कवितेचे पान...
आता पहाटे..
लिहायला बसलोय तर
दवात भिजलेली
शब्दांची फुलपाखरे
पेनाभोंवती बागडत आहेत
आणि मी म्हणतोय
लटक्या रागाने त्याना...
अरे हो हो तुमच्या पंखांवरचे..
मखमली अर्थ तरी नीटसे
समजावून घेऊदेत मला..
ऐकलं बरं कां त्यानी..
शहाणी फुलपाखरं मग
शहाण्या मुलांसारखी..
कागदावर उतरली अलगद
त्यान्च्या त्यांच्या जागी..
अन अजून एक कविता
त्या कोऱ्या पानावर रुजून आली
मग मी सुद्धा मिटून ठेवली
माझी कवितेची डायरी
तिचे अर्थ उडून जाऊ नयेत म्हणून
© प्रशांत ✒️
No comments:
Post a Comment