Ad

Saturday, 17 October 2020

मंदिरे शोषणाची नव्हे,पोषणाची केंद्रे

मंदिरे शोषणाची नव्हे,पोषणाची केंद्रे

सध्या मंदिरे उघडण्यावरून उलटसुलट चर्चा चालू आहेत.त्यातल्या राजकीय चर्चेत मला पडायचे नाही.कोरोना पुर्ण जाई पर्यंत ती बंद असावीत अस माझं व्यक्तीगत मत आहे. अन्य कोणाची मते वेगळी असू शकतात.माझ्या मताशी सहमत व्हावेंच असा माझा आग्रह नाही किंबहुना असे आग्रह कोणाचेच असू नयेत.
      पण मंदिराचा मुद्दा आला की ,मंदिरात देव असतो का?घरातल्या देवाची पूजा करा.मंदिरे बहुजनांचे शोषण करतात , अशा चर्चा चालू होतात.त्यासाठी गाडगेबाबा,प्रबोधनकार ठाकरे यांच्या लेखनाचे संदर्भ दिले जातात. त्या विषयीचे काही मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करतो.
१. देवाने माणूस निर्माण केला की माणसाने देव निर्माण केले? या वादात मी पडत नाही परंतु आदिम काळात जेव्हा विज्ञान बाल्यावस्थेत होते,माणूस सर्व बाजूनी असुरक्षित होता तेव्हा त्याला मानसिक आधार देण्याचे काम देव नावाच्या वास्तवाने म्हणा किंवा संकल्पनेने म्हणा नक्कीच केले आहे.
२. काळ जसा पुढे सरकत गेला तसे निराकार देवाला समजून घेण्यासाठी मूर्ती आणि विविध प्रतीके निर्माण झाली.माणूस हा मुळातच सामाजिक प्राणी असल्याने समूहाने राहतो.त्याचे सर्व सामाजिक ,आर्थिक आणि भावनिक व्यवहार एकमेकांशी निगडित असल्याने देवाच्या उपासनेला जी पूर्वी पासून सामुहिक स्तरावर होती तिला मंदिर,मस्जिद, चर्च, गुरुद्वारा,,पॅगोडा,अवेस्ता यांचेअधिष्ठान मिळाले. 
३. सामूहिक उपासने पासून व्यक्तिगत उपासनेचा प्रवास भारतीय धर्मामध्ये जास्त वेगाने झाला कारण व्यक्ती स्वातंत्र्य हा उपजत जीन्स भारतीयांच्या रक्तात उपजत आहे.
४. व्यक्तीगत उपासना जरी अस्तित्वात आली तरी सामूहिक उपासना बंद नाही झाल्या, उलट समूहाचे म्हणून जे काही लाभ असतात ते लक्षात येऊन सामूहिक उपासना अधिकच बळकट झाली.
५. कोणतेही कार्य ज्यावेळी समूहाने होते तेव्हा त्याला नेतृत्व लागते, मग अशा सामूहिक उपासनेला पण नेतृत्व मिळाले,असे नेतृत्व करणाऱ्याचे वर्ग निर्माण झाले.त्यांचे काम म्हणजे समूहाला उपासनेचे मार्गदर्शन करणे.सर्वच धर्मात असे वर्ग झाले. पुजारी, पुरोहित,मुल्ला, फादर, इत्यादि. 
६. काळाच्या ओघात अशा वर्गाला महत्व प्राप्त झाले कारण त्यांचे कार्य माणसाच्या दैनंदिन व्यवहारापेक्षा वेगळे होते. देवकार्य असल्याने आपोआपच गुढतेचे वलय  निर्माण झाले , त्याचा फायदा सर्वच धर्मातील या विशेष वर्गाने घेतला यात शंका नाही पण सर्वच तसे होते असे मुळीच नाही.
७. जर सर्वच वर्ग पुरोहित शोषण करणारा असता तर मंदिर व्यवस्था टिकलीच नसती.मंदिरे का टिकून राहिली याची कारणे आता पाहूया.अर्थात मी हिंदू असल्याने फक्त मंदिराविषयी लिहितोय.पण इतर धर्मियांना पण हे काही अंशी लागू आहे.
    अ. माणूस समाजप्रिय माणूस आहे.मंदिरांमुळे त्याला एकत्र येण्याचे कारण मिळाले.

    ब. मंदिरात जाण्यामुळे मानसिक समाधान मिळते.सर्वच लोक नवस करायला आणि फेडायला जातात हा गैरसमज आहे.

   क. मंदिरात धूप,कापूर, उद जाळला जातो . त्यामुळे वातावरण शुद्ध होते,फुलांची सजावट केली जाते त्यामुळे दृष्टी सौख्य मिळते.सर्वात महत्वाचे म्हणजे प्रार्थना, कोणत्याही धर्मातील प्रार्थना घ्या ती सकारात्मकच असते. हिंदूंच्या सर्व प्रार्थना नीट अभ्यासा , एकही प्रार्थना  एकवचनी नाही, सर्वांचे कल्याण होवो अशाच आहेत .जे जे म्हणून भारतीय धर्म आहेत त्यांच्या प्रार्थना विश्वाचे कल्याण व्हावे अशाच आहेत. एकत्र प्रार्थना केल्याने रेझोनन्स इफेक्ट चे फायदे मिळतात. एकच विचार एकाच वेळी अनेकांनी केला तर त्याचे फायदे गुणोत्तर पद्धतीने सर्वाना मिळतात. शेवटी विचार म्हणजे काय तर मेंदूतून निघणाऱ्या लहरी.त्या सकारात्मक करण्याची ताकद प्रार्थने मध्ये असते आणि त्या शतगुणीत  करण्याची ताकद सामूहिक प्रार्थनेत असते मग ती मंदिरातील प्रार्थना असो,नमाज असो वा चर्च मधील रविवारची प्रार्थना असो.

 ड. काही मोठी मंदिरे सोडली तर तुम्ही ग्रामीण भागातील मंदिरे पहा त्यांच्या कडे वर्षातून एकदा देवाची जत्रा असते.सर्व जत्रा पावसाळा संपल्यावर साधारणपणे सुगीचा हंगाम संपल्यावर असतात.त्यांचे कारण त्यावेळी शेतकरी कामातून मोकळा झालेला असायचा. गावच्या जत्रेत बारा बलुतेदार आपआपली उत्पादने विक्रीसाठी आणत त्यातुन त्यांच्या परस्परांच्या गरजा भागवल्या जात  होत्या.आज बलुतेदारी गेली तरी जत्रेत फिरून बघा किती मोठे आर्थिक व्यवहार होतात.

इ. मंदिरे ही ग्रामीण अर्थव्यवस्था सुरळीत चालावी म्हणून बूस्टर म्हणून काम करतात. आज रिझर्व्ह बॅंक रेपो दरात वाढ किंवा घट करून अर्थव्यवस्थेला बूस्टर देते तसाच बूस्टर एक मंदिर आणि त्या अनुषंगाने होणाऱ्या जत्रा ग्रामीण अर्थव्यवस्थेचे बूस्टर म्हणून काम करतात.जिज्ञासूंनी आता दसऱ्यानंतर येणाऱ्या गावोगावच्या जत्रा अनुभवाव्यात.

८. मी असे म्हणत नाही सर्वच  all is well आहे.काही ठिकाणी मंदिरातूनही भ्रष्टाचार चालू आहे.त्याचे समर्थन नाहीच पण सरसकट मंदिरे शोषणाची केंद्रे म्हणणे वास्तवाला धरून नाही. गाडगेबाबा आणि प्रबोधनकार ठाकरे यांनी त्यांच्या काळात जे काही दिसत होते त्याला अनुसरून टीका केल्या आहेत त्यात वावग काहिच नाही.किंबहुना त्या टिकेमुळेच हिंदूमनाला आत्म परीक्षण करून सुधारणा करायची संधी मिळाली. पण गाडगे बाबा आणि प्रबोधनकार जाऊन शंभर वर्षे झाली . आज मोठया मंदिरांचे ट्रस्ट झाले, लोक जागरूक झाले .बहुसंख्य मंदिरात देणगीची रक्कम पावती करून घेतली जाते, किंवा देणगी पेटीत रक्कम जमा केली जाते. हे जेव्हा मंदिरात जाल तेव्हा कळेल ना उगाचच जुनेपूराणे लेखन आज आधारभूत ठेऊन टीका करणे ही नवी अंधश्रद्धा नाही काय? बरं तुम्ही अशी टीका इतर धर्मातील गैर प्रकारांवर केलीत तर तुमच्या हेतूं बद्दल शंका येणार नाही .पण तिकडे टीका करताना तुमच्या बुच बसते त्याचे काय?

टीप-अभ्यासपूर्ण टीका विचारत घेतली जाईल,पूर्वग्रह ठेऊन केलेल्या टिकेला एकाच शब्दात उत्तर दिले जाईल तो शब्द म्हणजे..."हड"

-प्रशांत शेलटकर
 8600583846

No comments:

Post a Comment

चष्मा..

चष्मा.... मित्रा तुझा चष्मा मला दे पाहीन ना जग मी तुझ्या नजरेतून..पण क्षणभरच पण तू ही हे जग बघ ना स्वच्छ नितळ नजरेने चष्म्याशिवाय...... हे च...