Ad

Monday, 24 March 2025

बाकी शून्य..

बाकी शून्य...

माझ्याच मनाच्या
खोल खोल डोहात
जेव्हा मी उतरतो
तेव्हा त्या डोहाच्या तळाशी
मीच दिसतो 
अगदी अगतिक ,असहाय्य
मान गुडघ्यात घातलेला 
बिनचेहऱ्याचा मी..

सगळीकडे ...
अंधार लपेटून बसलेला अंधार..
उजेडाची भीती असलेला अंधार

मी.... 
चिरदाह मिरवणारा ..अश्वत्थामा
मी ...
वासनांचे गंजलेले बाण ...
भात्यात शिल्लक असलेला  
कौंतेय ...हो कौंतेयच..

 पण मी उतरत नाही आजकाल
माझ्या मनाच्या खोल डोहात
भीती वाटते..
कदाचित मी तिथे नसलो तर?
वेदना मिरवण्याचा ,
अगतिकतेचा ,असहाय्यतेचाही
मोह असतोच ना..
बस्स शून्याला शून्याचा मोह..
 बाकी सर्व शून्यच

-प्रशांत

Tuesday, 18 March 2025

अल्गोरिदम

....आपण जे सतत बघतो ,वाचतो आणि पहातो तेच सोशल मीडिया आपल्याला दाखवतो याचे कारण अल्गोरिदम ..हे बरोबरच..त्यामुळेच आजूबाजूला केवळ निगेटीव्ह चाललेल आहे किंवा आजूबाजूला केवळ पॉझिटिव्ह चाललं आहे, अमूक-ढमूक राजकीय नेता आपला तारणहार आहे/खलनायक आहे. हे आपले आहेत .ते परके आहेत अशी विचारसरणी पक्की होत जातेय.
आपल्या मोबाईलचे नेट चालू असेल आणि आपण सोशल मीडियावर नसलो तरी आपण ज्या गप्पा मारतो त्या नुसार आपल्याला नोटिफिकेशन्स येत असतात.
    प्रिंट मीडिया हा राजकीय पक्षांनी वाटून घेतला आहे. एवढंच कशाला लेखक आणि विचारवंतांचे देखील कळप असतात..ते सतत ब्रेनवॉश करत असतात.
     सोशल मीडिया हे समूह नियंत्रित एक टूल आहे .तुम्ही काय विचार करायचा ,कोणत्या पद्धतीने विचार करायचा ?तुम्ही काय पहायचे? एवढंच नाही आम्ही दाखवतो तेच सत्य कसे आहे..हे सोशल मीडिया ठरवतो
    आपण व्हाटसप, फेसबुक ,इन्स्टाग्राम वापरत नसून आपल्याला हे सोशल प्लॅटफॉर्म वापरत आहेत हे शहाण्या माणसांनी पाहिले पाहिजे..अस मला वाटत..
     -टीप- आणि हे सर्व लिहायला मला फेसबुक किंवा व्हाटसप चाच प्लॅटफॉर्म वापरायला लागतोय..हाच मोठा विरोधाभास  होय

Sunday, 9 March 2025

आपली उपस्थिती प्रार्थनिय आहे......

आपली उपस्थिती प्रार्थनिय आहे......

  जगण्यातली जिंदादिली...उस्फूर्तता हरवलीय म्हणून आनंद नासून गेलाय हल्ली..आपण जवळपास सगळ्याच गोष्टी केवळ औपचारिकता म्हणून करतोय.
     वाढदिवसाच्या ,लग्नाच्या ,परीक्षेत पास झाल्याच्या शुभेच्छा केवळ द्यायच्या म्हणून देतोय..एखाद्याचे यश आपल्याला रुचेलच अस नाही..पण केवळ जनरित म्हणून शुभेच्छा देतोय..
     लग्नाला गेलो तर    आपण आलो होतो याची नोंद घेतली जावी आणि केवळ कर्तव्य म्हणून आपण पाकीट देऊन येतो..त्यात ना आनंद ना उत्साह..
      जे लग्नाला तेच मयताला..केवळ उपस्थिती लावणे किंबहुना ती दाखवणे हाच शुद्ध हेतू..हाक मारायला जाताना खर तर त्या व्यक्तीचे सांत्वन त्याला दिलासा हाच हेतू असतो.. पण बहुतेक वेळी आपण हाक मारायला जाताना केवळ कर्तव्य हाच हेतू ठेवून जातो.ना डोळे ओले होत.. ना कंठ दाटून येत..

     कोणी आजारी असेल ,तर न जाणे " बरं" दिसत नाही म्हणून आपण त्याला भेटून येतो..एक बिस्किट पुडा दिला की कर्तव्य संपतं आपलं...

    एकूणात आपण आपल्या जगण्यातली  नैसर्गिकता ,उस्फूर्तता हरवून बसलोय..एक कळाहीन ..बेचव आणि दिखाऊ आयुष्य जगतोय आपण..लग्न,मुंजी, मयतं ,बारसं या सगळ्याना केवळ उपस्थिती  दाखवून आपलं समाधान करून घेतो बस्स इतकंच..

-प्रशांत

Saturday, 8 March 2025

तुमचं असं कधी होतं का?

तुमचं असं कधी होतं का?

एका बैठकीत दोनशे पानी पुस्तक वाचून संपवावे म्हणून तुम्ही बैठक मारता आणि चार पाच पान वाचून झाली की अस वाटत की अरे यार बाकीची काम कधी करणार ?  खूप दिवस झाले हार्मोनियम वाजवली नाही..वरचेवर हात बसला नाही तर खराब होईल ती...अरे इस्त्री करायची राहून गेलीय..कपाट लावायचं राहून गेलंय.. मग पुन्हा चार पाच पान वाचून झाली की ऑफिस आठवतं.. तिथली पेंडींग काम आठवतात..मार्च एन्ड जवळ आलाय आपली काहीच तयारी नाही..पुढची चार पान वाचताना लक्षच लागत नाही..व्हाटसप वर काय मेसेज आले असतील..म्हणून पाच मिनिटं बघू आणि ठेवू असा विचार करून व्हाटसप बघतो.. त्यात चॅट करत बसतो तिथून फेसबुक.. तिथून इन्स्टा.. मग एक रील...पुढच रील पुढच रील...मग ते रहाटगाड चालूच..माहितीचे  लोटे मेंदूत रिकामे होत जातात..बिनकामाची माहिती मेंदूत साठत जाते..
       जगाशी सतत कनेक्ट रहायच हे व्यसन एकदम बेक्कार..मेंदू वेठबिगारी होतो..जेमतेम दहा बारा पान वाचलेलं पुस्तक तसंच पान  फडफडवत तिथेच पडून रहात.. केव्हातरी ते उचललं जातं.. बुक शेल्फ मध्ये  ठेवलं जातं..न वाचलेल्या पुस्तकांनी बुकशेल्फ भरून जाते..
       तुमचं अस कधी होत का?

-प्रशांत

स्त्री

पुरुष स्त्रीच्या शरीराशी घुटमळतो म्हणून त्याला स्त्री पूर्ण कळत नाही..तिचं परसेप्शन अधिक व्यापक असतं.. अगदी लहानतला लहान आनंद ती समरसून घेते..अनेक गोष्टीतले एक्सट्रीम आनंद ती घेऊ शकते..साधी टिकली लावताना तिच्या चेहऱ्यावरचे भाव बघा..त्यातही एक नजाकत असते.. तीचं केवळ शरीर बघणाऱ्या पुरूषाला स्त्री कधीच कळणार नाही..
     © प्रशांत

Monday, 3 March 2025

रेडी टू एक्सप्रेस

रेडी टू एक्सप्रेस...

रेडी टू इट ...दो मिनीट म्यागी सारख्या इन्स्टंट जमान्यात आपलं मत व्यक्त करायला आताशा अभ्यास आणि व्यासंगाची गरज नाही..पूर्वी दहा शब्द लिहायची झाल्यास किमान एक पुस्तक वाचायला लागायचं , आता सोशल मीडियावर आपल्याला हव्या त्या माहितीचे तुकडे उपलब्ध असतात..ते उचलायचे आणि रेसिपीला जसे वेगवेगळे मसाले वापरतात तसे वापरायचे ..कोणत्याही ऐतिहासिक व्यक्ती विषयी माहिती घेताना त्यांनी लिहीलेली आणि त्यांच्याविषयी लिहिलेली सगळी पुस्तक वाचली पाहिजेत त्यातून ती व्यक्ती उलगडत जाते. त्यांचा उलट सुलट प्रवास समजत जातो. त्यांचे काळाच्या कसोटीवर योग्य ठरलेले आणि अयोग्य ठरलेले निर्णय समजून घेता येतात.मुळात हे सगळं शांतपणे..हळूहळू पक्के करत ,तपासून घेत समजून घेता येत.महत्वाचे म्हणजे त्या व्यक्तीला माणूस म्हणून समजून घेता येते. फ्रेम मध्ये लटकवणे आणि फासावर लटकवणे ही दोन टोके टाळता येतात.
      आज आपण सोशल मीडियावर तुकड्या तुकड्याने समजून घेत आहोत.. त्यात सलगता नसते. पोस्ट करणारे सोयीनुसार तुकडे टाकत असतात, काही ग्रुप तर एक तर पॉझिटिव्ह किंवा निगेटीव्ह पोस्ट टाकत बसतात.त्यामुळे ग्रुप जॉईन करणे म्हणजे स्वतःचा ब्रेनवॉश करून घेणे होय अस चालू आहे सध्या.....प्रवास करताना जेवण तयार आहे असे बोर्ड दिसतात..तसे सोशल मीडियावर माहिती तयार आहे चे अदृश्य बोर्ड आहेत .त्यातून "चुलीवरच्या माहितीला "खूप मागणी आहे. रूढ असलेल्या महितीपेक्षा काहीतरी वेगळं वाचलं की ते मनाला आकर्षित करते..
    ही एक प्रकारची नशा आहे.तुम्ही कोणत्या पध्दतीने विचार करायचा आणि कोणत्या पध्दतीने व्यक्त व्हायचे हे हल्ली सोशलमीडिया ठरवतो.अर्थात माहितीचा स्फोट होणे हे चांगलेच असते. त्यामुळे परस्परविरोध समजतो. प्रिंट मीडियाला मर्यादा असतात आणि तो नियंत्रित होतो किंवा केला गेला जाऊ शकतो.पण सोशल मीडिया हा माहितीचा धबधबा आहे. फक्त त्या धबधब्यात आपली सद्सद्विवेक बुद्धी,स्वतन्त्र विचार शक्ती आणि माणुसकी वाहून जाता नये इतकंच..पुढे ए आय आहे ..त्यामुळे धोका अजून गडद आहे..

- प्रशांत शेलटकर
  8600583846

Sunday, 2 March 2025

कलाकार.. श्रेय-अपश्रेय

कलाकार.. श्रेय-अपश्रेय

कला क्षेत्रात स्ट्रगल करून यशस्वी झालेले पुरुष त्याचे श्रेय आपल्या पत्नीला देताना दिसतात बहुधा...म्हणजे हिने साथ दिली,संसाराचा गाडा हिने ओढला म्हणून मला या क्षेत्रात झेप घेता आली वगैरे वगैरे...आणि त्यांच्या बायकांच्या चेहऱ्यावर सुद्धा कृतार्थतेचे भाव वगैरे असतात..
    पण स्ट्रगल करून अयशस्वी झालेल्या पुरुषांचे काय होत असेल..त्यांच्या बायकांचे त्यांच्या विषयी काय मत असतील त्यांच्या विषयी? त्यांचा पण संघर्ष चालूच असेल ना? त्यांची नाव यशाच्या किनाऱ्याला न लागता भरकटत असेल...
    आपल्या समोर यशस्वी पुरुषांच्या कथा नेहमी येतात..पण अयशस्वी पुरुषांच्या आणि त्यांच्या हतबल बायकांच्या कथा कधी समोर येत नाहीत..म्हणजे माहीत नसतात असे नाही पण लाईम लाईट मध्ये येत नाहीत. 
    प्रत्येकाला यश मोह घालते. अपयश नकोसे वाटते..म्हणून यशस्वी पुरुष आपल्या यशाचे श्रेय बायकोला देतो तीही कृतार्थ भावनेने स्वीकारते..पण अयशस्वी पुरुष तसे करू शकत नाही..त्याला गिल्ट येतो..खरं तर निदान या दिवसा पर्यंत तरी बायका आपल्या नवऱ्याला साथ देतात कधी आनंदाने कधी नाईलाज आणि जनरित म्हणून..पण देत आलेल्या आहेत..हे नक्की ..पुढच्या काळाविषयी काही बोलत नाही..

टीप- फेसबुकवर प्रशांत दामले सरांविषयी पोस्ट वाचली,सुरवातीला बेस्ट मध्ये टायपिस्ट होते दामले सर, नाटक आणि एकांकिका चालू होत्या पण नोकरी आणि नाटक जमेना म्हणून पत्नीशी चर्चा झाली ,पत्नी म्हणाली मी सांभाळून घेईन सर्व तुम्ही नाटकावर लक्ष केंद्रित करा..मग दामले नी बेस्ट मध्ये पाच वर्षांची बिनपगारी रजा टाकली आणि कामाला सुरुवात केली पुढचा प्रवास माहीत आहे सर्वांना..दामले सर कृतज्ञ भावनेने सगळं श्रेय पत्नीला देतात...

यावरून हे लिहायला सुचलं मला

खोचक टीप- दामले सरांच्या यशाचे श्रेय पाच वर्षे बिनपगारी रजा देणाऱ्या बेस्ट लाही दिले पाहिजे.. अनेक कलाकार बेस्ट दिले आहेत बेस्ट ने मराठी रंगभूमीला..😊 

अतिखोचक टीप- एक दिवस न सांगता गैरहजर राहिला म्हणून लाथ मारून हाकलून देणाऱ्या कॉर्पोरेटने किती कलाकार गर्भातच नासवले असतील ना?

© प्रशांत कलाकांत शेलटकर

    86 00 58 38 46

अनय

अनय.. लोक करतात राधे राधे  पण त्या अनयच काय  दुःख त्याचे मूक अनावर  कोण लक्षात घेत काय? सात फेरे आणि आहुती  त्यानेही दिली असेलना सुखी संसारा...