Ad

Friday 2 February 2024

नारायण

नारायण...

पुलं ची एक नारायण नावाची कथा आहे..तो जो नारायण नावाचा कथानायक आहे तो सहृदय,उपकारी,लोकांची कामे स्वतःची समजून करणारा.एक गरीब मनुष्य आहे. मनुष्यात रमणारा मनुष्य आहे..
    एक लग्न ठरतं.. तिथे तसा काही संबंध नसताना ते आपल्या घरचेच लग्न असल्यासारखा तो राबतो..अगदी पत्रिका छापण्यापासून ,बस्ता खरेदी, ते अगदी पंगत वाढण्यापर्यंत सगळी कामे अगदी मनापासून करतो..पायाला भिंगरी लावल्यासारखा फिरतो..आपला तसा काही संबंध नसताना परक्याचे लग्न अक्षरशः त्याच्या अंगात येते..
       सर्वांची कामे करत असल्यामुळे तो अर्थातच सगळ्यांचा लाडका बनतो लग्न होईपर्यंत त्या घरातील सर्व मंडळींचा तो अगदी गळ्यातील ताईत बनतो. भगिनीवर्ग तर सारखा नारायण...नारायण जप करत असतात..थोडक्यात त्याच्या वाचून सगळ्यांचेच अडत असते.आपल्यावाचून लोकांचे अडते ही भावना किती सुखदायक असते ना..मनातल्या खोल कप्प्यातला इगो त्यामुळे सुखावत असेल का? आणि तुझ्या वाचून माझे किती अडते रे अशी खोटी अगतिकता दाखवून स्वतःचे स्वार्थ पूर्ण करणारे पण असतील ना...? असो .... कथा पुलंची असल्याने त्या कथेला खास पुलं चा विनोदी टच आहे हे सांगायला नकोच..
     पण शेवट मात्र हृदय स्पर्शी आहे..दिवस भर दगदग करून मांडवातच आडवा झालेला नारायण एकटाच अंगाचे मुटकुळ करून झोपलेला असतो.. त्याच्याकडे आता कोणाचेच लक्ष नसते..त्याची उपयोगिता संपलेली असते..त्याची गरीब बायको त्याच्या उघड्या अंगावर  पांघरूण टाकते..कदाचित ती त्यावेळी खिन्न हसली असेल का?परिस्थिती ने व्यापलेली स्त्री खिन्न हसण्यापेक्षा दुसरं काय करू शकते म्हणा..पुलं पुढे लिहितात नारायणच्या बाजूलाच झोपलेल्या त्याच्या छोट्या मुलाच्या बाळ मुठीतला कळकट लाडू तसाच असतो...किती हृदयस्पर्शी आहे हे..डोळ्याच्या कडा ओल्या करणारे. 
     दिवस भर हिरो झालेला नारायण लग्न आटपल्यावर झिरो होतो, त्याच्या वाटयाला ना कौतुक ना स्तुती..आपला सुद्धा कधी तरी नारायण होतो..जो पर्यंत लोकांची कामे आपली म्हणून करतोय,लोकांच्या भावनेला जपतोय..तो पर्यंत आपलं कोण कौतुक असतं.. एकदा का स्वार्थ पूर्ण झाला की लोक अगदी छान दुर्लक्ष करतात.. त्यांच्या भाव विश्वातून अलगद बाजूला करतात..तुम्ही तुमचा वेळ आणि ऊर्जा त्यांच्यासाठी दिलेली असते त्याना मात्र आता तुमच्याकडे बोलायला आणि बघायला पण वेळ नसतो...थोडक्यात तुमचा नारायण झालेला असतो..अगदी दुर्लक्षित...

    - प्रशांत शेलटकर

No comments:

Post a Comment

स्क्रिप्टेड लाईफ...

स्क्रिप्टेड लाईफ...     कधी निवांत क्षणी मागे वळून पाहिलं तर कळतं.. की काही माणसं आपल्या आयुष्यात का आली आणि का निघून गेली याची काही टोटल ला...