Ad

Friday, 26 July 2019

मी आलोच आहे तर..

मी आलोच आहे तर...

मी आलोच आहे तर,
बोल माझ्याशी मनमोकळी
अशी दार अर्धवट मिटून
बोलू नकोस...
खात्री बाळग
मी उंबरा ओलांडणार नाही
आणि तुलाही ओलांडू देणार नाही

मी आलोच आहे तर,
नजर चोरू नकोस
डोळ्यात डोळ्यात घालून बोल
बघ माझी नजर
अजूनही स्वच्छ आहे..
पूर्वी होती तशीच..

मी आलोच आहे तर,
सावरशील पदर जरासा..
पण उगाचच डोक्यावर
पदर घेऊन हास्यास्पद
करू नकोस तुलाही अन
मलाही...

मी आलोच आहे तर
नक्कीच जाणार आहे.
मनातली वादळं,
मनातच राहतील ,
उंबरा ओलांडून ती
आत येणार नाहीच नक्कीच

मी आलोच आहे तर....

-प्रशांत शेलटकर
8600583846
रत्नागिरी

Monday, 22 July 2019

सम्राट

सम्राट

भीत भीत जगण्यापेक्षा
पित पित जगावं.....
हरली जरी प्रत्येक बाजी
तरी जित जित म्हणावं...

धुंद कुंद संध्याकाळी
एक मस्त पेग भरावा...
पेंगाळलेल्या जिंदगीला
जम्बो जेटचा वेग यावा...

किंचित ग्लास उंचवावे अन
चिअर्स करावे जिंदगीला..
बंधनाचे लगाम सोडावे अन
बेलगाम करावे जिंदगीला...

अशी  भिनावी वारुणी की
सशाचा मग सिंह व्हावा...
अशी फोडावी डरकाळी मग
भयकंपित सगळा बार व्हावा

सम्राट मग  मी दरबाराचा
सेवका दे रे अजून चाकना
ते "मुंगळा" बंद करा रे...
तो पंकज उधास लाव ना...

रंगावी अशी उत्तररात्र..
असे धूनकीत घरी यावं
भीत भीत जगण्यापेक्षा
पित पित जगावं....

भीत भीत जगण्यापेक्षा
पित पित जगावं.....
हरली जरी प्रत्येक बाजी
तरी जित जित म्हणावं...

-( वैधानिक इशारा- अति मद्यप्राशन प्रकृतीस हानिकारक आहे)

-प्रशांत शेलटकर
8600583846
रत्नागिरी

मैत्रिणी

मैत्रिणी,
तुझ्या माझ्यातलं अंतर
तसंच राहूदे..
कारण त्यामुळेच आहे ना
तुझ्या माझ्या अस्तित्वाला,
स्वतंत्र अर्थ...

मैत्रिणी,
नाही म्हणणार तुला मी
ताई , माई आणि दीदी
नाही लावणार तुझ्या नावापुढे
तो नाटकी "जी"
कारण नाटकी उपाधींच्या
पलीकडे आहे आपले नाते...

मैत्रीणी,
कधीच आवडत नाही मला
तुझ्या इनबॉक्समध्ये यायला..
कधीच आवडत नाही मला
तुझी खोटी स्तुती करायला..
कारण तुला तुझी स्पेस आहे
मला माझी स्पेस आहे ...

मैत्रिणी,
तू किती सुंदर आहेस ?
तुझा आरसा सांगेलच तुला
उगाच अस्तिवात नसलेल्या गोष्टी
मी सांगणार नाही तुला..
कारण मी तुझा मित्र आहे भाट नाही

मैत्रिणी,
तू जेवलीस का? तू झोपलीस का?
मला यात स्वारस्य नाही..
माझ्या गुडमॉर्निंग ने तुझी मॉर्निंग
गुड होईल असे वाटतं नाही
कारण कुणाच कुणावाचून अडेल
अस कधी होतच नाही..

मैत्रीणी,
तुझ्या एडिट केलेल्या डीपीत
मला बिलकुल स्वारस्य नाही
त्यापेक्षा बुद्धिबळाचा डाव मांड
गोड गोड नको बोलूस
पण नक्की जोरात भांड
कारण, तुझ्या शरीराशी मला
देणे घेणे नाही..
गावाला ज्या जायचेच नाही
त्याचा पत्ता मी विचारीतच नाही..

मैत्रिणी..........

-प्रशांत शेलटकर,
  रत्नागिरी 8600583846

Saturday, 20 July 2019

ती

आवडतात खूप जणी
मात्र एक खास असते
भावतात खूप जणी
मात्र तीच श्वास असते...

बोलतात खूप जणी
एक मात्र अबोल असते
ओठांनी ती बोलत नाही
नजरेनेच ती बोलत असते...

गोड बोलतात सर्वजणी
ती मात्र भांडत बसते..
आधी मनसोक्त भांडते
आणि मग रडत बसते...

हाय हॅलो करतात सर्वजणी
ती फक्त टेक केअर म्हणते
गुडमॉर्निंग तर सगळीकडे
फक्त ती स्वीट डिअर म्हणते

चांदण्या असतात आभाळभर
चांदणी शुक्राची मनात भरते
कितीजणी असतात भोवती
पण एखादीच जीव लावते...

-प्रशांत शेलटकर
  8600583846
  रत्नागिरी

Sunday, 14 July 2019

पहिली रात्र

पहिली रात्र.....

मेहंदी होती अजून ओली
हळद नव्हती अजून सुकली
काळजात होती एक हुरहूर
आठवे ती रात्र मदीर मदीर

घुंगट ओढून बैसलीस मंचकी
दंडात रुतली घट्ट कंचुकी
ओठावर एक नाजूक थरथर
आठवे ती रात्र मदीर मदीर..

संकोचलीस तू मी जवळ येता
परी बळेच  मी मिठीत घेता..
एक गोड उठली शिरशिर
आठवे ती रात्र मदीर मदीर

तव मिठीत स्फुरल्या मजला
रती सुखाच्या कित्येक गजला
सुचले कित्येक अंतरे झरझर
आठवे ती रात्र मदीर मदीर

आवेग तुझ्या उष्ण श्वासांचा
अन स्पर्श तुझ्या मत्त ओठांचा
मी ओठांनी टिपला भरभर
आठवे ती रात्र मदीर मदीर..

वस्त्रे मग उगा व्यर्थच झाली
देहांची ओळख नव्याने पटली
वणवा पेटला मग भरभर
आठवे ती रात्र मदीर मदीर..

आवर्तने कित्येक सुखाची
उमले पहाट मग तृप्तीची
सुखावे मज तव तृप्त नजर
आठवे ती रात्र मदीर मदीर...

-प्रशांत शेलटकर
9420045653
रत्नागिरी

मौनास माझ्या...

मौनास माझ्या,
मी मूकपणे म्हणालो,
किती रे बोलशील?
अन बोलता बोलता
किती रे आत रडशील?

बरे झालेच ना तो ,
मुखवटा निघाला
सुखद सुंदर चेहरा
किती भेसूर झाला
चेहऱ्याला तुझ्याच रे
किती रे घाबरशील?
अन बोलता बोलता
किती रे आत रडशील?

कधी पाहिलेस का तू
स्वतःचे स्वतःला..
कधी ऐकले का तू..
तुझ्याच आवाजाला...
तुझाच तुला रे तू
किती  रे घाबरशील?
अन बोलता बोलता
किती रे आत रडशील?

खोटेपणास तुझ्या रे
दंभ अहंतेचा...
खोट्यास नेहमी रे
डंख यातनेचा...
वेदनेस वेड्या तू
किती रे घाबरशील?
अन बोलता बोलता
किती रे आत रडशील?

मौनास माझ्या,
मी मूकपणे म्हणालो,
किती रे बोलशील?
अन बोलता बोलता
किती रे आत रडशील?

-प्रशांत शेलटकर
  रत्नागिरी
9420045653

Thursday, 11 July 2019

विठ्ठला

विठ्ठला,
आज एकादशी
तुझ्या नावानं तुझे भक्त
आज उपवास करतील.. करोत बापडे..
मला नाही रे जमणार,
त्या पेक्षा आज मी
परनिंदेचा उपवास धरीन...

विठ्ठला,
आज एकादशी ,
लोक आज तुझ्या
देवळात जातील...
रांगा लावून दर्शन घेतील.
जावोत बापडे...
मला नाही रे जमणार..
मी माझ्यातल्याच तुझं
दर्शन घेईन, तसा तू
हल्ली दुर्मिळच झालायस

विठ्ठला,
आज एकादशी
भक्त तुझ्याकडे जातील
काही बाही मागतील
मागोत बापडे.
मला बाकी नकोच आहे.
विठ्ठला देशील मला हवे ते?

विठ्ठला दिलंस तर एकच दे
पुंडलिकाने फेकलेल्या
विटेवर
तू युगानुयुगे उभा राहिलास तसंच
नियतीने फेकलेल्या
परिस्थितीच्या विटेवर...
ठामपणे उभे राहायची
ताकद दे विठुराया...

एवढे तरी देशील ना,
हट्टाने  मागाव असा
तूच एक देव आहेस ना
आणि ज्याला माऊली
म्हणावं असाही तूच एक ना
मग आईकडे हट्ट ना करावा
तर कोणाकडे करावा विठ्ठला

विठ्ठल 🙏 विठ्ठल🙏 विठ्ठल

-प्रशांत शेलटकर
9420045653

Thursday, 4 July 2019

मुक्तचिंतन #1

मुक्तचिंतन #1

काही वेळा स्वतःच्याच लेखनाची पण  बौद्धिक धुंदी येते..ती अलगद अहंकारात परावर्तित होते.
स्वतःचीच छबी आरशात न्याहाळत बसावं तसं लेखक स्वतःच लेख वाचत बसतो..स्वतःचीच मतं योग्य वाटतात..आपण मांडतो तेच वास्तव बाकी सगळं झूठ वाटतं.

बऱ्याच वेळी आपण त्या आंधळ्याच्या गोष्टीतील आंधळ्या प्रमाणे वागतो ,आपल्याला पुर्ण हत्ती समजलेलाच नसतो .आपण फक्त हत्तीच्या कानाला स्पर्श करतो आणि हत्ती आपल्याला सुपाएवढा वाटत रहातो.

विशेषतः सामाजिक विषयावर लिहिताना.आपण समाजात किती मिसळतो?समाजाशी किती समत्व पावतो  यापेक्षा आपले चार दोन व्यक्तीगत अनुभव जमेस धरून जेव्हा आपण समाजा विषयी लेखन करतो तेव्हा ते वास्तवाला धरून असत नाही. केवळ पुस्तकं वाचून सामाजिक लेखन केलं तर ते हमखास फसतं.याला मराठीत एक छान शब्द आहे हस्तिदंती मनोऱ्यात बसून केलेले लेखन...सामाजिक विषयावर लेखन करताना स्टॅटिक असणे खूप महत्वाचे असते.ते जर नसेल तर क्रॉसचेकिंग ला तुम्ही क्लिन बोल्ड होता. कारण तुमचे लेखन सामाजिक न होता भावनिक होते.
       दुसरे म्हणजे हल्ली "स्वतंत्र" लेखन फार कमी दिसते.लेखक लोक कोणत्या तरी एका गटाला स्वतःला बांधून घेतात. भांडवलशाहीवादी-समाजवादी, डावे-उजवे, अभिजन-बहुजन,पाश्चात्य- पौर्वात्य, वेगवेगळे राजकीय गट, आणि हे बांधून घेणे काही वेळा जाणतेपणे बऱ्याच वेळी नकळतपणे होत असते.
         जगातले कोणतेही तत्वज्ञान परिपूर्ण नसते.ज्या काळात ते निर्माण होते त्या काळाशी ते सुसंगत असते.कालांतराने त्यात दोष निर्माण होतात.ते जर आपल्याला दिसत नसतील आणि त्याची मांडणी आपल्या लेखात प्रतिबिंबित होत नसेल तर आपण अंधश्रद्ध आहोत असा त्याचा अर्थ नाही का? अंधश्रद्धा फक्त धार्मिक क्षेत्रात नसते ती सर्वच क्षेत्रात असते.
        स्वतंत्र लेखन  विषयाच्या प्लस-मायनस दोन्ही बाजू मांडते. जर लेखकाने डोळ्यावरची आणि बुद्धीवरची झापडे काढून समाजाकडे आणि विषयाकडे स्वच्छ नजरेने पाहिलं तरच हे शक्य असतं

-प्रशांत शेलटकर
   9420045653

चष्मा..

चष्मा.... मित्रा तुझा चष्मा मला दे पाहीन ना जग मी तुझ्या नजरेतून..पण क्षणभरच पण तू ही हे जग बघ ना स्वच्छ नितळ नजरेने चष्म्याशिवाय...... हे च...