Ad

Tuesday, 6 October 2020

परतीचा पाऊस

परतीचा पाऊस

थोडा गडगडत
थोडा कडकडत
परतीचा पाऊस
धरणीला म्हणाला
येतो ग.....

धुक्याचा पदर
डोळ्यांना लावत
धरणी म्हणाली
तुमचं नेहमी असच असतं
यायचं उशिरा आणि
जायच मात्र लवकर असतं..

तिला समजावत
पाऊस म्हणाला,
अग मला का तुझी ओढ नाही ?
पण तो साला अल-निनो,
मला मुळी सोडतच नाही.

यावर्षी बघ ना,
त्याचा डोळा चुकवून आलो
तुझ्या मनासारखं बरसून गेलो
आपली बाळ बघ ना
किती किती खुश आहेत
हिरवे कपडे घालून
बघ कशी मिरवत आहेत...

तुला अस धुंद बघून
मीही कधी धुंद होतो
फुंकर घालून वादळाची
कधीतरी मस्ती करतो

बायकोच ना माझी तू !
खोटं खोटं रुसू नको
निरोपाची वेळ झाली
आता बाई रडू नको

निरोप देताना धरणीचे
डोळे असे भरून आले
नदी ,तलाव आणि धरणे
दुथडी भरून वाहू लागले

आता परत कधी?
धुक्याचा पदर डोळ्यांना लावून
पावसाला परत विचारले,
पुढच्या मृगात,
ढगांचे काळीज उत्तरले

सगळा पसारा आवरून
पाऊस मग निघून गेला
वनात,पानात आणि मनातही
वसा त्याचा ठेऊन गेला..

@ प्रशांत शेलटकर
     8600583846
     07/10/2020

No comments:

Post a Comment

चष्मा..

चष्मा.... मित्रा तुझा चष्मा मला दे पाहीन ना जग मी तुझ्या नजरेतून..पण क्षणभरच पण तू ही हे जग बघ ना स्वच्छ नितळ नजरेने चष्म्याशिवाय...... हे च...