Ad

Thursday, 28 August 2025

व्हरच्यूअल लकीमॅन

व्हरच्यूअल लकीमॅन


हो..मी आहे भाग्यवान 
रोज सकाळी व्हरच्यूअल 
वासुदेव येतो व्हाट्सप वर..
मॉर्निंग गुड करायला
अगदी नियमित..
इतका नियमित की 
त्याला आता,
पेन्शन, पी एफ, ग्रॅच्यूइटी 
लागू केलीय अलीकडेच 

एक मोटीव्हेटर देखील 
पाळलाय मी हल्ली..
आज काल लागतातच ना 
मोटिव्हेट करणारे..
कधी नांगरे -पाटील 
कधी ए पी जे कलामजी 
कधी प्रकाश आमटेसाहेब 
रेसिपी तयार असतेच..
बाउलभरून नांगरे पाटील 
दिवस भर फ्रेश ठेवतो..
कलामसाहेब पण न्यूट्रीशन 
देतात थेट ब्रेन ला..
कधी कधी विदेशी रेसिपी 
मंडेला, ओबामा वगैरे..वगैरे 
भलताच भाग्यवान आहे मी 

हिम्मत आहे का माझी
कुपोषित नास्तिक बनायची..?
पुण्याचे बूस्टर द्यायला..
एक जणं नियुक्त केलाय मी
वारा प्रमाणे तीर्थ देतो तो..
सोमवारी शंकर.
मंगळवारी गणपती
बुधवारी अनामिक..
नंतर दत्त, देवी आणि मारुती..
शिवाय सण उत्सव जम्बो पॅकेज
ते ते सिझनल देव..
पापाचा एक डाग नाही 
पडू देत बिचारा माझा
स्पिरिच्युल मोटिव्हेटर..
भलताच भाग्यवान आहे मी 

राजकारण, अर्थकारण
धर्मकारण, समाज कारण
आहार निद्रा भय मैथुन
क्रिकेट, युक्रेन, टेरिफ
अण्णा हजारें ते जरांगे
व्हाया रामदेवबाबा..
दिवस भराची यात्रा संपली
की नाईट गुड करायला
ठेवणीतले सांताकलॉज 
क्लोज करतात माझ्या
दिवसाची फाईल..
तुमची शपथ,..
मघा पासून तेच सांगतोय
भलताच भाग्यवान आहे हो मी 

-प्रशांत 😄

लोकमान्य गिधाड...

लोकमान्य गिधाड...

मनातलं गिधाड 
निपचित पडून आहे 
म्हणून जग म्हणतं 
तो खूप सज्जन आहे..

त्याला एकांताचे
आकाश दिलं तर कदाचित
लचके तोडेल कोणाचेही..
तितक्याच निर्ममतेने...

त्याच्या मनातलं गिधाड
वचकून असतं गर्दीला
मग ते आव आणत की ते
शुद्ध शाकाहारी असल्याचा

अशी अनेक शाकाहारी 
गिधाडे आहेत भोवती..
 दिवसभर शाकाहारी
आणि रात्री?
रात्रभर फाडत बसतात
त्याची हक्काची शिकार..
विधिवत समाजमान्य
लोकमान्य रीतीने...


-प्रशांत

Monday, 25 August 2025

इदम न मम

इदम न मम...

अहंकार अनेक प्रकारचे असतात, संपत्ती, सत्ता, रूप  असे अनेक... पण ज्ञानाचा ही अहंकार असतोच फक्त तो दिसून येत नाही.. खरं तर ज्ञान ही कोणाच्या मालकीची गोष्ट नाही.. ज्ञान स्थितीला येण्यासाठी यायला अनेक गोष्टी जुळून याव्या लागतात.. अनेक योग यावे लागतात योग्य टप्प्यावर योग्य माणसं भेटावी लागतात. काही माणसं आयुष्यतून जावी लागतात..या सगळ्यातून ज्ञान प्राप्ती झाली की मनुष्यास असे वाटत रहाते की त्याने जे ज्ञान मिळवले आहे (पक्षी -मिळाले आहे ) ते त्यानें केवळ स्व प्रयत्नांनें प्राप्त केले आहे.. आपण ज्ञानाचे वाहक नसून मालक आहोत ही भावना अहंकाराकडे नेते..
   यात अजून एक ट्विस्ट आहे. माहितीलाच ज्ञान समजले जाते.. माहितीवर प्रोसेस झाली की जे प्रोडक्ट तयार होतं ते ज्ञान.. आणि माहितीचा व्यवहारी उपयोग म्हणजे कौशल्य.. स्किल..
    ट्विस्ट मधलं अजून एक ट्विस्ट मटेरियलिस्टिक (भौतिक) पातळी वरून वर उठून कॊ ss हम चे उत्तर मिळवण्याची प्रोसेस म्हणजे साधना आणि मिळालेलं उत्तर म्हणजे ज्ञान.. त्याला अहंकार नसतो.. एकदा ईदम न मम ( हे माझे नाही) यां भावनेने  कर्तव्य केल तर अहंकार तरी कसला?

-भौतिक पातळीवर लेखनाची जबाबदारी घेणाऱ्या ज्ञानवाहकाचे पार्थिव नाव -प्रशांत... इदम न मम.. नाव सुद्धा )

Monday, 18 August 2025

रे पावसा...



इतका पडू नकोस ना पावसा 
की आता मोड येतील..
थंड थंड गारठ्या ने..
मूड आमचे जातील..

चिंब झिम्माड ओले कपडे..
वाळता वाळता वाळत नाहीत 
तव्यावर ठेवाव्या चड्ड्या 
तर भाकरीला जागा मिळत नाही

बनियान चड्डी तव्यावर
सांग बरं कस हे दिसत
म्हणतात शेलटकरांनी
मेनू बदलला वाटत..

तुला नाही चड्डी बनियान
निर्लज्जा तू तस्साच बरसतो
तुला बघून तसें नागवे..
वारा खो खो हसतो...

आता तरी थांब मेल्या
बाहेर जायचे वांदे...
भज्या करून करून
संपले रे घरचे  सगळे कांदे

पड रे बाबा क्वार्टर क्वार्टर
नकोच एकदम खंबा
कुठेतरी केव्हातरी असावा
बरसण्याला तुझ्या थांबा

आता जास्त पडलास तर
डोळे भरून येतील
देवा शपथ तुला सांगतो
शाप उन्हाचे लागतील

-© प्रशांत शेलटकर

Saturday, 9 August 2025

राजकारण

कोणताही राजकीय पक्ष काही अमरपट्टा घालून जन्माला आलेला नाही 1885 साली जन्मलेली काँग्रेस आता आहे कां? ती कधी काँग्रेस एस झाली  तर कधी आय झाली, हिंदू महासभा, फॉरवर्ड ब्लॉक सारखे पक्ष आले कधी आणि गेले कधी कळलं नाही, शेतकरी कामगार पक्ष आज कुठे आहे? 
    वेळे नुसार राजकीय पक्ष धोरण बदलतात, कारण ते सत्ता संपादन या एकमेव हेतुने जन्म घेतात, हिंदुत्वा चा मुद्दा 90 च्या दशकात भाजप ने उचलून धरला, त्या अगोदर भाजपाचा अजेंडा वेगळा होता, काँग्रेसचा सर्वसमावेशक अजेंडा लोकमान्य टिळकांच्या काळात मुस्लिम धर्जीना झाला, गांधीच्या पूर्व काळात तो कमी झाला उत्तर काळात वाढला. मराठीचा मुद्दा उचलून घेतलेली शिवसेना तत्कालीन काँग्रेस पक्षाने कम्यूनिस्टा ना शह म्हणून वाढू दिली. पुढे शिवसेनेने हिंदुत्वाचा मुद्दा उचलला..
      काळाची गरज म्हणून प्रत्येक राजकीय पक्ष अगदी परस्पर विरोधी विचार असलेल्या पक्षाशी युती करत असतो, सत्तर च्या दशकात मा. शरद पवार यांनी केलेला पुलोद चा प्रयोग आठवून पहा त्यात जनसंघ सुद्धा युतीत सामील होता, पवार साहेबांचा राजकीय प्रवास आय काँग्रेस ते समाजवादी काँग्रेस ते पुन्हा आय काँग्रेस ते राष्ट्रवादी काँग्रेस असा झालाय.
     भाजपचा प्रवास जनसंघ ते भाजप असा झालाच पण तात्विक दृष्टीने फ्रॉम पार्टी विथ डिफ्रन्स टु पार्टी लाईक काँग्रेस असा झालाय. तो तसा झाला नसता तर भाजप ची शे का प झाली असती काय? हा पण एक त्यान्च्या कार्यकर्त्याना छळणारा प्रश्न असू शकतो.
   कम्युनिस्ट पक्षाची बेसिक धोरणे एकच असली तरी राजकीय सोयीसाठी त्त्यांचे पण वेगळे गट आहेतच
     थोडंक्यात  प्रत्येक सुज्ञ माणूस आणि राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यानी स्वतःच्या आणि इतर राजकीय पक्षाचे इतिहास वाचले पाहिजेत, 
     त्यामुळं खुपशा राजकीय अंधश्रद्धा कमी होतील.

- प्रशांत

हिमनदी

.हिमनदी...

.. अखेर सुटला तिचा हिमसंयम 
सुटली ती सुसाटत, रोरावत..
खाली अजून खाली खोल खोल 
जे दिसेल ते ओरबाडत..
नाचवत..हिंसक होतं..
निर्मम काली होतं...

मंदिर, मशीद, दर्गा 
सर्वांचा एकच मलबा..
सगळया प्रार्थना सगळ्या श्रद्धा 
सगळ वैर, सगळं वात्सल्य
काठावर सोडुन तिने जपला
प्रलंयंकारी सर्वधर्मसमभाव

ती तशीच पुढे गेली
रोरावात, हेलकावत..
अस्तित्वाच्या चिंधड्या करत..
ती जाणारच होती तशी...
बेदरकार बेफिकीर...
मुंग्याच्या छात्या फोडत.. आणि
त्यान्च्या मेंदूतला विकासाचा
डी एन ए, उचकटून फेकून देत
सगळ्या भूगोलाचा इतिहास करत 

तिचे ते तसे जाणे 
ही जणू अटळ रेषाच होती
नियतीने ओढलेली..
तिथल्या हिरव्या प्रतलावर..
कायम साठी...

-प्रशांत

Friday, 8 August 2025

कवितेचं पान

कवितेचे पान...

आता पहाटे..
लिहायला बसलोय तर 
दवात भिजलेली 
शब्दांची फुलपाखरे
पेनाभोंवती बागडत आहेत 
आणि मी म्हणतोय 
लटक्या रागाने त्याना...
अरे हो हो तुमच्या पंखांवरचे..
मखमली अर्थ तरी नीटसे 
समजावून घेऊदेत मला..

ऐकलं बरं कां त्यानी..
शहाणी फुलपाखरं मग 
शहाण्या मुलांसारखी..
कागदावर उतरली अलगद 
त्यान्च्या त्यांच्या जागी..
अन अजून एक कविता
त्या कोऱ्या पानावर रुजून आली

मग मी सुद्धा मिटून ठेवली 
माझी कवितेची डायरी 
तिचे अर्थ उडून जाऊ नयेत म्हणून

© प्रशांत ✒️

Saturday, 2 August 2025

गणित

गणित..

बीजगणिताचे बीज 
माझ्यात काही रुजले नाही 
आयुष्याचे गणित मात्र 
त्यामुळंच का समजलं नाही?

कसे कळावे गणित ते
चावरे सर असताना,,
दोन वर्ग एकाच खोलीत
दाटी वाटीने बसताना

गणिते फक्त फळ्यावर
उतरली हो चावरे सर
विचारलात का कळले का?
कधी तुम्ही आम्हाला सर?

धडया सारखे गणित सर
कोणी का शिकवते सर?
तुमचा तरी तुम्हाला 
आत्मविश्वास होता सर?

एका बाकावर चौघेजण
वही तरी कशी धरावी?
हसत खेळत शिकवल्याविना
गोडी कशी लागावी?

सॉरी सर, जरा स्पष्टच
बोलतोय धाडस करून
शिक्षकावर असते मुलांचे
भवितव्य हो अवलंबुन

गणितालाच तेव्हा पासून
मी एक्स मानलं आहे..
उत्तर अजून अनुत्तरीत
केव्हापासून राहील आहे

खंत होती केव्हापासून
सर, आज व्यक्त झालोय
आयुष्याचे गणित मात्र
नेटाने सोडवित बसलोय


प्रशांत-आठवी ब
विद्यामंदिर पावस

कविता..

कविता.. शिट्ट्या आणि टाळ्यांसाठी...  ती  नसते उभी कधीच स्टेज वर... मला आत्मभान देत , जागं करणारी  असते माझी कविता.. नेणिवेत ती असतेच सतत तरं...