स्क्रिप्ट...
@- आपले भविष्यातले प्लॅन्स करताना आपल्या भूतकाळाकडे नजर टाकली तर कधी कधी आपले प्लॅन्स हास्यास्पद ठरतात. भूतकाळात घडलेल्या घटना इतक्या अनाकलनीय असतात की आज विचार करता आपल्या आयुष्याचे स्क्रीप्ट आपण लिहीत नसून आपण फक्त भूमिका करत आहोत हे लक्षात येते.
माझे आयुष्य मी या पद्धतीने जगेन असे आपण पूर्वी ठरवलेले असते, पण आज आपण जे जगतोय त्यात आपण ठरवलेल्या गोष्टी अगदीच नगण्य असतात.
छान आयुष्य जगायला गुणवत्ता लागतेच पण नशिबाची साथ लागतेच..नशीब हा शब्द ऐकला की लगेच दैववादी म्हणून शिक्का मारला जातो..पण आपल्या आयुष्यात आपल्याला भेटलेली बरी वाईट माणसे आपल्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरतात.हे लक्षात घेतलं तर नशीब किती मॅटर करते ते कळून येईल
अर्थात कोणती माणसे भेटावी हे आपल्या हातात नसते .पण तीच माणसे का भेटावीत हा एक गूढ प्रश्न आहे. आपल्या भूतकाळाकडे पाहिलं तर ही टर्निंग पॉइंट देणारी माणसे भेटली नसती तर आपण कुठे असतो हे प्रत्येक यशस्वी माणसाला विचारून बघा ..कधी ही माणसे शिक्षक असतील.. मित्र असतील ...माणसेच कशाला निर्जीव वस्तू पण आयुष्य बदलवतात.. पेपर वाचावा.. नोकरीची जाहिरात दिसावी..सहज अर्ज करावा आणि नोकरी लागावी असे योगायोग घडत नाहीत का?
जुनी गोष्ट आहे.. माझ्या ओळखीचे एक काका आहेत..आता ते सैन्यातून कर्नल पदावरून निवृत्त झालेत.. तर त्यानी सांगितलेला किस्सा श्रवणीय आहे..शिक्षण पूर्ण झाल्यावर ते शिक्षक म्हणून नोकरीला लागले..एके दिवशी सहज म्हणून कोल्हापूर ला फिरायला गेले ,तर तिकडे सैन्य भरतीचा कॅम्प लागला होता , बघ्यांची गर्दी होती , काका सुद्धा त्या बघ्यांच्या गर्दीत सामील झाले. काका उंचपूरे असल्याने त्या कॅम्प मधल्या अधिकाऱ्याचे त्यांचेकडे लक्ष गेले .त्याने सहज विचारले ,काय येतोस का? काका म्हणाले हो..लगेच सर्व आवश्यक त्या चाचण्या झाल्या आणि काकांना तिथूनच ट्रेनिंग ला पाठवण्यात आले.घरच्या माणसांना त्यानी रेलवेतून पत्र लिहिले( त्यावेळी मोबाईल नव्हते)..
फिरायला म्हणून जावे काय आणि लष्करात भरती व्हावे काय..हे सगळं अनाकलनीय नाही का? योगायोग म्हंटल तर ते वैज्ञानीक दृष्टीने अयोग्य..किंवा विज्ञानाच्या पलीकडले..काकांना त्याच दिवशी कोल्हापूर जायची प्रेरणा कुठून मिळाली, कॅम्प पाहण्याची इच्छा का व्हावी.. हजारो माणसं असताना त्या लष्करी अधिकाऱ्याचे त्यांचेकडेच लक्ष का जावे?
आयुष्य अनप्रेडिक्ट आहे. ते गृहीत धरून प्रयत्न करणे एवढेच आपल्या हातात आहे. म्हणून तर गीतेत श्रीकृष्ण सांगून गेला की कर्म करीत रहा कर्मफळ तुझ्या हातात नाही..वेगळया अर्थांने स्क्रीप्ट तुझ्या हातात आहे तू फक्त भूमिका करत रहा..
- प्रशांत शेलटकर