Ad

Monday, 26 March 2018

कोहम..

कोsहम

कधी तरी पडतात मला तेच आदिम प्रश्न...कोsहम कोsहम

खरंच  कोण आहे मी ?
स्त्रीबीजाशी लिप्त शुक्राणू
की विश्वातला एक क्षुद्र अणू
खरचं मला काही कळत नाही
आइन्स्टाइन समजत नाही की
हॉकिंग्स मला उमगत नाही...
मला खरच कळत नाही
खरंच  कोण आहे मी ?
कोsहम कोsहम.....

मला  कळत नाही..
अध्यात्म शब्दांनी सजलेलं
मला  कळत नाही....
विज्ञान व्याख्यानी भरलेलं
मला खरच कळत नाही
खरंच  कोण आहे मी ?
कोsहम कोsहम.....

खरंच मला  कळत नाही
जाणिवेतला जीव आणि
नेणिवेतला शिव ही..
माझ्यातला अश्वत्थामा मात्र
भटकत रहातो फक्त
स्वतःचाच शोध घेत कारण
मला खरच कळत नाही
खरंच  कोण आहे मी ?
कोsहम कोsहम.....

कधी कधी भांग चढावी तसा
चार्वाक भिनत जातो ...
अन अप्सरांचे मोहक विळखे
बधिर करतात विवेकाला...
ऋणं कृत्वा घृतं पिबेत...
हाच मंत्र बनून जातो..
अन जगण्याचे तंत्रही कारण...
मला खरच कळत नाही
खरंच  कोण आहे मी ?
कोsहम कोsहम.....

मग एका सम्यक क्षणी
मी उतरवून ठेवतो
अहंकाराची भरजरी वस्त्रे
अन आयुष्याच्या रणांगणात
हतवीर्य  झालेला माझ्यातलाच
अर्जुन विचारतो....
माझ्यातल्याच योगेश्वराला
मला खरच कळत नाही
खरंच  कोण आहे मी ?
कोsहम कोsहम.....
तेव्हा एका प्रशांत क्षणी..
मिळून जाते एक शाश्वत उत्तर
सोsहम सोsहम ....
तो तूच आहेस ..........
तो तूच आहेस.........

-प्रशांत शेलटकर

No comments:

Post a Comment

चष्मा..

चष्मा.... मित्रा तुझा चष्मा मला दे पाहीन ना जग मी तुझ्या नजरेतून..पण क्षणभरच पण तू ही हे जग बघ ना स्वच्छ नितळ नजरेने चष्म्याशिवाय...... हे च...