण गंभीरपणे व्यक्त करतात..काही अपवाद नक्की आहेत..
   महेश म्हणजे महा +ईश ,महान ईश्वर देवांचा देव शंकर, शंकर म्हणजे तांडव करणारा...सृष्टीचा नाश करणारा...शीघ्र कोपी... तिसरा डोळा उघडून भस्म करणारा...
    पण माझ्या महितीतले सगळे *महेश* एकदम शांत गोगलगाय आहेत..तिसरा डोळा सोडा दोन डोळे वर करून बोलत नाहीत कधी....
    *रवींद्र* ...रवी म्हणजे सूर्य रवींद्र म्हणजे सूर्यांचा सूर्य...अशा नावाच्या माणसाचे लग्न चंद्राच्या पूर्ण कलेशी *पौर्णिमेशी* होतं.. किती गंमत ना😀
      आई बापाच्या प्रेमाचा एखादा *संकेत* जन्माला येतो मान्य आहे पण..संकेतचे स्त्री लिंगी रूप *संकेता* या नावाला काही अर्थ असतो का? 
     *स्मिता* नावाच्या मुली इतक्या गंभीर का असतात? आणि बहुतेकसे *सुधीर* अधीर का असतात हाही एक उत्तर न मिळालेला प्रश्न..
    एखादया *सुलोचनाला* जाड भिंगाचा चष्मा लागला तर तिचे "सुलोचन" दिसणार कसे?🤔
    *लक्ष्मीबाई* हे नाव मोलकरणीचे नाव कस असू शकत? आणि *धोंडोपंत* हे नाव श्रीमंतांचे कसे असू शकते? लहानपणी आमच्या वर्गात *विद्या* नावाची ढ मुलगी होती आणि *गुंड्या* नावाचा सभ्य मुलगा...किती गंमत ना..
    *उपेंद्र* हे गणपतीचे नाव पण इंद्राचे हे डेप्युटी डिपार्टमेंट गणपतीकडे कसे? उप+इंद्र = *उपेंद्र* ☺️☺️☺️
     *अनिकेत* या नावाचा  शब्दार्थ ज्याला निकेत म्हणजे घर नाही तो ,भावार्थ अमर्याद अनंत परमेश्वर ज्याला मर्यादेत बांधता येत नाही तो...पण *सानिकेत* या नावाचा अर्थ मला कळलेला नाही. 
    टोपण नावं तर खूप लडिवाळ असतात...बाबू हे नाव उच्चारताना आईच्या ओठांचा चंबू होतो..बाबू हे नाव मातृवात्सल्याने ओतप्रोत भरलं आहे.. *बाबू* म्हटलं की आईच्या पायात घूटमळणारे उघडनागड मूल आठवतं... त्याच बाबूला छान अंघोळ घालून टिटी पावडर काजळ घालून सजवलं की त्याचा *बाळ* होतो... आठवा जाई काजळची जाहिरात..☺️
     नावाच्या खूप गमती असतात.कारण त्या नावाना अर्थ असतो..काही नावे मात्र लिंगभेदाचे प्रतीक असतात..मुलगी झाली की तीच नाव *नकोशी* ठेवलं जातं..किती वाईट आहे हे😔 परवाच एका मुलीचं नाव वाचलं... *निराशा* ...निराश करणार हे कसल नाव???
सगळं कळलं पण मला दोन नावांचे अर्थ अजून कळले नाहीत

एक, *क्रीशा* 
दोन , *प्रिशा* 

😀😀😀😀😀

-प्रशांत शेलटकर
 8600583846

Wednesday, 14 October 2020

दुनियादारी -3

आपल्याला हवा तसा परफेक्ट माणूस कधीच जन्माला येत नसतो..तो परफेक्ट नसतो म्हणूनच आपल्यातल्या परफेक्शन ला अर्थ येतो..सगळेच परफेक्ट असते तर आयुष्य बेचव झाले असते
@ प्रशांत

दुनियादारी-2

माणसालाच नाही तर निसर्गाला पण मागच्या आठवणीत रमायला आवडत...अजून पावसाळ्यातच रमलाय गडी...
@प्रशांत

दुनियादारी-१

वादळी वाऱ्याने भिंती वरच्या कॅलेंडरची पाने फडफडली आणि ऑक्टोबरच्या ऐवजी जुलैच पान दिसायला लागलं...
😊😊😊

@प्रशांत

दुनियादारी-

आपल्याला हवा तसा परफेक्ट माणूस कधीच जन्माला येत नसतो..तो परफेक्ट नसतो म्हणूनच आपल्यातल्या परफेक्शन ला अर्थ येतो..सगळेच परफेक्ट असते तर आयुष्य बेचव झाले असते
@ प्रशांत

Tuesday, 6 October 2020

परतीचा पाऊस

परतीचा पाऊस

थोडा गडगडत
थोडा कडकडत
परतीचा पाऊस
धरणीला म्हणाला
येतो ग.....

धुक्याचा पदर
डोळ्यांना लावत
धरणी म्हणाली
तुमचं नेहमी असच असतं
यायचं उशिरा आणि
जायच मात्र लवकर असतं..

तिला समजावत
पाऊस म्हणाला,
अग मला का तुझी ओढ नाही ?
पण तो साला अल-निनो,
मला मुळी सोडतच नाही.

यावर्षी बघ ना,
त्याचा डोळा चुकवून आलो
तुझ्या मनासारखं बरसून गेलो
आपली बाळ बघ ना
किती किती खुश आहेत
हिरवे कपडे घालून
बघ कशी मिरवत आहेत...

तुला अस धुंद बघून
मीही कधी धुंद होतो
फुंकर घालून वादळाची
कधीतरी मस्ती करतो

बायकोच ना माझी तू !
खोटं खोटं रुसू नको
निरोपाची वेळ झाली
आता बाई रडू नको

निरोप देताना धरणीचे
डोळे असे भरून आले
नदी ,तलाव आणि धरणे
दुथडी भरून वाहू लागले

आता परत कधी?
धुक्याचा पदर डोळ्यांना लावून
पावसाला परत विचारले,
पुढच्या मृगात,
ढगांचे काळीज उत्तरले

सगळा पसारा आवरून
पाऊस मग निघून गेला
वनात,पानात आणि मनातही
वसा त्याचा ठेऊन गेला..

@ प्रशांत शेलटकर
     8600583846
     07/10/2020

चष्मा..

चष्मा.... मित्रा तुझा चष्मा मला दे पाहीन ना जग मी तुझ्या नजरेतून..पण क्षणभरच पण तू ही हे जग बघ ना स्वच्छ नितळ नजरेने चष्म्याशिवाय...... हे च...