Ad

Tuesday, 29 October 2019

सुखाची व्याख्या

खूप सुखी आहे मी
जेव्हा ती म्हणाली
नेमकं त्याच वेळी
तिच्या डोळ्यात धूळ गेली...

चटकन बाजूला होत
जेव्हा तिने डोळे पुसले
न सांगताच तिच्या
सुखाचे कारण कळले

नसणारी सुखं..
हवीहवीशी वाटतात,
असणारी दुःख,
नको नकोशी वाटतात...
तरीही ती...
खूप सुखी आहे म्हणाली
नेमकं त्याच वेळी
तिच्या डोळ्यात धूळ गेली...

मी म्हणालो तिला,
इतकं सुख बरं नव्हे,
असे डोळे भरून येणं
नक्कीच चांगलं नव्हे
डोळ्यातलं पाणी पुसून
ती इतकंच म्हणाली..
मी केव्हाच माझ्या सुखाची
व्याख्याच बदलली...

आता जेव्हा कधी ती
अवचित भेटते,
डोळे भरून येईपर्यंत
खूप हसून घेते..
न जाणो अचानक
डोळ्यात धुळीचे कण जातील
आणि मग परत...
सुखाच्या व्याख्याच बदलतील


-प्रशांत शेलटकर
 8600583846

माज

किती दिवस हे नखरे
किती दिवस हे तारुण्य
सरून जातील दिन हे
उरेल फक्त कारुण्य...

ही बट होईल रुपेरी
अन सुरकुत्यांचे जाळे
उरतील मोजकेच ग
केस डोईवर काळे

तरी करशील हट्ट
तारुण्य जपण्याचा
झरझर निघून जाईल
हा जोश  यौवनाचा

मग तू पडशील एकटी
फितूर होईल आरसा...
एकांती मग सोबती
एक अश्रू अन एक उसासा

आनंद घे तू आजचा
पण उद्याला विसरू नको
तारुण्य हे क्षणभराचे
माज त्याचा करू नको

-प्रशांत शेलटकर
 8600583846

Wednesday, 23 October 2019

मुखवटे जुने झाले

हे दिसण्याचे सोहळे
आता पुरे झाले...
किती वापरू पुन्हा पुन्हा
मुखवटे तेच ते जुने झाले

हरवलो कधीच मी...
मिळणे मुश्किल झाले
शोध माझाच मला लागणे
आता किती कठीण झाले

न जाणे कसे  चेहऱ्याला
कसले हे रंग लागले...
रंग कोणता खरा ते
ओळखणे कठीण झाले...

जे स्वप्न पाहिले कधी
ते न सत्यात कधी उतरले
जे सत्य भोगले ते..
ते न स्वप्नीही कधी पाहिले

हे संचित वंचनांचे..
का उगाच हे जपले
इथे माझ्याच प्रश्नांना
मलाच मी उत्तरिले


--प्रशांत शेलटकर
8600583846

स्पेस

स्पेस

क्षणभर तुझ्यासाठी वेळ
सखी कधी देशील का?...
क्षणभर स्वतःची खुशाली तू
स्वतःलाच विचारशील का?

नवऱ्याच ऑफीस अन
मुलांच्या शाळा....
तूच सांभाळतेस  ग
सर्वांच्या वेळा...
स्वतःसाठी वेळ कधी काढशील का?
क्षणभर स्वतःची खुशाली तू
स्वतःलाच विचारशील का?

सुनबाई माझी छान आहे
सासू आजारपणातच म्हणते
आणि नवऱ्याला तर तू
फक्त रात्रीच सुंदर दिसते...
स्वार्थाची दुनिया तुला
कधी समजेल का?
क्षणभर स्वतःची खुशाली तू
स्वतःलाच विचारशील का?

सजून बघ फक्त स्वतःसाठी
दुसऱ्यासाठी तर सजतेसच
जगून बघ स्वत:साठीच..
दुसऱ्यासाठीच तर झिजतेसच
दुसऱ्यासाठी स्पेस देतेस
स्वतः साठी देशील का?
क्षणभर स्वतःची खुशाली
स्वतःलाच विचारशील का?

दुसऱ्यासाठी करताना ग
आयुष्य तुझं सरून जाईल
तुझ्यासाठी कुणाचे ग
दोन डोळे  भरून येतील ?
तुझ्या डोळ्यात तुझ्यासाठीच
स्वप्न कधी पाहशील का?
क्षणभर स्वतःची खुशाली
स्वतःलाच विचारशील का?

-प्रशांत शेलटकर
  रत्नागिरी

Sunday, 20 October 2019

वर्तमानात रंगू

वर्तमानात रंगू...

त्याच त्याच स्मरणकथा
आता नको सांगू..
काळा बरोबर बदलू आता
वर्तमानातच रंगू

आता आली श्रीमंती
म्हणून गरीबी रम्य वाटे
आता रमतो फुलांमध्ये
म्हणून आता न रुतती काटे
काटे कसे बोचले पूर्वी
ते आता नका सांगू
काळा बरोबर बदलू आता
वर्तमानातच रंगू

येता सण दारात
त्याचे मस्त स्वागत करा
पूर्वी होते असे तसे
सांगणे आता बंद करा
जे केले भूतकाळात
ते आता नका  सांगू
काळा बरोबर बदलू आता
वर्तमानातच रंगू....

जे गेले ते गेलेच भाऊ
आता परत येणार नाही
काळाच्या पाढयाला
उलटी गिनतीच नाही
त्याच त्या रडकथा
आता नको सांगू
काळा बरोबर बदलू आता
वर्तमानातच रंगू...

-प्रशांत शेलटकर
8600583846

Sunday, 13 October 2019

स्मृती फुले

स्मृती फुले

निरोप त्याचा घेताना
टचकन तिचे भरले डोळे
निरोप तिला देताना
उलून आले काळीज ओले...

ओठांची फक्त थरथर झाली
शब्द अवचित मौनात गेले
येते रे हलकेच  म्हणताना..
पापण्यांचे बांधच फुटले...

हात तिचा निसटूनच गेला
श्वास त्याचा कोंडून गेला
स्पर्श तिचा तो शेवटचा
तिच्यासोबत विरून गेला

हुंदका आवरता आवरता
जप म्हणाली जाता जाता
जपले ते सोडून जाता
जपायचं आता कुणाला?

ती अलगद निघून गेली
भिजून अख्खी रात्र गेली
जाताना ओंजळीत त्याच्या
स्मृतींची फुले देऊन गेली

-प्रशांत शशिकांत शेलटकर
8600583846

Saturday, 5 October 2019

झाडायन

झाडायन

झाडांचं पण किती
वेगळं नशीब असतं !
कुणाच्या नशिबी आरे
कुणाच्या लव्हासा असतं !

आऱ्यात तुटली तर
निसर्गाचा नाश असतो
लव्हासात तुटली तर
देशाचा विकास असतो

झाडंच बिचारी ती
त्यांना कुठे मन असतं?
कुणाच्या तरी विकासासाठी
त्यांना अस तुटावंच लागत

झाडंच बिचारी ती
त्यांना कुठे मत असतं?
मतं असती जर त्यांना
तर कुणी असं तोडलं असत?

आज इथे अन उद्या तिथे
झाडं शहीद होत आहेत
सोईप्रमाणे ज्याच्या त्याच्या
सगळे निषेध करत आहेत...

-प्रशांत शशिकांत शेलटकर
8600583846

मॅनर्स

*मॅनर्स*

सगळेच म्हणतात नेहमी आनंदी रहावं... खरंच शक्य असतं का? अवचित आलेलं सुखं चेहऱ्याला एक छान स्मित देत असलं तरी मनात सलणारी वेदना नेहमीच डोळ्यातून वहाते हे वास्तव नाही का?
    सतत आनंदी दिसणारा माणूस खरंच तसा असतो का? हा एक लाखमोलाचा प्रश्न..माणसं हसतात अगदी दिलखुलास पण रडताना का संकोचतात...मनमोकळे रडणे ही काय बुझदीली आहे का?
    येणारा प्रत्येक क्षण आनंदच घेऊन यावा असा हट्ट का करावा माणसानं... साखरेचा कण गोडवा घेऊन येणार ,अन मिठाचा कण खारट पणा ..तो त्या कणाचा स्थायीभाव नाही का?
    मग आपल्या आयुष्यात येणारे सर्वच क्षण आनंदाचे कसे असतील..अपमानाचे, नैराश्येचे,विफलतेचे क्षण पण येणारच ना मग त्या क्षणांना आनंदाने सामोरे जावं असं म्हणतात म्हणजे नेमकं काय करावं? रडू आलं तरी रडू नये? चिडावं अस वाटलं तर चिडू नये? की उगाचच आनंदी असल्याचा देखावा करावा?
     असे देखावे करण्यापेक्षा त्या क्षणांना न्याय दयावा...रडावस वाटलं तर बिनधास्त रडावं..चिडावं अस वाटलं तर चिडावं...पण व्यक्त व्हावं..कधी कधी माणूस स्वतःच्याच प्रतिमेत अडकून बसतो..व्यक्त व्हायची पण भीती वाटत रहाते.. ही एक प्रकारची आत्मवंचनाच नाही का?
    आत्यंतिक दुःखाच्या वेळी सावर रे रडू नकोस सांगणारे खूप असतात.त्या दुःखाचा सल काय असतो ते सहन करणारा जाणत असतो..तो रडता रडताच सावरत जात असतो..हल्ली रडणे मॅनर्सलेस समजलं जातं. खरं म्हणजे
    माणसं हल्ली उस्फुर्त व्यक्त होतच नाहीत.ती फक्त एटिकेट्स,मॅनर्स च्या फुटपट्ट्या स्वतःला लावतात आणि घुसमटत राहतात. हे कॉर्पोरेट मॅनर्स आपल्या जगण्याचाच  गळा घोटणार की काय अशी भीती वाटत राहते आजकाल..

-प्रशांत शेलटकर
  8600583846

चष्मा..

चष्मा.... मित्रा तुझा चष्मा मला दे पाहीन ना जग मी तुझ्या नजरेतून..पण क्षणभरच पण तू ही हे जग बघ ना स्वच्छ नितळ नजरेने चष्म्याशिवाय...... हे च...