Ad

Wednesday, 8 October 2025

रत्नांग्री...

रत्नांग्री....

कसे होते? कुठे होते 
विसरलोच आता रस्ते 
निलाजऱ्या प्रशासनाचे 
निर्लज्ज वायदे नुसते..

काय सांगू? किती सांगू 
घशाला बसली कोरड 
वीट आला ऐकून ऐकून
रोज तीच तीच ओरड..

कोण होती? कशी होती?
रत्नांग्री माझी देखणी
एकजात सर्वच आहेत
राजकारणी कुलक्षणी

तीच धूळ तेच खड्डे
वर्षानुवर्षे केवळ तेच तेच
एवढे कसे सहनशील आम्ही
आम्हालाच पडला पेच पेच

जनतेचा आक्रोश यांच्या
कानी काही  पडेना
रस्त्या वाचून यांचे काही
मुदलातच बघा अडेना

मस्त गाडी, मस्त एसी
मस्त सगळे सस्पेशन
कसे कळावे बाबा यांना
बाईकवाल्यांचे टेन्शन..

बाद झाली मान कंबर
मोडून गेला कणा
मंत्री संत्री कोणीतरी
रत्नांग्रीला आपली म्हणा

जीव घेऊन मुठीत बिचारा
प्रवास करतोय कसातरी
कधी कुठे भेटेल यमराज
याची नाही खातरी

आज करतो उद्या करतो
नुसतीच सगळी हवा
सगळे मार्ग संपले आता
आता फक्त भैरी बुवा

बारा वाड्याच्या भैरीबुवा
बघ रे आमची दैना..
तुझ्या हवाली तुझी रत्नांग्री 
चमत्कार काही दाखवना..

सुतासाखे कर सरळ
स्मरण दे रे जनसेवेचे
जनता जनार्दन सर्व काही
भान दे रे संविधानाचे..

फार काही मागत नाही
फक्त मागतो रस्ते चांगले
सांग रे भैरव नाथा
आमचे काही चुकले?

-प्रशांत...

Saturday, 13 September 2025

पोकळ बांबू....

पोकळ बांबू....

अरे कवी तुला रे
कसला व्यर्थ माज आहे 
शब्द कोरडे पोकळ 
ना कसला साज आहे..

पकडून कान मित्रांचे 
ऐकवतोस तू कविता 
अरे त्याना नसू दे रे
पण तुला कुठे लाज आहे
अरे कवी तुला रे
कसला व्यर्थ माज आहे 
शब्द कोरडे पोकळ 
ना कसला साज आहे..

चार दोन जमवून उपमा 
उभे केलेस काव्य झोपडे 
तरी तुझ्या नजरेत वेड्या
तुझा तो ताज आहे
अरे कवी तुला रे
कसला व्यर्थ माज आहे 
शब्द कोरडे पोकळ 
ना कसला साज आहे..

मोरीतला नळ तुझा
शब्द शब्द ठिबकतो
आणि म्हणतोस वेड्या
ती सागराची गाज आहे
अरे कवी तुला रे
 कसला व्यर्थ माज आहे 
शब्द कोरडे पोकळ 
ना कसला साज आहे..

कर सुरनळी कवितेची 
दाखव तिला योग्य जागा 
आता थांब ना भावड्या 
किंचित जर तुला लाज आहे 
अरे कवी तुला रे
 कसला व्यर्थ माज आहे 
शब्द कोरडे पोकळ आणि
ना कसला साज आहे..

 प्रत्येक पोकळ बांबू
नसतो कान्हाची बासरी
तरी तुला बासरीची
का सांग खाज आहे?
अरे कवी तुला रे
 कसला व्यर्थ माज आहे 
शब्द कोरडे पोकळ आणि
ना कसला साज आहे..

-प्रशांत. 😃

अमानुष..

अमानुष...

.... आषाढातल्या त्या कुंद पावसाळी संध्याकाळी मी हर्डीकरांच्या गिरणीत दळण कधी मिळतंय याची वाट पहात होतो.. पाऊस मी म्हणत होता.. त्या दिवशीची सांज जरा लवकरच पसरली होती... मघाशी पुलावरून येताना गौतमीचे रौद्र रूप भयचकीत करून गेलं होतं.. तांबळवाडी ते पार तेलीवाडी, काटे वाडी पर्यंत सगळीकडे लाल समुद्र.. तशातच मी दळण घेऊन आलो होतो..
  .... अंधारून आल्या मुळे गिरणीतला 100 चा पिवळा बल्ब सुरेशकाकांनी जरा लवकरच लावला होता.. त्याचा फिकट पिवळा प्रकाश आजूबाजूचा अंधार जरा जास्तच गडद करत होता.. सगळीकडे पिठाचे साम्राज्य.. छतावर कोळयांच्या जाळ्या.. त्यावर पिठाची नक्षी.. पिवळ्या बल्बच्या प्रकाशात भेलकांडत.. कोळ्याच्या जाळ्यात अडकलेला एखादा दुर्दैवी कीटक.. आणि त्याला लीलया गुंडाळून पोटाची सोय करणारा पांढुरका कोळी.. भिंती, छप्पर, गिरणीचे पट्टे, खालची लादी पिठाने माखलेली.. आणि दळणाची पिशवी चक्कीच्या होद्यात रिकामी करून खालच्या पिठाच्या डब्याकडे तंद्री लावून बसलेले सुरेश काका.. ते सुद्धा पिठाने माखलेले...
    ... गिरणीच्या पट्ट्याचा फटक फटक असा निरंतर आवाज आणि त्या आवाजाची तंद्री लागून एकटक शून्यात नजर लावत दळणाची वाट बघत बाजूला बसलेली म्हातारी गुरवीण..
    पुढे घडणाऱ्या भयनाट्याचे हे जणू भयंकारी नेपथ्य.. आम्ही तिघे जणू नजरबंदी झाल्या सारखे फटक फटक करीत फिरणाऱ्या पट्ट्याकडे पाहत होतो.. मध्येच वाऱ्याचा थंड झोत आत यायचा.. पिवळा बल्ब अस्ताव्यस्त हलायचा.. तंद्री लावलेल्या सुरेश काकांची सावली भिंतीवरून हिंदकळायची... भीतीने सरसरून काटा यायचा...
  .... ह्यास काय झालाय.. नुसतो  ठोंब... म्हातारी गुरवीण काळोखात पावसाचा अदमास घेत करवादली.. परत पट्ट्याचा फटक फटक आवाज तंद्री लावत राहिला..
    सुरेश काकांनी चक्की खालचा रिकामा डबा थोडा वाजवीत रिकामा करत माझ्या पिशवीत  माझं दळण भरून देत फळीवर ठेवलं.. एक रुपया आणि वीस पैशाच नाणं सुरेश काकांच्या हातात दिलं त्यानी ते त्यान्च्या खिशात टाकलं.. दिवसभराचा गल्ला त्यान्च्या् खिशात तट्ट फुगला होता..
     बाहेर आलो तर पाऊस थाम्बला होता.. पण आसमंत चिंब झालेला... दळण सायकलच्या मागे लावल आणि निघालो.. गिरणीचा मातीचा उतार मागे टाकून सायकल डावीकडे घेतली आणि परत उजवा टर्न घेऊन पुलाकडं निघालो.. रस्त्यावर कोणीच नव्हतं.. तिन्हीसांज दिवसाला थोपटून निजवत होती.. आजूबाजूला बेडकांची भयकारी डरावनी डराव डराव चालू होती... थोड्याच वेळात भयकारी नाटकाचा पडदा उघडणार होता.. गौतमीवरचा पूल हा त्याचा रंगमंच आणि भयसूचक जाणीवांचे नेपथ्य आणि मी एकटा...

... पुलाच्या चढणीला सायकल लागली तशी धाप लागायला लागली  तशी नेहमीच लागायची पण या वेळी वेगळीच... पुलावर आलो आणि सायकलची चेन पडली.. खाली उतरलो.. अंधारात दिसत नव्हते.. म्हणून सायकल कडेला घेतली.. पुलाच्या कठड्याला टेकून बसलो.. आणि अंधारात चेन लावण्याचा निष्फळ प्रयत्न करत राहिलो.. मी बसलो होतो त्याच्या बरोबर खाली कोंड होती.. खाली नजर टाकली.. पाणी रोरावत पुढे जातं होतं.. चिडलेला जातिवंत नाग जसे फुत्कार टाकतो ना तसा पाण्याचा लोंढा फुत्कार टाकत होता.. त्याचा आवाज वर पुला पर्यन्त येत होता.. हळूहळू भीतीची अदृश्य कट्यार काळीज चिरत गेली....हा फक्त पाण्याचा आवाज नव्हता.. दुसरच काही... वेगळं.. अमानवी.. कदाचित मानवीच.. त्या निर्मनुष्य अंधाऱ्या जागी तो सूक्ष्म मानवी आवाज जीवाचा   थरकाप करत होता.. आता आवाज स्पष्ट येत होता.. आवाज कसला ते भेसूर रडणे होते लहान मुलाचे.. अगदी प्राणान्तिक रडणे... इतकं प्राणान्तिक की डोळ्यातून पाण्याऐवजी रक्त यावं इतकं प्राणान्तिक..
     मी तसाच थिजून तिथेच बसून... एक अमानवी शक्ती माझ्या नजरेला त्या बेताल प्रवाहाकडे खेचली जातेय.. रोरावत जाणाऱ्या त्या पाण्यात मला दोन हात दिसत आहेत.. छोटे.. लहान मुलाचे हात.. कसला तरी आघात झेलताना असाह्य झालेले कोवळे हात.. आता फक्त हात नाहीत एक    वेदनेने  कळवळलेला लहान निष्पाप चेहरा.. कपाळावर मळवाट भरलेला भेसूर चेहरा.. सावळा चेहरा, कुरळे केस.. गोबरे गाल.. जणू चेहरा सांगतोय कित्येक वर्षापूर्वीची नरबळीची कहाणी.. जिवंतपणी पुरलेल्या निरागस मुलाची कहाणी..
     त्या मुलाला वाचवलं पाहिजे.. बस्स.. त्याचे हात हातात घेऊन त्याला वर आणल पाहिजे.. बस्स   काय वाट्टेल ते झालं तरी मी त्या मुलाला वाचवणार..
     अमानवी शक्तीचा वेढा माझ्या भोंवती पडत चालला.. जिवंतपणी गाडला गेलेल्या त्या मुलाचा आत्मा मला तिकडे बोलवू लागला... गेलं पाहिजे मला गेलं पाहिजे..तो बोलावतोय.. साद घालतोय.. प्रतिसाद दिला पाहिजे...गेलंच पाहिजे मला.... पण अचानक...
   ... पुलापलीकडे अनंतनिवासात स्वामींची आरती चालू झाली... आरती रामचंद्रा.. स्वामी स्वरूपानंदा.. सोहंम हंसारूढ  तुम्ही..
     आरतीच्या सुमंगल, पवित्र लहरी गौतमीच्या पात्रावर फेर धरू लागल्या.. स्वामींची करुणामय मूर्ती मिटल्या डोळ्यासमोर प्रकट झाली.. ओम राम कृष्ण हरी..सगळा अघोर विरून गेला... ते हात, तो सावळा चेहरा... ते कुरळे केस अदृश्य झाले.. पाऊस थांबला... काळ्या ढगातून चंद्राने खाली वाकून पाहिलं आणि मी सायकलची चेन लावायच्या हेतूने खाली वाकलो...
... चेन पडलीच नव्हती....

समाप्त (काल्पनिक))

प्रशांत

Tuesday, 9 September 2025

अलगोरिदम ची मोहिनी..

अलगोरिदम ची मोहिनी..

एक पुराण कथा आहे, भस्मासुराला मारण्यासाठी भगवान विष्णूनी मोहिनीचे रूप घेतलं, मोहिनीच्या रूपाची भुरळ पडून भस्मासूर मोहिनी जे करेल ते करायला लागला.. जणू तिने भस्मसुराचा मेंदूच हॅक केला.. आणि शेवटी स्वतःच्याच डोक्यावर हात ठेवून भस्मासूर भस्म झाला..
     अलगोरिदम ही एक प्रकारची मोहिनीच आहे. फरक इतकाच की ती तिच्या तालानुसार तुम्हाला नाचवत नाही तर तुम्हीच तुमच्या तालानुसार नाचत असता आणि त्यात इतके रंगून जाता की दुसरे ताल आहेत याचे भान उरत नाही..
    यू ट्यूब वर आपण जे पहात असतो सर्च करतो त्याच पद्धतीचे आपल्याला दिसत रहाते.. उदा फ्रोझन शोल्डर बद्दल सर्च केला तर त्याच्याच लिंक समोर येत राहतात, डायबेटीसबद्दल सर्च केल तर त्याच्या लिंक येत राहतात.
    राजकीय बाबतीत हे धोकादायक असतं. मोदी समर्थक असाल तर त्यान्च्या समर्थनाच्या पोस्ट व्हिडिओज दिसत राहतात,. विरोधक असाल तर विरोधाच्या पोस्ट दिसत राहतात..
     त्यामुळं होतं काय की आपल्यालाला जे आवडत ते दिसत रहाते आणि जे दिसतेय तेच सत्य वाटायला लागते, जे समोर येत ते फक्त येत नसते आपल्याला माईंड सेट प्रमाणे येत रहाते पण त्याचा आपल्याला पत्ता नसतो हे सगळ्यात जास्त धोकादायक आहे..
     तारतम्य आणि लॉजिक नसेल आपला भस्मासूर व्हायला वेळ लागतं नाही.. समाजात टोकाच्या राजकीय आणि सामाजिक भूमिका निर्माण व्हायला ही मेंदू हॅक करणारी अलगोरिदम ची मोहिनी काही अंशी जबाबदार आहे.. मेंदू ताब्यात घ्या आणि राज्य करा.. अगदी सर्वच क्षेत्रात....एक उघड नागडं सत्य..

-प्रशांत

Thursday, 28 August 2025

व्हरच्यूअल लकीमॅन

व्हरच्यूअल लकीमॅन


हो..मी आहे भाग्यवान 
रोज सकाळी व्हरच्यूअल 
वासुदेव येतो व्हाट्सप वर..
मॉर्निंग गुड करायला
अगदी नियमित..
इतका नियमित की 
त्याला आता,
पेन्शन, पी एफ, ग्रॅच्यूइटी 
लागू केलीय अलीकडेच 

एक मोटीव्हेटर देखील 
पाळलाय मी हल्ली..
आज काल लागतातच ना 
मोटिव्हेट करणारे..
कधी नांगरे -पाटील 
कधी ए पी जे कलामजी 
कधी प्रकाश आमटेसाहेब 
रेसिपी तयार असतेच..
बाउलभरून नांगरे पाटील 
दिवस भर फ्रेश ठेवतो..
कलामसाहेब पण न्यूट्रीशन 
देतात थेट ब्रेन ला..
कधी कधी विदेशी रेसिपी 
मंडेला, ओबामा वगैरे..वगैरे 
भलताच भाग्यवान आहे मी 

हिम्मत आहे का माझी
कुपोषित नास्तिक बनायची..?
पुण्याचे बूस्टर द्यायला..
एक जणं नियुक्त केलाय मी
वारा प्रमाणे तीर्थ देतो तो..
सोमवारी शंकर.
मंगळवारी गणपती
बुधवारी अनामिक..
नंतर दत्त, देवी आणि मारुती..
शिवाय सण उत्सव जम्बो पॅकेज
ते ते सिझनल देव..
पापाचा एक डाग नाही 
पडू देत बिचारा माझा
स्पिरिच्युल मोटिव्हेटर..
भलताच भाग्यवान आहे मी 

राजकारण, अर्थकारण
धर्मकारण, समाज कारण
आहार निद्रा भय मैथुन
क्रिकेट, युक्रेन, टेरिफ
अण्णा हजारें ते जरांगे
व्हाया रामदेवबाबा..
दिवस भराची यात्रा संपली
की नाईट गुड करायला
ठेवणीतले सांताकलॉज 
क्लोज करतात माझ्या
दिवसाची फाईल..
तुमची शपथ,..
मघा पासून तेच सांगतोय
भलताच भाग्यवान आहे हो मी 

-प्रशांत 😄

लोकमान्य गिधाड...

लोकमान्य गिधाड...

मनातलं गिधाड 
निपचित पडून आहे 
म्हणून जग म्हणतं 
तो खूप सज्जन आहे..

त्याला एकांताचे
आकाश दिलं तर कदाचित
लचके तोडेल कोणाचेही..
तितक्याच निर्ममतेने...

त्याच्या मनातलं गिधाड
वचकून असतं गर्दीला
मग ते आव आणत की ते
शुद्ध शाकाहारी असल्याचा

अशी अनेक शाकाहारी 
गिधाडे आहेत भोवती..
 दिवसभर शाकाहारी
आणि रात्री?
रात्रभर फाडत बसतात
त्याची हक्काची शिकार..
विधिवत समाजमान्य
लोकमान्य रीतीने...


-प्रशांत

Monday, 25 August 2025

इदम न मम

इदम न मम...

अहंकार अनेक प्रकारचे असतात, संपत्ती, सत्ता, रूप  असे अनेक... पण ज्ञानाचा ही अहंकार असतोच फक्त तो दिसून येत नाही.. खरं तर ज्ञान ही कोणाच्या मालकीची गोष्ट नाही.. ज्ञान स्थितीला येण्यासाठी यायला अनेक गोष्टी जुळून याव्या लागतात.. अनेक योग यावे लागतात योग्य टप्प्यावर योग्य माणसं भेटावी लागतात. काही माणसं आयुष्यतून जावी लागतात..या सगळ्यातून ज्ञान प्राप्ती झाली की मनुष्यास असे वाटत रहाते की त्याने जे ज्ञान मिळवले आहे (पक्षी -मिळाले आहे ) ते त्यानें केवळ स्व प्रयत्नांनें प्राप्त केले आहे.. आपण ज्ञानाचे वाहक नसून मालक आहोत ही भावना अहंकाराकडे नेते..
   यात अजून एक ट्विस्ट आहे. माहितीलाच ज्ञान समजले जाते.. माहितीवर प्रोसेस झाली की जे प्रोडक्ट तयार होतं ते ज्ञान.. आणि माहितीचा व्यवहारी उपयोग म्हणजे कौशल्य.. स्किल..
    ट्विस्ट मधलं अजून एक ट्विस्ट मटेरियलिस्टिक (भौतिक) पातळी वरून वर उठून कॊ ss हम चे उत्तर मिळवण्याची प्रोसेस म्हणजे साधना आणि मिळालेलं उत्तर म्हणजे ज्ञान.. त्याला अहंकार नसतो.. एकदा ईदम न मम ( हे माझे नाही) यां भावनेने  कर्तव्य केल तर अहंकार तरी कसला?

-भौतिक पातळीवर लेखनाची जबाबदारी घेणाऱ्या ज्ञानवाहकाचे पार्थिव नाव -प्रशांत... इदम न मम.. नाव सुद्धा )

आम्ही अज्ञेयवादी

आम्ही अज्ञेयवादी... आस्तिक नास्तिक वादात आम्ही अज्ञेयवादी लोकांनी काय करायचे???? आमची क्षमताच नाहीये देव आहे की नाही हे ठरवण्याची...आम्ही दो...