विठ्ठला,
आज एकादशी
तुझ्या नावानं तुझे भक्त
आज उपवास करतील.. करोत बापडे..
मला नाही रे जमणार,
त्या पेक्षा आज मी
परनिंदेचा उपवास धरीन...
विठ्ठला,
आज एकादशी ,
लोक आज तुझ्या
देवळात जातील...
रांगा लावून दर्शन घेतील.
जावोत बापडे...
मला नाही रे जमणार..
मी माझ्यातल्याच तुझं
दर्शन घेईन, तसा तू
हल्ली दुर्मिळच झालायस
विठ्ठला,
आज एकादशी
भक्त तुझ्याकडे जातील
काही बाही मागतील
मागोत बापडे.
मला बाकी नकोच आहे.
विठ्ठला देशील मला हवे ते?
विठ्ठला दिलंस तर एकच दे
पुंडलिकाने फेकलेल्या
विटेवर
तू युगानुयुगे उभा राहिलास तसंच
नियतीने फेकलेल्या
परिस्थितीच्या विटेवर...
ठामपणे उभे राहायची
ताकद दे विठुराया...
एवढे तरी देशील ना,
हट्टाने मागाव असा
तूच एक देव आहेस ना
आणि ज्याला माऊली
म्हणावं असाही तूच एक ना
मग आईकडे हट्ट ना करावा
तर कोणाकडे करावा विठ्ठला
विठ्ठल 🙏 विठ्ठल🙏 विठ्ठल
-प्रशांत शेलटकर
9420045653
No comments:
Post a Comment