लग्नाला जातो मी....
....काल एका लग्नाला गेलो होतो लग्नाच्या हॉल मध्ये यजमान सोडून सर्व जण खुश असतात.. आणि जेवण असेल तर काय विचारू नका ..सगळा आहेर वसूल केल्याशिवाय भोजन गृह सोडायचे नाही असा निश्चय केलेली अनेक माणसं लग्नाच्या हॉल मध्ये दिसतात..मज्जा येते..बुफे असला की खरं तर आपल्याला हवे ते घेण्याची मुभा असते..पण आपल्याकडे एक गंमत असते..मांडलेली सर्व व्यंजने आपल्या डिश मध्ये असलीच पाहिजे हा हट्ट घेऊन काही मंडळी आपली डिश तुडुंब भरून घेतात आणि मग खुर्च्या शोधत बसतात..
...डिश घेऊन रांगेत उभे राहणाऱ्या माणसांच्या चेहऱ्यावर मला नेहमी मेळघाटी कारुण्य दिसते.. युगा युगाचा उपवास दिसतो..मेजावर मांडलेली मसालभात,वडे,चटण्या,बासुंदी श्रीखंड,पापड लोणची ही आपण पहिल्यांदाच पाहतोय अशी उत्सुकता मंडळीच्या चेहऱ्यावर दिसत असते..
.....जेवण संपेल की काय अशी विनाकारण शंका.. प्रतिक्षा रांगेत असणाऱ्या जवळपास प्रत्येकाच्या चेहऱ्यावर का बर असते हे मला न कळलेले कोडे आहे..",जेवण संपले आता तुम्ही या "...असे सांगणारा यजमान मी आज पर्यंत पाहिलेला नाही , आणि चिंतामुक्त चेहऱ्याचा सुद्धा यजमान मी अद्याप पाहिलेला नाही..सगळ्या यजमानांच्या चेहऱ्यावर बारा वाजलेले असतात..जुळवून आणलेले व्यवस्थापन ऐनवेळी ढासळताना बघणे हे प्रत्येक यजमानाचे जणू प्राक्तन असते..मग ते यजमानपद लग्नाचे असो वा गेट टु गेदरचे..
.... माझा गनिमीकावा आणि भोजन गडावर आक्रमण ..
दरवेळी माझ्या भोजन मोहिमा फसत आल्या आहेत,पहिल्या पंक्तीचे सुख माझ्या नशिबात नसते म्हणून मी यावेळी निश्चय केला होता जेवीन तर पहिल्या पंक्तीत नाहीतर उपाशी राहीन...
यावेळी शेवटच शुभमंगल सावधान व्हायच्या आधीच सावध झालो..भोजन गृहाच्या जिन्याजवळ अगोदरच मोर्चे बांधणी केली..माझ्यासारखे दोन चार चतुर लोक अगदी सहजच उभे असल्याचे दाखवित जिन्यापाशी उभे असल्याचे माझ्या चाणाक्ष नजरेने म्हणजे चष्मा काढलेल्या नजरेने हेरले होते..मी पण माझ्या नजरेत सहजता आणून दरवाजा कधी उघडतो याची वाट पाहत होतो..
अखेर तो क्षण आला..भोजनगडाचा (भोजनगृह वरच्या मजल्यावर आहे) किल्लेदार खाली आला त्याने महाद्वार उघडले, वाऱ्याच्या वेगाने मी आणि मघाशी उल्लेख केलेले चतुर लोक जिन्यातून वर गेलो..अर्थात जाताना आपल्याला फार घाई नाही असे दाखवण्याचा अभिनय प्रत्येकजण करतोच..
वर आलो तर क्षणभर कळेना ..बुफे कुठे लावला आहे..पण काही अनुभवी मंडळींनी बरोबर लक्ष्यभेद केला.डिश घेऊन मंडळी कार्य सिद्धीस लागली सुद्धा..पुढची पाच मिनिटे..हातातली डिश आणि तोंडातली लाळ सावरण्यात गेली..आणि मग वेगवेगळ्या पदार्थांना डिश मध्ये जागा देत ..बसायची जागा शोधत अखेर स्थानापन्न झालो..
पहिला घास तोंडांत टाकणार तेव्हा आठवल ..अरेच्चा बायको खाली हॉल मध्येच राहिली ..इकडे तिकडे पाहिल..बायको कुठे दिसेना..अर्थात लग्नाच्या हॉल मध्ये कोणत्याही पुरुषाला स्वतःची सोडून इतरांच्याच बायका दिसतात.. नाईलाज आहे..man allways man..
अखेर अनेक गजऱ्यांच्या डोक्यात एक बिन गजऱ्याचं डोक दिसलं..बहुतेक माझीच बायको असावी...असावी काय ती होतीच ती माझी बायको..
आणि आमच वदनी कवळ घेता चालू झालं.. अहेरात घातलेले पैसे आणि भोजन याचा ताळमेळ घालून भोजन एंजॉय केले..खाली उतरलो..चेहऱ्यावर मेळघाटी कारुण्य ठेवून कुपोषितांचा घोळका जिन्याच्या दरवाजावर धडका मारत होता..आणि मी मस्त बडीशेप चघळत जिना उतरता झालो
.... यशस्वी पंगतवीर प्रशांत
No comments:
Post a Comment