Ad

Wednesday, 1 November 2023

हरिदुता का विन्मुख व्हावे?

हरिदुता का विन्मुख व्हावे?

.....आयुष्यभर जे कमावले, ज्याचा अभिमान बाळगला ते सोडून जाताना माणसाला काय वाटत असेल? आपल्या बौद्धिक आणि भौतिक पाऊल खुणा सोडून जाताना त्याचा व्यर्थपणा त्याला जाणवत असेल काय?की समाधान असेल? भौतिकाचा मोह जाणाऱ्या माणसाला अस्वस्थ करत असेल काय?आपण कायम बरोबरच होतो याचाच विचार करत किती माणसे हे जग सोडून जात असतील???
      या सगळ्या प्रश्नांचा धांडोळा घेताना ..माझेच आयुष्य माझ्या समोर उभे रहाते.
...मी यशस्वी किती ? हे माहीत नाही..मी कुठे झेंडे गाडले असेही नाही..प्रस्थापित यशस्वीतेच्या रेषेच्या खालीच मी जगत आलोय.. स्वतःचे घर, टू-व्हीलर ते फोर व्हीलर..प्रॉपर्टी.. ब्रँडेड कपडे..आणि  ते  attitude.. अशी चढती भाजणी आयुष्यात कधी आली नाही..उलट दिवसेंदिवस    odd man out  चे फिलींग वाढत जातंय..वयाच्या एका टप्प्यावर लोक आपल्या यशस्वीतेच्या कथा सांगायला लागतात...आज मागे वळून बघताना माझ्यापाशी सांगण्यासारखे काहीच नाही..ना भौतिक ना अध्यात्मिक ..काय साध्य करायचे आणि काय नाही याची द्विधा काल पण होती आणि आजपण आहे..त्यामुळे सगळा मॉल फिरून झाला पण आता एक्झिट होताना माझी बकेट जवळपास रिकामी आहे...म्हणून जाताना मोह व्हावा असे काही नाही या समाधानात जायचं की आपण काही केलंच नाही आयुष्यात ही अस्वस्थता ठेऊन जायचं?...माहीत नाही
....पण एक समाधान आहे की आयुष्यभर आरशात स्वतःला पहात आलो आणि जसा आहे तसा दिसत गेलो...जमेल तसे जगत गेलो..आरशात कुरुपतेच्या छटाही लख्ख दिसत आल्या..त्या कधी नाकारल्या नाहीत..आपण कोणी दैवी नाही...याच बेसिक वर जगत आलो..आपण सामान्य आहोत याची जाणीव सतत होत राहिली.. अगदी शाळेत असल्यापासून कळतंय की आपली तुकडी ब किंवा क आहे..शाळेत बीजगणित कधी सोडवता आले नाही तिथे आयुष्याचे गणित कसे सुटावे? तिथे उत्तराला एक्स मानले आणि आता सुखाला एक्स मानतोय  अर्थात ही निगेटीव्हिटी आहे की वास्तवाची प्रखर जाणीव? माहीत नाही
      पण हे  जग सोडून जाताना काळाच्या अफाट पुस्तकात आपली नोंद कुठल्या पानावर होईल..? ..किंबहुना होईल की नाही? आणि मुळातच का व्हावी..? जन्माला येताना आणि इथून जाताना दोन दाखले नक्की मिळतात एक जन्म दाखला आणि दुसरा मृत्यु दाखला या दोन दाखल्यांच्या मध्ये आपण असे दखलपात्र काय केलय की जगाने त्याची दखल घ्यावी? मग आपल्या जवळच्यानी तरी ती का घ्यावी?
     या क्षणी भा रां ची जन पळभर आठवतेय...
सगे सोयरे डोळे पुसतील
पुन्हा आपुल्या कामी लागतील
उठतील बसतील
हसून खिदळतील
मी जाता त्यांचे काय जाय..?
....खरंच काय जाते कोणाचे..? 
    माणूस गेल्यावर लोक त्याचा छानसा फोटो लावतात..त्याला छान चंदनी हार घालतात.. त्याला उदबत्ती ओवाळतात... वर्षभरात ती सुगंधी धुम्रवलये अदृश्य होतात.. फ्रेमवर धूळ साचते.एक दिवस ती फ्रेम भिंतीवरून निखळून पडते. आणि भंगार म्हणून तो फोटो  निकालात निघतो...
     मग अशा जगास्तव का कुढावे
     मोही कुणाच्या का गुंतावे?
     हरिदुता का विन्मुख व्हावे
     का शांतीत जिरवू नये काय..?

ही जाणीव असणे हीच मोठी achivment नाही का?

-© प्रशांत शेलटकर
     8600583846

No comments:

Post a Comment

चष्मा..

चष्मा.... मित्रा तुझा चष्मा मला दे पाहीन ना जग मी तुझ्या नजरेतून..पण क्षणभरच पण तू ही हे जग बघ ना स्वच्छ नितळ नजरेने चष्म्याशिवाय...... हे च...