घर...
माणसंच काय हो ,
हल्ली घरं पण बदलली
दार खिडक्या बंद करून
आतल्या गाठीची झाली..
पंख पसरलेली
दुपाकी घर आताशा
अंमळ थोडी थकली
पिल्ल तरी आताशा कुठे
पंखाखाली राहिली
आठवांची कौले आता
येऊ लागली खाली
माणसंच काय हो ,
हल्ली घरं सुद्धा बदलली
जशी ज्याची ऐपत
तसे त्याचे ठोकळे
इएमआयच्या घुसमटीत
श्वास नाही मोकळे..
स्वप्नातले घर वगैरे
नावे देऊन झाली
माणसंच काय हो ,
हल्ली घरं सुद्धा बदलली
दोन फ्लॅट शेजारी तरी
ओळख काही पटेना
इकडून तिकडे आता
काही बाही जाईना
भिंत लागून भिंतीला तरी
अळी मिळी नि गुपचीळी
माणसंच काय हो ,
हल्ली घरं सुद्धा बदलली
गॅलरीतले एक झाड
एकटे एकटे असते..
निसर्ग प्रेमी मालक माझा
खोट खोट सांगते..
परस गेल अंगण गेल
तुळशीपुढची पणती विझली
माणसंच काय हो ,
हल्ली घरं सुद्धा बदलली
घर म्हणजे चार भिंतीच आता
भिंतीचेही कान गेले..
असतात आपल्याला शेजारी
याचेच मुळात भान गेले..
बारसे असो वा बारावे
घरंच आता मुकी झाली
माणसंच काय हो ,
हल्ली घरं सुद्धा बदलली
झरझर जातो काळ
थोडी होणार पडझड
ट्रॅक चेंज झाल्यावर
थोडी होणार खडखड
बदलली जशी माणसे
घरे देखील बदलली
फार काही नाही हो
संस्कृतीने फक्त कुस बदलली
@ प्रशांत
No comments:
Post a Comment