मुक्तचिंतन #1
काही वेळा स्वतःच्याच लेखनाची पण बौद्धिक धुंदी येते..ती अलगद अहंकारात परावर्तित होते.
स्वतःचीच छबी आरशात न्याहाळत बसावं तसं लेखक स्वतःच लेख वाचत बसतो..स्वतःचीच मतं योग्य वाटतात..आपण मांडतो तेच वास्तव बाकी सगळं झूठ वाटतं.
बऱ्याच वेळी आपण त्या आंधळ्याच्या गोष्टीतील आंधळ्या प्रमाणे वागतो ,आपल्याला पुर्ण हत्ती समजलेलाच नसतो .आपण फक्त हत्तीच्या कानाला स्पर्श करतो आणि हत्ती आपल्याला सुपाएवढा वाटत रहातो.
विशेषतः सामाजिक विषयावर लिहिताना.आपण समाजात किती मिसळतो?समाजाशी किती समत्व पावतो यापेक्षा आपले चार दोन व्यक्तीगत अनुभव जमेस धरून जेव्हा आपण समाजा विषयी लेखन करतो तेव्हा ते वास्तवाला धरून असत नाही. केवळ पुस्तकं वाचून सामाजिक लेखन केलं तर ते हमखास फसतं.याला मराठीत एक छान शब्द आहे हस्तिदंती मनोऱ्यात बसून केलेले लेखन...सामाजिक विषयावर लेखन करताना स्टॅटिक असणे खूप महत्वाचे असते.ते जर नसेल तर क्रॉसचेकिंग ला तुम्ही क्लिन बोल्ड होता. कारण तुमचे लेखन सामाजिक न होता भावनिक होते.
दुसरे म्हणजे हल्ली "स्वतंत्र" लेखन फार कमी दिसते.लेखक लोक कोणत्या तरी एका गटाला स्वतःला बांधून घेतात. भांडवलशाहीवादी-समाजवादी, डावे-उजवे, अभिजन-बहुजन,पाश्चात्य- पौर्वात्य, वेगवेगळे राजकीय गट, आणि हे बांधून घेणे काही वेळा जाणतेपणे बऱ्याच वेळी नकळतपणे होत असते.
जगातले कोणतेही तत्वज्ञान परिपूर्ण नसते.ज्या काळात ते निर्माण होते त्या काळाशी ते सुसंगत असते.कालांतराने त्यात दोष निर्माण होतात.ते जर आपल्याला दिसत नसतील आणि त्याची मांडणी आपल्या लेखात प्रतिबिंबित होत नसेल तर आपण अंधश्रद्ध आहोत असा त्याचा अर्थ नाही का? अंधश्रद्धा फक्त धार्मिक क्षेत्रात नसते ती सर्वच क्षेत्रात असते.
स्वतंत्र लेखन विषयाच्या प्लस-मायनस दोन्ही बाजू मांडते. जर लेखकाने डोळ्यावरची आणि बुद्धीवरची झापडे काढून समाजाकडे आणि विषयाकडे स्वच्छ नजरेने पाहिलं तरच हे शक्य असतं
-प्रशांत शेलटकर
9420045653
No comments:
Post a Comment