Ad

Tuesday, 28 November 2023

को हम

को ssहम

कोण आहे मी?
आहे कोणासाठी?
प्रश्न एकच की,
मी जगतो कशासाठी.?

प्रश्न हे छळतात मला
घन घोर एकांती..
कोण माझे? मी कुणाचा?
उत्तरे मिळतील का अंती?

जसे जसे आयुष्य हे
एकाकी होत आहे..
छळतो एकच प्रश्न
माझे कोण आहे?

विरघळून जावे असे
कोण भेटले नाही
चवीपुरते मीठ मी
त्याहून वेगळा अर्थ नाही

ही गर्दी उगाच भोवती
कचकड्या माणसांची
जीव लावावा असा दर्दी
त्यात अजिबात नाही..

जीव जपण्या स्वतःचा
पिल्लास घेई पायतळी
स्वार्थ हेच सत्य सांगे
वानरी ती कथेतली

माझे माझे काही नाही
सत्य हे प्रखर त्रिवार
शत्रू बहुधा दिलदार
आपलेच करती वार..

बरे झाले  आता मी
अगदी रिक्त मुक्त झालो
कधी अवचित निरोप
कधी माघार घेत गेलो

© प्रशांत

Friday, 24 November 2023

कन्फेशन...

कन्फेशन....

    आयुष्य जगताना कळत नकळत झालेल्या चुकांची कबुली फादर जवळ देण्याची सुंदर पद्धती ख्रिश्चन धर्मात आहे. बिनचूक कोणीच नसते. नेहमीचे सरळसोट आयुष्य जगताना काही चुका होतच असतात.आपण खोटे बोलत असतो, कोणावर तरी अन्याय करत असतो.भावनेच्या भरात अनेक चुका होतात.पण काही काळाने आपली चूक कळते..त्याचा पश्चाताप होतो,गिल्ट वाटत रहाते..
     माफी मागावीशी वाटते,पण समोरच्या माणसाचे काळीज येशूचे असेलच असे नाही.मग नाती तुटतात ती कायमची...अगदी परत जुळली तरी त्याचा सांधा दिसत रहातो... नात्यातल्या उस्फुर्तपणा संपून जातो..नाते केवळ निभावले जाते..
     काही वेळा तर खरं बोलण्याची किंमत अश्वत्थाम्याची जखम देवून जाते..मग खरं बोलण्यापेक्षा खोटं बोलून नाती सुखद ठेवली तर गैर काय ते असे वाटून जाते..
     खरं म्हणजे खोटं बोलल्याचा खरोखरच पश्चाताप होत असेल आणि त्याचे कन्फेशन कोणी देत असेल तर त्याला अजूनच जवळ घेणं गरजेचे असते..पश्चातापाचे अश्रू डोळ्यात असलेला माणूस लहान मुलासारखा निर्मळ असतो.. तो ज्याअर्थी कन्फेशन देतो त्या अर्थी तो तुम्हाला जपत असतो. तसे नसते तर तो खोट्याची कबुली कशाला देईल?
     माफ करताना सुद्धा वरवर माफ केले म्हणू नये..मेंदूच्या हार्ड डिस्क मधून राग द्वेषाच्या फाईल्स पर्मनंटली डिलीट केल्या पाहिजेत..
    पश्चातापदग्ध मन हे देवाचे वेगळे रूप आहे त्याला जपलं पाहिजे..

    © प्रशांत शेलटकर

Sunday, 19 November 2023

जय योगेश्वर

आपण किस झाड की पत्ती...

मी एवढा चांगला किंवा चांगली तर माझ्याच नशिबात हा त्रास का? मी एवढं लोकांचे करतो किंवा करते तर माझ्याच नशिबात असे का? चांगलं वागून उपयोग काय? असे जेव्हा वाटायला लागतं तेव्हा भगवान श्रीकृष्ण आठवा.. जन्मापासून संकटे अंगावर घेणाऱ्या त्या बिचाऱ्या कृष्णाला धर्मसंस्थापनार्थाय काय काय करावं लागलं..पण एवढं सगळं करून शेवटी त्याला काय मिळालं ? तर गांधारी कडून कुलक्षयाचा शाप..म्हणजे कौरव मेले आपल्या कर्माने पण ब्लेम कोणावर ? तर कृष्णावर..वात्सल्यसुद्धा किती स्वार्थी असतं ना.. गांधारीच्याच कशाला तुमच्या आमच्या डोळ्यावर पण मोहाची पट्टी असतेच की... आपण तरी आपले दोष कुठे पहातो? आपल्या वाईट परिस्थितीचे खापर इतरांवर , समाजावर फोडायची वृत्ती जुनीच आहे .
    गांधारीच्या  शापानंतर कृष्ण चिडला? वैतागला? दुःखी झाला? डिप्रेस झाला? रडला?  नाही हो तो फक्त हसला..त्याने तो शाप स्वीकारला..जसे कौरव आपल्या कर्माने मेले तसेच यादव पण आपल्या कर्माने मरणार आहेत हे त्याला कळले होते.. कर्तृत्ववान आणि कष्टाळू माणसाच्या पुढच्या पिढ्या आळशी, अहंकारी आणि शून्य कर्तृत्वाच्या निघतात हे सत्य कालही होते आणि आजही आहे..यादव माजले होते,अहंकारी झाले होते ते कृष्णाला पण जुमानत नव्हते त्यामुळे त्यांचा विनाश अटळ होताच..कर्म सिद्धांत सांगणाऱ्या कृष्णाला हे माहीत होते म्हणून तो फक्त हसला..गांधारी फक्त निमित्त होती यादवांचे भागधेय यादवांनीच लिहून ठेवले होते..त्यात खुद्द कृष्णाला सुद्धा हस्तक्षेप करता आला नाही..तिथे आपली तुणतुणी कुठे वाजवता..नुसते हरे राम हरे कृष्ण करून कृष्ण समजत नाही..तो समजून घ्यावा लागतो..

-©प्रशांत शेलटकर

Tuesday, 14 November 2023

मौन समाधी

मौन समाधी

मौनाच्या तळ्याकाठी
एक झाड अबोल
अदृश्य शब्दहीन तरंग
ते तळेही अबोल...

त्या अबोल झाडाखाली
कुणी बैसले अबोल
झाडावरचा अनाम पक्षी
सावरून बसला तोल

तरी मौन कुजबुजते
त्या अनामिकाच्या कानी
भासते जणू डहुळते
तळ्यातले किंचित पाणी

ही जरी स्तब्ध समाधी
आत बोलते कोणी
त्या अनामिकाच्या
डोळ्यात तेव्हा पाणी

जुळून जाते नाते
आतले आतल्याशी
उमलून आत काही
हसते स्वतःशी

-© प्रशांत शेलटकर

Monday, 6 November 2023

पानगळ...

पानगळ....

वसंत सरल्यावर
का हवा तुज कोकीलरव ?
सरणावर गेल्यावर
का धडपडतो जगण्यास जीव ?

आता पानगळ सुरू
का मनात गर्भ पालवीचा ?
आता विझव पणती 
का हवा तुज मोह उजेडाचा ?

कधी  उजेड होता
तू का उघडले नाहीस दार ?
आता झिरपतो अंधार
तू का शोधतेस कवडसे चार ?

निघायची वेळ झाली
आता का पाऊल अडते तुझे?
चल ओलांडू सवे उंबरा
जीर्ण झाले ना सखे हे घर देहाचे?

© प्रशांत शेलटकर
    8600583846

Wednesday, 1 November 2023

हरिदुता का विन्मुख व्हावे?

हरिदुता का विन्मुख व्हावे?

.....आयुष्यभर जे कमावले, ज्याचा अभिमान बाळगला ते सोडून जाताना माणसाला काय वाटत असेल? आपल्या बौद्धिक आणि भौतिक पाऊल खुणा सोडून जाताना त्याचा व्यर्थपणा त्याला जाणवत असेल काय?की समाधान असेल? भौतिकाचा मोह जाणाऱ्या माणसाला अस्वस्थ करत असेल काय?आपण कायम बरोबरच होतो याचाच विचार करत किती माणसे हे जग सोडून जात असतील???
      या सगळ्या प्रश्नांचा धांडोळा घेताना ..माझेच आयुष्य माझ्या समोर उभे रहाते.
...मी यशस्वी किती ? हे माहीत नाही..मी कुठे झेंडे गाडले असेही नाही..प्रस्थापित यशस्वीतेच्या रेषेच्या खालीच मी जगत आलोय.. स्वतःचे घर, टू-व्हीलर ते फोर व्हीलर..प्रॉपर्टी.. ब्रँडेड कपडे..आणि  ते  attitude.. अशी चढती भाजणी आयुष्यात कधी आली नाही..उलट दिवसेंदिवस    odd man out  चे फिलींग वाढत जातंय..वयाच्या एका टप्प्यावर लोक आपल्या यशस्वीतेच्या कथा सांगायला लागतात...आज मागे वळून बघताना माझ्यापाशी सांगण्यासारखे काहीच नाही..ना भौतिक ना अध्यात्मिक ..काय साध्य करायचे आणि काय नाही याची द्विधा काल पण होती आणि आजपण आहे..त्यामुळे सगळा मॉल फिरून झाला पण आता एक्झिट होताना माझी बकेट जवळपास रिकामी आहे...म्हणून जाताना मोह व्हावा असे काही नाही या समाधानात जायचं की आपण काही केलंच नाही आयुष्यात ही अस्वस्थता ठेऊन जायचं?...माहीत नाही
....पण एक समाधान आहे की आयुष्यभर आरशात स्वतःला पहात आलो आणि जसा आहे तसा दिसत गेलो...जमेल तसे जगत गेलो..आरशात कुरुपतेच्या छटाही लख्ख दिसत आल्या..त्या कधी नाकारल्या नाहीत..आपण कोणी दैवी नाही...याच बेसिक वर जगत आलो..आपण सामान्य आहोत याची जाणीव सतत होत राहिली.. अगदी शाळेत असल्यापासून कळतंय की आपली तुकडी ब किंवा क आहे..शाळेत बीजगणित कधी सोडवता आले नाही तिथे आयुष्याचे गणित कसे सुटावे? तिथे उत्तराला एक्स मानले आणि आता सुखाला एक्स मानतोय  अर्थात ही निगेटीव्हिटी आहे की वास्तवाची प्रखर जाणीव? माहीत नाही
      पण हे  जग सोडून जाताना काळाच्या अफाट पुस्तकात आपली नोंद कुठल्या पानावर होईल..? ..किंबहुना होईल की नाही? आणि मुळातच का व्हावी..? जन्माला येताना आणि इथून जाताना दोन दाखले नक्की मिळतात एक जन्म दाखला आणि दुसरा मृत्यु दाखला या दोन दाखल्यांच्या मध्ये आपण असे दखलपात्र काय केलय की जगाने त्याची दखल घ्यावी? मग आपल्या जवळच्यानी तरी ती का घ्यावी?
     या क्षणी भा रां ची जन पळभर आठवतेय...
सगे सोयरे डोळे पुसतील
पुन्हा आपुल्या कामी लागतील
उठतील बसतील
हसून खिदळतील
मी जाता त्यांचे काय जाय..?
....खरंच काय जाते कोणाचे..? 
    माणूस गेल्यावर लोक त्याचा छानसा फोटो लावतात..त्याला छान चंदनी हार घालतात.. त्याला उदबत्ती ओवाळतात... वर्षभरात ती सुगंधी धुम्रवलये अदृश्य होतात.. फ्रेमवर धूळ साचते.एक दिवस ती फ्रेम भिंतीवरून निखळून पडते. आणि भंगार म्हणून तो फोटो  निकालात निघतो...
     मग अशा जगास्तव का कुढावे
     मोही कुणाच्या का गुंतावे?
     हरिदुता का विन्मुख व्हावे
     का शांतीत जिरवू नये काय..?

ही जाणीव असणे हीच मोठी achivment नाही का?

-© प्रशांत शेलटकर
     8600583846

चष्मा..

चष्मा.... मित्रा तुझा चष्मा मला दे पाहीन ना जग मी तुझ्या नजरेतून..पण क्षणभरच पण तू ही हे जग बघ ना स्वच्छ नितळ नजरेने चष्म्याशिवाय...... हे च...