एक कावळा काळा काळा
कोकिळेस प्रेमाने म्हणाला
तुझ्या गळा माझ्या गळा
गुंफू मोत्याच्या माळा
कोकिळा म्हणे कावळ्याला
गळ्यात माझ्या गंधार पेरला
तुझ्या कर्कश्श किरकिरण्याला
कोण विचारतो मेल्या तुला
मी तर वसंताची राणी
गाते आम्र वनी गाणी
तुझी कर्कश्श पिपाणी
कोण सांग ऐकतो...
कावळा म्हणे ऐक कोकिळे
वसंतातच तुझे सोहळे...
स्मशानातले मरण सोहळे
माझ्याविना अपूर्ण....
मी न शिवता पिंडाशी..
होत असे कासाविसी
जोवरी न शिवी पिंडाशी
माणसे त्रासून जाती...
कावळा नव्हे मी काकराज
सांगतो कोण येईल आज
सकाळची माझी काव काव
सुखावते सासुरवाशीणीस
कोकिळे तू आळशी
अंडी माझ्या घरटी देसी
का फुकाच्या गमजा करशी
जा उडून जा झडकरी...
-प्रशांत शेलटकर©
No comments:
Post a Comment