Ad

Saturday, 3 August 2024

जात..

लोकांच्या मनातून जात जाऊ नये म्हणून जातिनिशी प्रयत्न चालू आहेत..😢

जात नाही ती जात..😢

जाते जाते वाटते पण जात नाही ती जात😢

जातच म्हणते मी नाही जात☺️

एकजात सगळ्या जाती सारख्याच.. जाता जात नाहीत..

जातिवंत जात एकच ..ती स्वतः..

जातीसाठी माती खाणे.. शब्दशः खरे..

 😢😢😢😢😢😢

जात..

जाता जाता जात नाही
तीच खरी जात असते
जाती साठी माती खाणे
माणुसकीला मात असते

मी वरचा तो खालचा
जात एक उतरंड आहे
व्यवस्थेच्या खरजेचा
तो अखंड कंड आहे

जी सोडायची आहे
तीच धरायची आहे
सोडली सोडली म्हणत
तीच आत मुरवायची आहे

जात नावाचे गारुड
कधीच उतरायचे नाही
नशेचीच चढली नशा
ती कधी उतरायची नाही

फुटून फुटून तुकडे होऊ
एकीची काय गरज
लवकरच उरावर बसेल
नव्या दमाचा इंग्रज

नेत्यांच्या पायावर
मेंदू ठेऊ गहाण
देव्हाऱ्यात भक्तिभावे
पुजू त्याची वहाण

रोज नवे आश्वासन
रोज नवे गाजर
बेंबीच्या देठापासून
करू जातीचाच जागर

जात म्हटले वाटते लाज
समाज म्हटले की छान
शब्दाचे खेळ करून
पुन्हा जातीलाच जान

एकेक नेता अल्लाउद्दीन
दिवे घासायचे सोडत नाही
जातींचा सोकावला राक्षस
दिव्यात काय जात नाही

- प्रशांत शशिकलाकांत

No comments:

Post a Comment

कविता..

कविता.. शिट्ट्या आणि टाळ्यांसाठी...  ती  नसते उभी कधीच स्टेज वर... मला आत्मभान देत , जागं करणारी  असते माझी कविता.. नेणिवेत ती असतेच सतत तरं...