रत्नांग्री....
कसे होते? कुठे होते
विसरलोच आता रस्ते
निलाजऱ्या प्रशासनाचे
निर्लज्ज वायदे नुसते..
काय सांगू? किती सांगू
घशाला बसली कोरड
वीट आला ऐकून ऐकून
रोज तीच तीच ओरड..
कोण होती? कशी होती?
रत्नांग्री माझी देखणी
एकजात सर्वच आहेत
राजकारणी कुलक्षणी
तीच धूळ तेच खड्डे
वर्षानुवर्षे केवळ तेच तेच
एवढे कसे सहनशील आम्ही
आम्हालाच पडला पेच पेच
जनतेचा आक्रोश यांच्या
कानी काही पडेना
रस्त्या वाचून यांचे काही
मुदलातच बघा अडेना
मस्त गाडी, मस्त एसी
मस्त सगळे सस्पेशन
कसे कळावे बाबा यांना
बाईकवाल्यांचे टेन्शन..
बाद झाली मान कंबर
मोडून गेला कणा
मंत्री संत्री कोणीतरी
रत्नांग्रीला आपली म्हणा
जीव घेऊन मुठीत बिचारा
प्रवास करतोय कसातरी
कधी कुठे भेटेल यमराज
याची नाही खातरी
आज करतो उद्या करतो
नुसतीच सगळी हवा
सगळे मार्ग संपले आता
आता फक्त भैरी बुवा
बारा वाड्याच्या भैरीबुवा
बघ रे आमची दैना..
तुझ्या हवाली तुझी रत्नांग्री
चमत्कार काही दाखवना..
सुतासाखे कर सरळ
स्मरण दे रे जनसेवेचे
जनता जनार्दन सर्व काही
भान दे रे संविधानाचे..
फार काही मागत नाही
फक्त मागतो रस्ते चांगले
सांग रे भैरव नाथा
आमचे काही चुकले?
-प्रशांत...
No comments:
Post a Comment