.हिमनदी...
.. अखेर सुटला तिचा हिमसंयम
सुटली ती सुसाटत, रोरावत..
खाली अजून खाली खोल खोल
जे दिसेल ते ओरबाडत..
नाचवत..हिंसक होतं..
निर्मम काली होतं...
मंदिर, मशीद, दर्गा
सर्वांचा एकच मलबा..
सगळया प्रार्थना सगळ्या श्रद्धा
सगळ वैर, सगळं वात्सल्य
काठावर सोडुन तिने जपला
प्रलंयंकारी सर्वधर्मसमभाव
ती तशीच पुढे गेली
रोरावात, हेलकावत..
अस्तित्वाच्या चिंधड्या करत..
ती जाणारच होती तशी...
बेदरकार बेफिकीर...
मुंग्याच्या छात्या फोडत.. आणि
त्यान्च्या मेंदूतला विकासाचा
डी एन ए, उचकटून फेकून देत
सगळ्या भूगोलाचा इतिहास करत
तिचे ते तसे जाणे
ही जणू अटळ रेषाच होती
नियतीने ओढलेली..
तिथल्या हिरव्या प्रतलावर..
कायम साठी...
-प्रशांत
No comments:
Post a Comment