Ad

Thursday, 15 October 2020

नावात काय आहे

*नावात आहे बरंच काही* 

नावात काय आहे असं म्हटलं जातं..पण नावातच खूप काही असतं.. प्रत्येक नावाला अर्थ असतो. तो अर्थ लक्षात घेतला आणि त्या नावाच्या माणसाकडे पाहिलं तर वेगळीच गंमत येते..
    आपल्याकडे काही नावं अत्यंत कॉमन आहेत.विजय,संतोष ही त्यातलीच नावं... रस्त्याने जाताना विजय म्हणून हाक मारली तर चार पाच 'विजय ' आपल्याकडे हटकून बघणार इतकं ते कॉमन नाव आहे..
    पती पत्नी च्या प्रेमाचा *विजय* झाल्यावर त्यांना जे मूल होत त्याचे नाव ते विजय म्हणून ठेवत असावेत😀😀
   प्रसिद्ध मराठी अभिनेता विजय कदम आणि अभिनेत्री पदमश्री यांचा विवाह झाला तेव्हा अस म्हटलं गेलं की *पदमश्रीचा विजय झाला,विजयला पदमश्री मिळाली..* किती छान शाब्दिक कोटी ना..☺️
    *संतोष* ...तोष म्हणजे आनंद..स म्हणजे चांगला..ज्या सामान्य नावाच्या अलीकडे स लावला जातो तेव्हा ते चांगुलपणा धारण करते . उदा.जन म्हणजे लोक सज्जन म्हणजे चांगले लोक,दीप म्हणजे नुसता दिवा..किंवा प्रकाश *संदीप* म्हणजे चांगला दिवा, किंवा चांगला प्रकाश..
   मला भेटलेले बहुतेक *संतोष* हे गंभीर आहेत..आनंद पण गंभीरपणे व्यक्त करतात..काही अपवाद नक्की आहेत..
   महेश म्हणजे महा +ईश ,महान ईश्वर देवांचा देव शंकर, शंकर म्हणजे तांडव करणारा...सृष्टीचा नाश करणारा...शीघ्र कोपी... तिसरा डोळा उघडून भस्म करणारा...
    पण माझ्या महितीतले सगळे *महेश* एकदम शांत गोगलगाय आहेत..तिसरा डोळा सोडा दोन डोळे वर करून बोलत नाहीत कधी....
    *रवींद्र* ...रवी म्हणजे सूर्य रवींद्र म्हणजे सूर्यांचा सूर्य...अशा नावाच्या माणसाचे लग्न चंद्राच्या पूर्ण कलेशी *पौर्णिमेशी* होतं.. किती गंमत ना😀
      आई बापाच्या प्रेमाचा एखादा *संकेत* जन्माला येतो मान्य आहे पण..संकेतचे स्त्री लिंगी रूप *संकेता* या नावाला काही अर्थ असतो का? 
     *स्मिता* नावाच्या मुली इतक्या गंभीर का असतात? आणि बहुतेकसे *सुधीर* अधीर का असतात हाही एक उत्तर न मिळालेला प्रश्न..
    एखादया *सुलोचनाला* जाड भिंगाचा चष्मा लागला तर तिचे "सुलोचन" दिसणार कसे?🤔
    *लक्ष्मीबाई* हे नाव मोलकरणीचे नाव कस असू शकत? आणि *धोंडोपंत* हे नाव श्रीमंतांचे कसे असू शकते? लहानपणी आमच्या वर्गात *विद्या* नावाची ढ मुलगी होती आणि *गुंड्या* नावाचा सभ्य मुलगा...किती गंमत ना..
    *उपेंद्र* हे गणपतीचे नाव पण इंद्राचे हे डेप्युटी डिपार्टमेंट गणपतीकडे कसे? उप+इंद्र = *उपेंद्र* ☺️☺️☺️
     *अनिकेत* या नावाचा  शब्दार्थ ज्याला निकेत म्हणजे घर नाही तो ,भावार्थ अमर्याद अनंत परमेश्वर ज्याला मर्यादेत बांधता येत नाही तो...पण *सानिकेत* या नावाचा अर्थ मला कळलेला नाही. 
    टोपण नावं तर खूप लडिवाळ असतात...बाबू हे नाव उच्चारताना आईच्या ओठांचा चंबू होतो..बाबू हे नाव मातृवात्सल्याने ओतप्रोत भरलं आहे.. *बाबू* म्हटलं की आईच्या पायात घूटमळणारे उघडनागड मूल आठवतं... त्याच बाबूला छान अंघोळ घालून टिटी पावडर काजळ घालून सजवलं की त्याचा *बाळ* होतो... आठवा जाई काजळची जाहिरात..☺️
     नावाच्या खूप गमती असतात.कारण त्या नावाना अर्थ असतो..काही नावे मात्र लिंगभेदाचे प्रतीक असतात..मुलगी झाली की तीच नाव *नकोशी* ठेवलं जातं..किती वाईट आहे हे😔 परवाच एका मुलीचं नाव वाचलं... *निराशा* ...निराश करणार हे कसल नाव???
सगळं कळलं पण मला दोन नावांचे अर्थ अजून कळले नाहीत

एक, *क्रीशा* 
दोन , *प्रिशा* 

😀😀😀😀😀

-प्रशांत शेलटकर
 8600583846

No comments:

Post a Comment

चष्मा..

चष्मा.... मित्रा तुझा चष्मा मला दे पाहीन ना जग मी तुझ्या नजरेतून..पण क्षणभरच पण तू ही हे जग बघ ना स्वच्छ नितळ नजरेने चष्म्याशिवाय...... हे च...