Ad

Friday, 13 September 2024

कफल्लक

कफल्लक...

किती बेरजा
किती वजाबक्या
थोडे गुणाकार
खूपसे भागाकार..
हिय्या करून  थोडासा
पाहिली जेव्हा शिल्लक
मग कुठे कळले
अरे मी कफल्लक
अरे मी कफल्लक...

थोडेच भेटले
खूपसे घटले..
जे आपले वाटले
तेच तर आधीच फुटले
बेरीज कमी
वजावट जास्त
गणपतीचा पत्ता नाही
सजावटच जास्त..
थोडेच जण भोळे
बाकी सगळे तल्लख
मग कुठे कळले
अरे मी कफल्लक
अरे मी कफल्लक...

आयुष्याचा ताळेबंद
जुळलेला दिसतोय
नफा की तोटा?
अजून कुठे कळतोय
येण्यापेक्षा झाले
देणेच फार.
तरतुदी करून करून
जीव बेजार..
वर्षे संपत आल्यावर
समजून आली गल्लत
मग कुठे कळले
अरे मी कफल्लक
अरे मी कफल्लक...

उधळ माधळ 
खूप झाली
आता काटकसर 
झाली पाहिजे
गेले ते जाऊदे
उरलेल्याना 
जपलं पाहिजे....
मोजकीच माणसं
आता जवळ असू दे
रोषणाई हवी कोणाला?
देव्हाऱ्यात एक पणती लागू दे...
आयुष्याच्या अखेरीस तरी
असावी काही श्री शिल्लक
असू नये देवा मी
पुढच्या जन्मीही कफल्लक
पुढच्या जन्मीही कफल्लक

© प्रशांत..

Wednesday, 11 September 2024

मॅनर्स

मॅनर्स...

मॅनर्स पाळायच्या नादात आपण कृत्रिम आणि दांभिक होतोय का? ऑफिसमधले कॉर्पोरेट मॅनर्स आपण कुटुंबात सुद्धा आणतोय का? आपल्या सॉरी मध्ये खरंच अपराधीपणा आहे की ते केवळ शब्द? आपल्या थँक्स मध्ये खरंच ती कृतज्ञता उतरते की चेहरा कोरडा ठेवून आपण थँक्स बोलून जातो..आपण केलेले दुसऱ्याचे कौतुक हे शंभर नंबरी कौतुकच असते की ते आतल्या मत्सराचे वरवरचे अस्तर?
     कधी कधी शांत बसून हे प्रश्न आपण स्वतःलाच विचारले पाहिजेत. जगण्यातला , साद-प्रतिसाद देण्यातला नैसर्गिकपणा हरवून गेलाय हल्ली..हल्ली प्रतिसाद सुद्धा तर्क -कसोट्याची चाळण लावून येतो..आपले हसणे पण चूळ भरल्या सारखे येते..पु लं चे जुने एकपात्री कार्यक्रम पहा..लोक किती निरागस आनंदाने खळखळून हसत होते..त्याचे कारण ते कार्यक्रमाशी एकरूप होत होते..आता मनोरंजनाचे अनेक प्लॅटफॉर्म असल्याने,आणि सतत तो आदळत असल्याने त्यातले नावीन्य संपले.. मग लोकांना हसवायला त्याच्या आदिम भावनेला साद घालणे चालू झाले. विनोद नागडा झालाय हल्ली..एकूणच आपण सर्वच बाबतीत आदिम भावनेच्या पातळीवर उतरत चाललोय..आणि ते उतरणे पण प्रोफेशनल होत जातं आहे. मॅनर्स चे अवास्तव स्तोम म्हणजे स्वतःचा भेसूर चेहरा लपवण्याचा जणू मुखवटाच..
    जिथे राग आहे तिथे प्रेमही आहे.. पण जिथे केवळ प्रेमच प्रेम असते.. तिथे स्वार्थ लपलेला असतो..हल्ली बुद्धिबळ केवळ खेळ राहिलेला नाही, ती एक जीवन जगण्याची स्ट्रॅटेजी होऊन बसली आहे..माणूस हेरा, माणूस वापरा आणि माणूस फेकून द्या..आणि हे सगळे विथ मॅनर्स करा..मग झालातच तुम्ही यशस्वी...

© प्रशांत शेलटकर

Tuesday, 10 September 2024

मास्तर

मास्तर....

मास्तर तुम्ही म्हणालात,
तू फक्त लढ..
तेव्हापासून फक्त लढतोय मास्तर
लढतोय परिस्थितीशी
इथल्या व्यवस्थेशी..
आणि स्वतःशी सुद्धा..

मास्तर स्वतःशीच लढता लढता
कणा मोडून पडलाय आता
मास्तर तुमच्या विचारांचा
मास्तर तुमच्या तत्वांचा
जागो जागी होतोय पराभव
मास्तर बाहेर लढता येत हो
पण आतलं काय..?
सगळा मेंदूच ताब्यात घेतलाय
कार्पोरेटी बांडगुळानी..
चरसी झाकोळ आलाय
प्रत्येक पेशीवर..
मग सांगा मास्तर..
लढायचं कसं ?आणि कोणाशी?

मास्तर एक गुर्जी सांगायचे
खरा तो एकची धर्म..
जगाला प्रेम अर्पावे..
पण त्या गुर्जीना पण
आत्महत्या करावी लागलीच ना
गेले बिचारे..
त्याना कुठे माहीत होतं
प्रेम म्हणजे ओन्ली गिव्ह अँड टेक
मग सांगा मास्तर
कसं लढायचं आम्ही?

मास्तर, 
आजवर फक्त लढत आलो
तुमच्या शब्दांची तलवार केली
आणि तुमचा पाठीवरचा हात
हीच एक ढाल झाली..
पण मास्तर आता थकत चाललो
जिंकलो जिंकलो वाटलं
आणि परत परत हरत चाललो

मास्तर, आता तलवार तुटली
मास्तर, आता ढाल फुटली..
कदाचित तुमचा हात..
परत खिशाकडे जाईल..
मदत म्हणून थोडे पैसे
खिशातून बाहेर येतील..
पण मास्तर आता काहीच नको
चिखल असू दे तसाच
सवयच झाली हो त्याची..
आणि कारभारीण?
तिची काळजी नाय मास्तर
लाडक्या बहिणीची काळजी
हाय सरकारला..
पण मास्तर..
ती तेवढी कविता परत घ्या
फारच सलत रहाते आजकाल..
ती एकदा परत घेतलात की
कोडगेपण मिरवीन म्हणतो
आणि हो मास्तर...
 एक सांगायचं राहीलं
जमेल तशी काळजी घ्या..
प्रदूषण वाढलंय आजकाल..

-- तुमचाच एक कर्दमलेला विद्यार्थी....

© प्रशांत शेलटकर

Sunday, 4 August 2024

खेळ मांडला....

खेळ मांडीयेला..

इंटरनेट गेम चे adiction ही कोणा एका मुलाची समस्या राहिलेली नाही.ती सार्वत्रिक समस्या झाली आहे. त्यामुळे त्यावरचे सोल्युशन देखील सार्वत्रिक असलं पाहिजे.
      तंत्रज्ञान बदलण्याचा वेग दहा वर्षावरून काही दिवसांवर आला आहे. त्यामुळे त्या वेगाशी जुळवून घेणे मुलांना कठीण जात आहे तिथे पालकांची काय कथा? त्यामुळे पालक आणि मूल यांच्यात तंत्रज्ञानात्मक दुरावा हा अपरिहार्य आहे. आयटीयन्स पालकांना जे अवघड जाते तिथे सामान्य पालकांचे काय?
     मुलांशी सवांद करायचा म्हणजे नेमकं काय करायचं ? हा प्रश्न बहुसंख्य पालकांसमोर आहे.तंत्रज्ञानाचा अपरिहार्य वापर ही जीवनाचा अविभाज्य भाग आहे.आणि तीच मुलांची मुलांशी संवादाची भाषा आहे. समावयीन मुलांमधल्या चर्चा लक्षपूर्वक ऐकल्या तर हे लक्षात येईल की त्यांच्या चर्चा मोबाईल गेम्स बद्दल जास्त असतात.पालक आणि मूल यातील संवाद इथूनच तुटायला सुरवात होते.
     मोबाईल गेम्स ही मोठी इंडस्ट्री आहे.कोणत्याही इंडस्ट्री प्रमाणे ती नफ्या तोट्याचे गणित पहाते. नामवंत गेम कंपन्या त्यांच्या रिसर्च सेक्शन मध्ये मानसतज्ञ नेमतात की जे मुलांच्या मानसिकतेचा अभ्यास करून त्या प्रमाणे गेम्स डेव्हलप करत असतात. मग अशा गेम्सचे आकर्षण मुलांना वाटणे साहजिक आहे.पालकांचा मुलावर प्रभाव पडावा अस पालक वागतात काय? पालकच स्वतःमध्ये इतके व्यग्र असतात की त्यांच्या कामात मुलांचा व्यत्यय नको म्हणूम मूल अगदी लहान असल्यापासून मुलाच्या हातात एक खेळण म्हणून मोबाईल देतात.मग अशा पालकांची मुलाशी नाळ जुळायची कशी?
     दुसरी बाजू अशीही आहे की,मोबाईल गेम्सला प्रभावी पर्याय काय? जो पर्यंत त्याला पर्याय मिळत नाही तो पर्यन्त मुले त्याकडे आकर्षित होणारच.मैदानी खेळ हा एक पर्याय आहे परंतु शहरात अशी मैदाने आहेत कुठे? आणि मैदानावर मुलांना आणायची जबाबदारी पुन्हा एकदा सार्वत्रिक बनते.समाजा पासून अलिप्त राहणाऱ्या व्यक्तिकेंद्रीत पालकांसाठी  ही कठीण गोष्ट आहे.
     इंटरनेटवर कोणा एकाची मालकी नाही.त्यामूळे शासनावर सुध्दा मर्यादा येत असतात.पण मोबाइल गेम्सच्या adiction मुळे तरुण पिढी बाद होत असेल तर शासनाने काही धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे. मुलांना खेळायला मैदान उपलब्ध करून देणे ही शासनाची जबाबदारी आहे आणि मुलांना मैदानापर्यंत नेणे ही पालकांची जबाबदारी आहे. समाजात लोकसंख्येच्या प्रमाणात मानसोपचार तज्ज्ञांची संख्या आहे का?  ते माहीत नाही पण ती पुरेशी राहील याची काळजी शासनाने घेतली पाहिजे. भविष्यात गेमपीडित मुलांची संख्या मोठी असेल त्या दृष्टीने एक वेगळा समुपदेशन अभ्यासक्रम वैद्यकीय क्षेत्रात समाविष्ट करावा लागेल मोबाईल adiction ची लक्षणे ओळखणे आणि त्याच्यावर मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेणे या बाबत पालकांचे समुपदेशन झालं पाहिजे.
     एकुणात ही जबाबदारी पालक, शाळा आणि शासन अशी तिहेरी आहे.आपली मुलं आपल्यालाच वाचवायची आहेत.

- प्रशांत शेलटकर
   8600583846

Saturday, 3 August 2024

जात..

लोकांच्या मनातून जात जाऊ नये म्हणून जातिनिशी प्रयत्न चालू आहेत..😢

जात नाही ती जात..😢

जाते जाते वाटते पण जात नाही ती जात😢

जातच म्हणते मी नाही जात☺️

एकजात सगळ्या जाती सारख्याच.. जाता जात नाहीत..

जातिवंत जात एकच ..ती स्वतः..

जातीसाठी माती खाणे.. शब्दशः खरे..

 😢😢😢😢😢😢

जात..

जाता जाता जात नाही
तीच खरी जात असते
जाती साठी माती खाणे
माणुसकीला मात असते

मी वरचा तो खालचा
जात एक उतरंड आहे
व्यवस्थेच्या खरजेचा
तो अखंड कंड आहे

जी सोडायची आहे
तीच धरायची आहे
सोडली सोडली म्हणत
तीच आत मुरवायची आहे

जात नावाचे गारुड
कधीच उतरायचे नाही
नशेचीच चढली नशा
ती कधी उतरायची नाही

फुटून फुटून तुकडे होऊ
एकीची काय गरज
लवकरच उरावर बसेल
नव्या दमाचा इंग्रज

नेत्यांच्या पायावर
मेंदू ठेऊ गहाण
देव्हाऱ्यात भक्तिभावे
पुजू त्याची वहाण

रोज नवे आश्वासन
रोज नवे गाजर
बेंबीच्या देठापासून
करू जातीचाच जागर

जात म्हटले वाटते लाज
समाज म्हटले की छान
शब्दाचे खेळ करून
पुन्हा जातीलाच जान

एकेक नेता अल्लाउद्दीन
दिवे घासायचे सोडत नाही
जातींचा सोकावला राक्षस
दिव्यात काय जात नाही

- प्रशांत शशिकलाकांत

Thursday, 1 August 2024

कमल धर्मी...

कमलधर्मी...

खुळेपणाचे सोंग घेती
इथे कित्येक शहाणे
कित्येक खुळे वागती
प्रत्यक्षात शहाणे..

दिसते तसे नसतेच
सांगून गेले शहाणे
चकाकते ते सगळेच
नसते की हो सोने..

वरून अफाट कौतुक 
अन आत अखंड जळणे
शंभर ठेचा खाल्ल्यावर
माणूस होते कळणे

कौतुक झेलत उभा इथे
सारस्वतांचा मेळा
एकमेकांचेच कौतुक किती
तुझ्या गळा अन माझ्या गळा

चेहऱ्या मागचे चेहरे 
भीषण आणि भेसूर
ओळख लागत नाही 
हाच एक कसूर...

जळणारे जळो बापुडे
जळणे हेच त्यांचे कर्म
जळात राहून अलिप्त होणे
हाच कमळाचा धर्म..

-प्रशांत शशिकांत शेलटकर

आई..

आई..

तुझ्या कुशीची उणीव
भासते मज आई..
तुझ्याविना ना कोणी मजला
समजून घेई आई..

काल होतीस तू
आज आठवण झालीस आई
अजून गुंजते कानात माझ्या
तुझी वत्सल अंगाई...

भास होतात तुझे
आहेस तू सभोवती आई
तुझ्या वत्सल नजरेत
अजून मी भिजतो आई..

येतो ग म्हणून..
निरोप घेण्याची सवय आई
आता कुणास येतो ग
म्हणू मी आई...

तुझे अवचित जाणे
व्याकुळ करते आई
सांगायचे होते काही
तशीच गेलीस ना आई...

आता एकांत हा
रडवतो मोकाट आई
एकटाच ग रडतो मी..
क्षणभर तरी भेटून जा आई

- प्रशांत

आम्ही अज्ञेयवादी

आम्ही अज्ञेयवादी... आस्तिक नास्तिक वादात आम्ही अज्ञेयवादी लोकांनी काय करायचे???? आमची क्षमताच नाहीये देव आहे की नाही हे ठरवण्याची...आम्ही दो...