Ad

Thursday, 28 August 2025

व्हरच्यूअल लकीमॅन

व्हरच्यूअल लकीमॅन


हो..मी आहे भाग्यवान 
रोज सकाळी व्हरच्यूअल 
वासुदेव येतो व्हाट्सप वर..
मॉर्निंग गुड करायला
अगदी नियमित..
इतका नियमित की 
त्याला आता,
पेन्शन, पी एफ, ग्रॅच्यूइटी 
लागू केलीय अलीकडेच 

एक मोटीव्हेटर देखील 
पाळलाय मी हल्ली..
आज काल लागतातच ना 
मोटिव्हेट करणारे..
कधी नांगरे -पाटील 
कधी ए पी जे कलामजी 
कधी प्रकाश आमटेसाहेब 
रेसिपी तयार असतेच..
बाउलभरून नांगरे पाटील 
दिवस भर फ्रेश ठेवतो..
कलामसाहेब पण न्यूट्रीशन 
देतात थेट ब्रेन ला..
कधी कधी विदेशी रेसिपी 
मंडेला, ओबामा वगैरे..वगैरे 
भलताच भाग्यवान आहे मी 

हिम्मत आहे का माझी
कुपोषित नास्तिक बनायची..?
पुण्याचे बूस्टर द्यायला..
एक जणं नियुक्त केलाय मी
वारा प्रमाणे तीर्थ देतो तो..
सोमवारी शंकर.
मंगळवारी गणपती
बुधवारी अनामिक..
नंतर दत्त, देवी आणि मारुती..
शिवाय सण उत्सव जम्बो पॅकेज
ते ते सिझनल देव..
पापाचा एक डाग नाही 
पडू देत बिचारा माझा
स्पिरिच्युल मोटिव्हेटर..
भलताच भाग्यवान आहे मी 

राजकारण, अर्थकारण
धर्मकारण, समाज कारण
आहार निद्रा भय मैथुन
क्रिकेट, युक्रेन, टेरिफ
अण्णा हजारें ते जरांगे
व्हाया रामदेवबाबा..
दिवस भराची यात्रा संपली
की नाईट गुड करायला
ठेवणीतले सांताकलॉज 
क्लोज करतात माझ्या
दिवसाची फाईल..
तुमची शपथ,..
मघा पासून तेच सांगतोय
भलताच भाग्यवान आहे हो मी 

-प्रशांत 😄

No comments:

Post a Comment

कविता..

कविता.. शिट्ट्या आणि टाळ्यांसाठी...  ती  नसते उभी कधीच स्टेज वर... मला आत्मभान देत , जागं करणारी  असते माझी कविता.. नेणिवेत ती असतेच सतत तरं...