निरोप...
निरोपाचा क्षण बाबा
माझ्या डोळ्यात दाटला
लेक चालली सासरला
बाबा निरोप द्या मला...
बाबा तुझ्या गळ्यात रे
हुंदका आठवणींचा दाटला
लेक चालली सासरला
बाबा निरोप द्या मला...
एकुलती लेक तुझी
फुलापरी जपलेली..
तुझ्या डोळ्यात रे बाबा
आभाळामाया दाटलेली
तुझ्यासाठी बाबा माझा
जीव तुटला तुटला...
लेक चालली सासरला
बाबा निरोप द्या मला...
हाती घेऊनिया पाटी
तूच अआई शिकविले..
आई बोलण्या आधीच
मी बाबा म्हटलेले...
आठवतो बाबा मला
तू पाढा शिकवलेला..
लेक चालली सासरला
बाबा निरोप द्या मला...
बाबा आईला हो जपा
जपा तुम्हालाही जपा
माझ्या मनात जपेन मी
परसातला सोनचाफा...
बाबा, दरवळ त्याचा
माझ्या मनी दाटलेला...
लेक चालली सासरला
बाबा निरोप द्या मला...
बाबा तुझ्या लेकीसाठी
तूझा घास रोज अडेल
बाबा तुझ्यासाठी माझ्या
पाणी डोळ्यात दाटेल
तरी बाबा आता निरोप दे मला
लेक चालली सासरला
बाबा निरोप द्या मला...
-प्रशांत शेलटकर
No comments:
Post a Comment