Ad

Saturday, 24 February 2024

परी...

परी...

काल माझ्या स्वप्नात 
आली एक परी
नव्हती वाटत खरी
पण वाटत होती बरी

पंख नव्हते तिला
ती आली नाही उडत
दोन पिशव्या हातामध्ये
होती घेऊन चालत..

मागून मागून अंतर ठेवून
मी मंद चालत होतो
थांबली जर का ती
मी ही उगाच थांबत होतो

मागून इतकी सुंदर
तर पुढून कशी असेल?
गालावर तिच्या गुलाबी
बट खेळत असेल?

कल्पनेचे इमले बांधत 
मी चाललो होतो..
वय विसरून खरेखुरे
मी निम्मा झालो होतो

चालता चालता अचानक
ती किंचित थबकली
थोडा विचार करून
ती एकदम मागे वळली

" अरे माझ्या देवा...'"
नकळत बोलून गेलो
भान विसरून सगळे
मी पाहत राहिलो

चेहरा निरखून पाहिला
तर ती बायको होती
प्रश्न चेहऱ्यावरचे माझ्या
ती अधीर वाचत होती...

" ह्या पिशव्या घ्या आता
शोधते कधीची मी मघापास्नं
भर दिवसा चालताचालता
कसली बघता हो स्वप्नं"?

विरून गेली स्वप्नातली
ती खोटी खोटी परी
स्वप्नातल्या परीपेक्षा
परी असते आपली खरी

-@ प्रशांत

No comments:

Post a Comment

कविता..

कविता.. शिट्ट्या आणि टाळ्यांसाठी...  ती  नसते उभी कधीच स्टेज वर... मला आत्मभान देत , जागं करणारी  असते माझी कविता.. नेणिवेत ती असतेच सतत तरं...