Ad

Thursday, 29 March 2018

येड्या मित्रास

खरंच किती रम्य होत ते बालपण......
जेव्हा आपण फक्त
मित्र असायचो....
सुखात एकत्र हसायचो
दुःखात एकत्र रडायचो

कधी पडलो खेळताना
तर अश्रू तेच असायचे
बहुजनांचे खारट आणि
अभिजनाचे गोड ....
असे कधी नसायचे...

आता मात्र सार बदललं
जिवाभावाच्या मित्रामागे
जातीच लेबल लागलं...
कोण झाला सवर्ण,
अन कोण झाला दलित
विषारी नागांच्या फुत्काराचे
विषारीच फलित....

काल पर्यंत होतो आपण
मिळून सारे जण....
आता मात्र आहोत आपण
कोणी बहुजन कोणी अभिजन

कालपर्यंत आपले होते
रक्त लाल आणि लाल फक्त
आज  भगवे ,निळे ,हिरवे
आपण फक्त रंगांचेच भक्त

कसली भगवद्गीता अन
कसली रे मनुस्मृती...
त्रिपिटक कधी वाचलेच नाही
फक्त वाचली माणुसजाती

इतिहासाची उकरून मढी
त्यावर चालते दुकानदारी...
जय हो करीत आम्ही करू
फुकटचीच दुनियादारी...

कधी समजणार भावा तुला
खेळ आपल्याच नेत्यांचा
रंगपंचमी खेळून रक्ताची
येड्या चुना लावती तुला...

-प्रशांत शेलटकर

Monday, 26 March 2018

कोहम..

कोsहम

कधी तरी पडतात मला तेच आदिम प्रश्न...कोsहम कोsहम

खरंच  कोण आहे मी ?
स्त्रीबीजाशी लिप्त शुक्राणू
की विश्वातला एक क्षुद्र अणू
खरचं मला काही कळत नाही
आइन्स्टाइन समजत नाही की
हॉकिंग्स मला उमगत नाही...
मला खरच कळत नाही
खरंच  कोण आहे मी ?
कोsहम कोsहम.....

मला  कळत नाही..
अध्यात्म शब्दांनी सजलेलं
मला  कळत नाही....
विज्ञान व्याख्यानी भरलेलं
मला खरच कळत नाही
खरंच  कोण आहे मी ?
कोsहम कोsहम.....

खरंच मला  कळत नाही
जाणिवेतला जीव आणि
नेणिवेतला शिव ही..
माझ्यातला अश्वत्थामा मात्र
भटकत रहातो फक्त
स्वतःचाच शोध घेत कारण
मला खरच कळत नाही
खरंच  कोण आहे मी ?
कोsहम कोsहम.....

कधी कधी भांग चढावी तसा
चार्वाक भिनत जातो ...
अन अप्सरांचे मोहक विळखे
बधिर करतात विवेकाला...
ऋणं कृत्वा घृतं पिबेत...
हाच मंत्र बनून जातो..
अन जगण्याचे तंत्रही कारण...
मला खरच कळत नाही
खरंच  कोण आहे मी ?
कोsहम कोsहम.....

मग एका सम्यक क्षणी
मी उतरवून ठेवतो
अहंकाराची भरजरी वस्त्रे
अन आयुष्याच्या रणांगणात
हतवीर्य  झालेला माझ्यातलाच
अर्जुन विचारतो....
माझ्यातल्याच योगेश्वराला
मला खरच कळत नाही
खरंच  कोण आहे मी ?
कोsहम कोsहम.....
तेव्हा एका प्रशांत क्षणी..
मिळून जाते एक शाश्वत उत्तर
सोsहम सोsहम ....
तो तूच आहेस ..........
तो तूच आहेस.........

-प्रशांत शेलटकर

Sunday, 25 March 2018

तंत्र

तंत्र ..

अवघड होईल जगणं
इतकं कधी जगू नये
मनसोक्त जगल्याशिवाय
अवेळी कधी मरू नये...

तुटून जाईल इतपत
नातं कधी ताणू नये
जर तोडायचच असेल तर
नातं कधी जोडू नये...

हसायचंच नसेल तर
केविलवाणे हसू नये..
रडायचच असेल तर
उगाच अश्रू लपवू नये

मनात जागा जिच्या तुम्हाला
तिला कधी  विसरू नये
उगाचच  सतराजणींना
भाव देत फिरू नये...

जो वेळ देतो तुम्हाला
त्याला कधी टाळू नये...
जो कायम टाळतो तुम्हाला
जवळ त्याच्या जाऊ नये...

कणभर आयुष्य आपले
मणभर कधी समजू नये
प्रत्येक क्षण जगण्याचे,
तंत्र कधीच सोडू नये....

-प्रशांत शेलटकर

Saturday, 24 March 2018

निरोप

निरोप...

निरोपाचा क्षण बाबा
माझ्या डोळ्यात दाटला
लेक चालली सासरला
बाबा निरोप द्या मला...

बाबा तुझ्या गळ्यात रे
हुंदका आठवणींचा दाटला
लेक चालली सासरला
बाबा निरोप द्या मला...

एकुलती लेक तुझी
फुलापरी जपलेली..
तुझ्या डोळ्यात रे बाबा
आभाळामाया दाटलेली
तुझ्यासाठी बाबा माझा
जीव तुटला तुटला...
लेक चालली सासरला
बाबा निरोप द्या मला...

हाती घेऊनिया पाटी
तूच  अआई शिकविले..
आई बोलण्या आधीच
मी बाबा म्हटलेले...
आठवतो बाबा मला
तू पाढा शिकवलेला..
लेक चालली सासरला
बाबा निरोप द्या मला...

बाबा आईला हो जपा
जपा तुम्हालाही जपा
माझ्या मनात जपेन मी
परसातला सोनचाफा...
बाबा, दरवळ त्याचा
माझ्या मनी दाटलेला...
लेक चालली सासरला
बाबा निरोप द्या मला...

बाबा तुझ्या लेकीसाठी
तूझा घास रोज अडेल
बाबा तुझ्यासाठी माझ्या
पाणी  डोळ्यात दाटेल
तरी बाबा आता निरोप दे मला
लेक चालली सासरला
बाबा निरोप द्या मला...

-प्रशांत शेलटकर

Thursday, 22 March 2018

कविता

कविता...

मौनाची तटबंदी तोडून
"शब्द"म्हणाला "प्रतिभेला"...
माझं तुझ्यावर प्रेम आहे,
तुझं माझ्यावर आहे का?

तुझ्याविना मी व्यर्थ आहे
तुझ्याविना काय अर्थ आहे
तुझ्या विना "प्रतिभे"..
मी केवळ कलेवर आहे

काना, मात्रा अन वेलांटी
तन हे माझे तुझ्याचसाठी
अक्षरे सजवली  मनात मी
"प्रतिभे" ग तुझ्याचसाठी

शब्दास मग बोले प्रतिभा
सांग रे माझ्या शब्दराजा
अबोल जरी मी साजणा
व्यक्त होईन का तुझ्याविना

शब्द- प्रतिभेचे मिलन झाले
द्वैताचे मग अद्वैत झाले...
शब्द-प्रतिभेच्या पोटी मग...
काव्यबालक जन्मास आले..

-प्रशांत शेलटकर

Wednesday, 21 March 2018

पाकीट

पाकीट...

दर महिन्याच्या एक तारखेला
माझं पाकीट छान हसत असत
दोन चार "गांधींच्या " उबेत...
मग छाती फुगवून बसतं...

दोन दिवस असेच जातात..
बायको होतें "गांधी"वादी
पाकिटातले "गांधी" लागतात
मग फक्त  तिच्याच नादी...

पाकिटात मग उरतात...
काही नेते "शंभरी"...
"पाच-पन्नास" कार्यकर्तेही
असतात त्यांचे पदरी...

मग ते ही जातात सोडून
करतात मग पक्षांतर...
नेत्याबरोबर कार्यकर्तेही
बंड करतात पेट्रोलपंपावर

असेच सारे सोडून जाती
चिल्लर फक्त उरते....
उदासवाणे पाकीट माझे
एकटेच खिशात रडते...

मग चिल्लर हळूच सांगते
बाबा तुम्ही रडू नका....
आम्ही आहोत ना हो
तुम्ही एकटे समजू नका...

-प्रशांत शेलटकर

Thursday, 15 March 2018

माणसांच्या जंगलात

एका खुळ्या क्षणी...
मी मनाशी ठरवलं
फिरावं माणसाच्या जंगलात
आणि पाहता आलं तर पाहावं
डोकावून माणसाच्या मनात

जीव तोडून एसटीत घुसावं
तर सगळ्याच सीट भरलेल्या
कुणाच्या बाजूला सुंदऱ्या तर
कुणाच्या बाजूला म्हाताऱ्या

थकून बसावं पार्कात तर
सगळीकडे हिरवळ दाटलेली
फेविकॉलच्या जोडासारखी
कपल घट्ट चिकटलेली...

तिचे डोके त्याच्या खांद्यावर
त्याचे हात तिच्या मांडीवर
चूळबुळ मात्र उगाच चालली
ज्येष्ठांच्या मग कट्ट्यावर

मस्त प्यावा चहा म्हणून
थांबलो एका टपरीवर...
राजकारणच उकळत होत
टपरीवाल्याच्या स्टोव्हवर

रस्त्यातूनच चाललो मग
वाचीत लोकांचे चेहरे...
लांबट ..उभट..चौकोनी
कुणाचे  रडवे अन हसरे...

निरखून मग पाहिलं जरा
चेहरे ते तर गायब होते..
मुखवट्याच्या आतमध्ये
किती छान लपले होते...

म्हटलं आता जावं देवळात
बरा आहेस का रे बाबा म्हणून
देवाचीच घ्यावी खबरबात

जांभई देत देव म्हणाला
बोअर झालोय यार....
मागण्या पुरवता पुरवता
पुरता झालोय बेजार...

मी म्हणालो देवा ...
असं कसं म्हणतोस
मुकुट आणि पितांबरात
किती छान दिसतोस

देव म्हणाला वेड्या
अरे दिसत तसं नसत
चार पेढे लाच देऊन
लोकांना काय काय हवं असत

कोणाला नोकरी हवी असते
तर कोणाला धंद्याची हमी...
कितीही भरून दिलं तरी
झोळी यांची कायम रिकामी

मी म्हणालो देवा असा
करू नको रे त्रागा....
तू आहेस म्हणून आहे रे
माणसातला माणूस जागा..

माणूसच आहे तो
कधीतरी चुकणारच
किती बढाई मारली तरी
तुझ्याकडे तो येणारच

देव म्हणाला पटलं मला
मी जातो गाभाऱ्यात...
तू ही परत जा ...
माणसाच्या जंगलात...

देवाचा निरोप घेऊन
मी परत निघालो....
माणसाच्या जंगलात
पुन्हा एकदा हरवलो...

-प्रशांत शेलटकर

Thursday, 8 March 2018

मिसळपाव

मिसळपाव

बशीतल्या पावाला...
मिसळ म्हणाली लाजून
असा दूर का उभा तू
मी तुझ्यासाठी  बसले सजून

पाव म्हणाला दुःखी होऊन
तू तर तिखटजाळ...
सांग कशी जुळायची
तुझी आणि माझी नाळ

मी असा पांढरा फटक
तू किती छान सजली
गालावरती ग तुझ्या
टोम्याटोची लाली आली

कोथिंबीरीचा हिरवा शालू
नवरी छान लाजली...
दंडात रुतली ग तुझ्या
लाल कांद्याची लाल चोळी...

मिसळ म्हणे पावराजा
असं काही नसतं
एकदा प्रेम झालं की,
ते कोणावरही बसतं...

तू किती साधा अन
तू किती सिम्पल...
तूच माझा ऋषी अन
मी तुझी डिंपल.....

पाव म्हणाला मिसळीला
आता एकच आपला गाव
तुला मला एकच नाव
मिसळपाव फक्त मिसळपाव

-प्रशांत शेलटकर

Saturday, 3 March 2018

काकराज

एक कावळा काळा काळा
कोकिळेस प्रेमाने म्हणाला
तुझ्या गळा माझ्या गळा
गुंफू मोत्याच्या माळा

कोकिळा म्हणे कावळ्याला
गळ्यात माझ्या गंधार पेरला
तुझ्या कर्कश्श किरकिरण्याला
कोण विचारतो  मेल्या तुला

मी तर वसंताची राणी
गाते आम्र वनी गाणी
तुझी कर्कश्श पिपाणी
कोण सांग ऐकतो...

कावळा म्हणे ऐक कोकिळे
वसंतातच तुझे सोहळे...
स्मशानातले मरण सोहळे
माझ्याविना अपूर्ण....

मी न शिवता पिंडाशी..
होत असे कासाविसी
जोवरी न शिवी पिंडाशी
माणसे त्रासून जाती...

कावळा नव्हे मी काकराज
सांगतो कोण येईल आज
सकाळची माझी काव काव
सुखावते सासुरवाशीणीस

कोकिळे तू आळशी
अंडी माझ्या घरटी देसी
का फुकाच्या गमजा करशी
जा उडून जा झडकरी...

-प्रशांत शेलटकर©

Friday, 2 March 2018

राधा

तू रोज दिसावीस
अस काही नाही...
आणि दिसलीस तरी,
हसावीस असंही नाही...

व्यक्त जे व्हायचं...
ते कधीच व्यक्त झालय
आता माझ्या काळजात
एक छान फुल उमललय

तू बोलली नाहीस तरी
नजर तुझी बोलते....
तनामनात मग माझ्या
एक राधा व्यापून उरते...

निःशब्द मी,अबोल तू
शब्दांची गरज कुणाला
शब्द बापूडे  केवळ वारा
प्रेम लाभे प्रेमळाला...

-प्रशांत शेलटकर©

चष्मा..

चष्मा.... मित्रा तुझा चष्मा मला दे पाहीन ना जग मी तुझ्या नजरेतून..पण क्षणभरच पण तू ही हे जग बघ ना स्वच्छ नितळ नजरेने चष्म्याशिवाय...... हे च...